राज्याचे पहिले 'महाराष्ट्र वनभूषण' ठरले चैत्राम पवार!
27 Feb 2024 20:34:54
वन, वानिकी आणि वन्यजीव संवर्धनाच्या कामात गेली अनेक वर्षे काम करणाऱ्या चैत्राम पवार यांना प्रथम महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार जाहीर.
मुंबई (विशेष प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य शासनाचा पहिलाच वनभूषण पुरस्कार बारीपाडा येथील चैत्राम पवार (chaitram pawar) या कार्यकर्त्याला जाहीर झाला आहे. वन, वानिकी तसेच वन्यजीव संवर्धनामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या धुळे जिल्ह्यातील साक्री गावातील चैत्राम पवार (chaitram pawar) यांना हा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. चंद्रपुर येथे आयोजित दि. १ ते ३ मार्च दरम्यान असणाऱ्या ताडोबा महोत्सवामध्ये पवार (chaitram pawar) यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च पुरस्कार असलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या धर्तीवर राज्य शासनाने महाराष्ट्र वनभूषण पुरस्काराची घोषणा केली होती. याच पार्श्वभूमीवर वन, वानिकी आणि वन्यजीव संवर्धनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या चैत्राम (chaitram pawar) यांना हा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. या पुरस्काराचे स्वरुप सन्मानचिन्ह, मानपत्र आणि वीस लाख रुपये असे असणार आहे. दि. ३ मार्च रोजी असलेल्या जागतिक वन्यजीव दिनाच्या दिवशी ताडोबा महोत्सवामध्ये हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.
चैत्राम पवार (chaitram pawar) गेल्या २६ वर्षापासून नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन, सक्षमीकरण, स्वावलंबन, वनहक्क कायदा, कृषि विकास आणि शाश्वत विकास या विषयांवर मागील २६ वर्षापासून आदिवासी समाजासोबत काम करीत आहेत. ते सध्या मराठवाडा आणि खानदेश भागासाठी वनवासी कल्याण आश्रमाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
"आदिवासी क्षेत्रातील वनजमिनींच्या अनुषंगाने पवार (chaitram pawar) यांनी केलेले काम मोलाचे आहे. तसेच, वनविभागाच्या विविध कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत नागरिकांना त्यासाठी प्रोत्साहित करणे, राखीव वनक्षेत्र आणि आजूबाजूच्या परिसरातील गावांमध्ये वृक्षलागवड आणि वनसंवर्धन यासाठी केलेले काम उल्लेखनीय आणि प्रेरित करणारे आहे", अशा शब्दात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांचे कौतूक केले.
चैत्राम पवार (chaitram pawar) यांनी धुळे जिल्ह्यातील बारीपाडा येथे प्रथम पीपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्टर (PBR) तयार केले. ते नियमितपणे अद्यावतही केले जाते. संरक्षित क्षेत्रातून लागवड नसलेल्या रानभाज्यांची रेसिपी करुन जंगलातील पारंपरिक ज्ञान त्यांनी इतरांपर्यंत पोहोचवले आहे. सिंचनासाठी भूजलाचा काटकसरीने वापर, मृद व जलसंधारणाची कामे, सौर ऊर्जेचा वापर, प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न, सार्वजनिक आरोग्यविषयक प्रश्नांची सोडवणूक आदी माध्यमातून त्यांनी केलेल्या कामाची दखल राज्य शासनाने या सर्वोच्च पुरस्काराच्या माध्यमातून घेतली आहे.
पवार (chaitram pawar) यांना यापूर्वीही विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले असून त्यामध्ये आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी-२००३, भारत जैवविविधता पुरस्कार - २०१४, शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार, आदिवासी सेवक पुरस्कार, संत तुकाराम वनग्राम पुरस्कार, डॉ. हेडगेवार स्मृती सेवा निधी कार्य पुरस्कार, आदिवासी अस्मिता पुरस्कार, वसुंधरा पुरस्कार, पु. भा. भावे स्मृती पुरस्कार, नातू फौंडेशन सेवाव्रत कार्यकर्ता पुरस्कार, संस्कार कवच पुरस्कार, गो. नी. दांडेकर स्मृती नीरा गोपाल पुरस्कार आणि राज्य शासनाचा जलनायक पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांचा समावेश आहे.