मुंबई : ४० वर्षांनंतर दुसऱ्याच्या खांद्यावर बसून रायगडावर जाणाऱ्यांनी मराठ्यांना आरक्षण दिलेलं नाही, असा खोचक टोला शिवसेना नेत्या ज्योती वाघमारेंनी शरद पवारांचे नाव न घेता लगावला आहे. त्यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत काँग्रेस आणि शरद पवारांवर निशाणा साधला.
ज्योती वाघमारे म्हणाल्या की, "मराठा युवकांना भडकवत हिंसा करण्यास प्रोत्साहन देऊन त्यांचं आयुष्य उध्वस्त करणाऱ्यांना रोखण्याचा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देत आहे. काँग्रेस पक्ष याला जरांगेशी जोडून समाजात संभ्रम पसरवण्याचे काम करत आहे. अशा खट्याळ आणि खोडसाळपणामुळे जर उद्या महाराष्ट्र पेटला तर यासाठी फक्त काँग्रेस पक्ष आणि जरांगेंचा वापर करणारे लोकच जबाबदार असतील."
"कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांचा कार्यक्रम करण्यास सरकार सक्षम आहे. जरांगे दादांनी राजकारण करु नये. ते सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांना समाजाने सामाजिक कार्यकर्ते म्हणून दिलेला मान आणि स्थान त्यांनी जपावं. प्रस्थापित मराठ्यांनी जर त्यांना चालवलं तर मग गरीब मराठ्यांना कसा न्याय मिळेल?," असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
त्या पुढे म्हणाल्या की, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मराठा आरक्षण देऊन आंदोलनाला जीवनदान दिलं. परंतू, काँग्रेस पक्षाने मराठ्यांच्या नावाने फक्त सत्ता भोगली. पण कधी न्याय केला नाही. जो काँग्रेस पक्ष ४०-५० वर्षे सत्तेवर होता त्यांना मराठा आरक्षण का बरं द्यावसं वाटलं नाही. ज्यावेळी आंदोलन पेटलेलं होतं त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्याला सामोरं जाण्याचं धाडस केलं. कुठल्याही काँग्रेस नेत्यांनी किंवा काकांनी हे केलेलं नाही. वेळोवेळी जरांगेंच्या सगळ्या मागण्या करून आंदोलनाला न्याय देण्याची भुमिका एकनाथ शिंदेंनी घेतली आहे. दुसरीकडे, पक्ष आणि चिन्ह हातातून जातो तेव्हा ४० वर्षांनंतर दुसऱ्याच्या खांद्यावर बसून रायगडावर जाणाऱ्या लोकांनी कधीही मराठा समाजाला आरक्षण दिलेलं नाही. त्यांना न्याय एकनाथ शिंदेच देतील," असेही त्या म्हणाल्या आहेत.