रांगेचाच नेता...

26 Feb 2024 21:54:27
Direction and condition of the Maratha Andolan


अहिंसक मार्गांनी सुरु झालेल्या मराठा आंदोलनाला यापूर्वीच हिंसक वळण लागले. आंदोलनाचे नेतृत्व करणार्‍या जरांगेंच्या तोंडी ‘माझ्यावर गोळ्या झाडा’, ‘माझा बळी घ्या’ अशी आत्मघातकी भाषा आली. उपमुख्यमंत्री फडणवीसांविरोधात त्यांनी केलेली जातीयवादी अश्लाघ्य शेरेबाजी तर महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालणारीच! अशा या ‘रांगेचाच नेता’ ठरलेल्या जरांगेंमुळे नेमके हे आंदोलन कशासाठी सुरु झाले? आणि आज हे आंदोलन कुठे जाऊन थांबले आहे? हेच कळेनासे झालेले दिसते.

 
रांगेचा नेता तो रांग मोडणारा
तोच जबरदस्त तुझी टांग तोडणारा
ध्येय रकाने खरडी भाड्याचा बोरू
राजकीय रबर थोर शब्द खोडणारा
रांगेचा नेता तो रांग मोडणारा

या कवी मंगेश पाडगांवकरांच्या वरील कवितेतील काव्यपंक्ती आजच्या परिस्थितीला अगदी तंतोतंत शोभणार्‍या. कारण, अशाच एका ‘रांगेच्या नेत्या’ने अवघ्या महाराष्ट्राला सध्या वेठीस धरलेले दिसते. मराठा समाजाच्या प्रारंभीच्या शांतता मोर्चांची शिस्तबद्धता मोडत, मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वातील आंदोलनालाच गेल्यावर्षी हिंसक वळण लागले. पोलिसांच्या त्या लाठीमाराचे पुरते भांडवल करुन, जरांगे पाटलांनी सरकारवरच आगपाखड केली. त्यांच्या मराठा आरक्षणासंबंधी मागण्यांची यादीही एक एक करत वाढतच गेली. ‘माझ्या मागण्या मान्य करा, अन्यथा आमरण उपोषण’ असे वारंवार धमकावत जरांगेंनी राज्य सरकारवर अगदी पद्धतशीरपणे दबाव वाढविण्याचे काम केले. महायुती सरकारनेही मराठा समाजाची आरक्षणाची मागणी लक्षात घेता, जरांगेंच्या कलाने घेतले. कुणबी नोंदी शोधण्यासाठी संपूर्ण शासकीय यंत्रणा कामावर जुंपली. नंतर ‘सगेसोयरे’ या शब्दाचा अंतर्भाव करून प्रारूप अधिसूचनाही सरकारने जारी केली. एवढ्यावरही न थांबता, मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून मराठा समाजाचे सर्वेक्षणही पूर्ण करण्यात आले. तो अहवाल सभागृहाच्या पटलावर मांडून, सरकारने मराठा समाजाला शैक्षणिक संस्था आणि नोकर्‍यांमध्ये दहा टक्के आरक्षणाचीही घोषणा केली.

विधिमंडळाने एकमताने या आरक्षणावर मोहर उमटवली. मराठा आरक्षण न्यायालयात टिकविण्याचा निर्धारही महायुती सरकारने व्यक्त केला. पण, तरीही ओबीसी कोट्यातूून मराठा आरक्षण हवे, ‘सगेसोयरे’ अधिसूचनेची तातडीने अंमलबजावणी हवी, म्हणून इरेला पेटलेल्या जरांगेंनी सरकारने दिलेल्या मराठा आरक्षणाला केराची टोपली दाखविली. ‘मी सांगतो तसेच, त्याच पद्धतीने मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे,’ हा त्यांचा अट्टाहास अद्याप कायम आहे. त्याच अट्टाहासातून कालपरवा जरांगेंनी वृत्तवाहिन्यांच्या कॅमेर्‍यासमोर केलेला आकांडतांडव तर अवघ्या महाराष्ट्राला चक्रावून टाकणारा. त्यातही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर त्यांनी केलेले बेछूट आरोप तर त्याहूनही बिनबुडाचे!पण आश्चर्य म्हणजे, जे जरांगे मराठा आरक्षण जाहीर केल्यानंतरही आज फडणवीस-शिंदे-पवारांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करत आहेत, तेच जरांगे महाविकास आघाडीचे सरकार असताना कुठल्या बिळात लपले होते? ज्यांच्या काळात मराठा आरक्षणासंदर्भात ठोस असे काहीच घडले नाही, असे शरद पवार आणि फडणवीसांनी दिलेले आरक्षणही ज्यांच्या कारकिर्दीत संपुष्टात आले, त्या उद्धव ठाकरेंविषयी जरांगे तोंडातून ‘ब्र’ ही काढत नाही. कारण, पवार आणि ठाकरेंनी मराठा आरक्षणाच्या खटल्याच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयात केवळ वेळकाढूपणा केला. तसेच राज्य सरकार म्हणून गांभीर्याने वकिलांच्या मागे सर्वस्वी ताकद उभी करणे, त्यांना दिशादिग्दर्शन करणे, संसाधने उपलब्ध करण्यात ठाकरे सरकारने कुचराईच केली. त्यांच्या या चालढकलपणामुळेच सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकू शकले नाही. ठाकरेंच्या अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाचा अनागोंदीचा कारभार जरांगेंच्या खिसगणतीतच नाही, हीच खरी गोम.

मात्र, मराठा समाजासाठी ‘सारथी’पासून ते अण्णा साहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळापर्यंत, नोकरी, शिक्षण, उद्योगधंद्यांसाठी कर्जसाहाय्य अशा सर्वच बाबतीत सक्षम धोरणे राबविणार्‍या फडणवीसांविरोधात जरांगे जातीयद्वेषाची गरळ ओकत आहेत. जरांगे यांना पुरते विस्मरण झालेले दिसते की, याच ‘सारथी’च्या माध्यमातून मराठा समाजातील कित्येक गोरगरीब विद्यार्थ्यांची सरकारी परीक्षा, कोचिंग आणि दिल्लीसारख्या ठिकाणी राहण्याचीही सोय झाली. कित्येक मराठा तरुणांना सरकारी नोकर्‍याही मिळाल्या. अण्णा साहेब पाटील महामंडळामुळे तर ६० हजारांहून अधिक मराठा तरुणांना ४८०० कोटींपेक्षा अधिकचे कर्जवाटप करण्यात आले. हे मराठा समाजातील उद्योजक आपल्या पायांवर उभे राहिले आणि आज ते इतरांनाही रोजगार देत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राला आजवर लाभलेल्या मराठा मुख्यमंत्र्यांना जे जे त्यांच्याच मराठा समाजासाठी अवघ्या हयातीत करता आले नाही, ती किमया देवेंद्र फडणवीसांनी अवघ्या पाच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत साध्य केली. हीच खरी जरांगेंसह पवार आणि मंडळींची पोटदुखी. फडणवीसांच्या कारभारावर बोट ठेवता येण्यासारखे काही ठोस हाती नसल्यामुळे, वेळोेवेळी त्यांच्या जातीचा उद्धार करुन, ते मराठाविरोधी असल्याचे चित्र पद्धतशीरपणे रंगविले जाते. मग ते फडणवीसांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात मराठा समाजाचे लाखोंच्या संख्येने निघालेले मोर्चे असो वा भीमा-कोरेगाव प्रकरणातूनही राज्याचे वातावरण कलुषित करण्याचा केलेला प्रयत्न असेल; अगदी पद्धतशीरपणे फडणवीसांच्या प्रतिमेला डाग लावण्याचे बेमालूमपणे षड्यंत्र रचले गेले. मनोज जरांगे पाटील हा त्याच कडीतील पुढचा अध्याय!


खरं तर शरद पवारांनी काँग्रेसशी फारकत घेऊन स्वत:चा पक्ष स्थापन केल्यानंतर आपल्या ‘फोेडा आणि राज्य करा’ या नीतीनुसार, वेेगवेगळे गट जपायला, सांभाळायला सुरुवात केली. यात एक गट होता जातीयवादी व स्वत:ला मराठा समाजाचे प्रमुख म्हणविणार्‍यांचा. यांच्याकडे मराठा समाजासाठी शिक्षण, रोजगार अशा सकारात्मक विषयांसाठी कधीच कुठला अजेंडा नव्हता. मात्र, नेतृत्व मिळविण्यासाठी अन्य जातीतल्या लोकांवर घाणेरड्या शब्दांत टीका करणे, ब्राह्मणविरोधी साहित्य निर्मिती करणे असे उद्योग या मंडळींनी अगदी बिनबोभाटपणे सुरु केले. यातून पूर्वी अन्य जातींचा द्वेष करणारी एक पिढीच्या पिढी प्रभावित झाली. जरांगेसुद्धा याच मानसिक स्थितीमुळे अन्य समाजांचा द्वेष करतात. ते वापरत असलेल्या संज्ञा, त्यांनी निवडलेले शब्द ते त्याच मानसिकतेचे प्रतीक आहेत. आज त्यांचे जे एकूणच तारतम्य सुटले आहे, त्यामागे वर्षानुवर्षे जातीयवादी संघटनांनी पद्धतशीरपणे राबविलेली विखारी कार्यपद्धती कारणीभूत आहे. सर्वच जातीत असे लोक असतात. त्यांच्याकडच्या कमी-अधिक उपद्रवमूल्याच्या प्रमाणात त्यांच्या अस्तित्वाचा कालावधी ठरत असतो. यातून मिळणारे आभासी नेतृत्व आणि सवंग लोकप्रियता हीच अशा आंदोलनाची फलश्रुती असते. ही फलश्रुती नेत्याला अल्पकालीन कीर्ती किंवा अपकीर्ती मिळवून देते. पण, जातीच्या हाती मात्र फारसे काही लागत नाही. समाजात मात्र जी फूट पडते, ती भरुन यायला अनेक वर्षे लागतात.



Powered By Sangraha 9.0