राष्ट्रगीताकरिता दिलेल्या सांगीतिक लढ्याची शौर्यगाथा

    24-Feb-2024
Total Views |
Vandemastram Book

'वन्देमास्तरम्’ हे अगदी ताजे म्हणजे नुकतेच प्रकाशित झालेले पुस्तक असून, त्याचे नावही अगदी यथार्थ दिले आहे. दि. २४ जानेवारी १९५० रोजी म्हणजे भारत प्रजासत्ताक होण्यापूर्वीचे दोन दिवस आधी ’वन्दे मातरम्’ या गीताला ’राष्ट्रीय गीत’ (National Song) म्हणून तत्कालीन सरकारतर्फे घोषित करण्यात आले. त्या घटनेला दि. २४ जानेवारी २०२४ रोजी ७४ वर्षे पूर्ण झाली. तसेच ’वन्दे मातरम्’ हे गीत स्वतंत्र भारत देशाचे राष्ट्रगीत व्हावे, याकरिता चिकाटीने अथक प्रयत्न करणार्‍या, गायनाचार्य पं. कृष्णराव फुलंब्रीकर उर्फ मास्टर कृष्णराव किंवा मास्तर कृष्णराव (मास्तर) यांची दि. २० जानेवारी ही १२६वी जयंती. या औचित्याने दि. २४ जानेवारी २०२४ या दिवशी ‘वन्दे मातरम्’ हे राष्ट्रगीत व्हावे, यासाठी मास्तर कृष्णराव या कलावंताकडून लढल्या गेलेल्या सांगीतिक क्रांतीची कथा सांगणारे, ‘वन्देमास्तरम्’ हे मिलिंद सबनीस लिखित पुस्तक ’बिल्वबिभास प्रकाशना’तर्फे प्रकाशित करण्यात आले.
 
‘वन्देमास्तरम्’ ही कथा आहे, एका राष्ट्रभक्तीने भारलेल्या संगीत साधकाची! आपल्या सांगीतिक कारकिर्दीच्या वैभवशाली शिखरावर असताना, राष्ट्रगीताचा ध्यास घेऊन, मास्तरांनी जीवनात संगीताइतकेच राष्ट्रभक्तीला स्थान दिले. कलाकार फक्त ’कलंदरच’ नसतात, तर त्यांना आपल्या कर्तव्याचीही जाणीव असते, हे त्यांनी कृतीतून सिद्ध केले आहे. दि. २० जानेवारी १८९८ रोजी पुण्यभूमी असलेल्या आळंदीत कृष्णाचा म्हणजेच मास्तरांचा जन्म झाला. जणू ज्ञानेश्वरांच्या प्रतिभेतील प्रसन्नता त्यांच्या देवदत्त गात्या गळ्याला परिसस्पर्श करून गेली. ते लहानपणी नाट्यकला प्रवर्तक संगीत नाटक मंडळीत बाल गायकनट म्हणून कार्यरत असताना, त्यांना नाटकांतील पदांसाठी सवाई गंधर्व व उस्ताद निस्सार हुसेन खान यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच सुमारास म्हणजे १९१०-११च्या काळात त्यांना थोर गायनाचार्य पं. भास्करबुवा बखले यांचा अनुग्रह लाभला. १९११ साली धुळे येथे झालेल्या मैफलीत १३ वर्षांच्या लहानग्या कृष्णाचे गाणे ऐकून, उपस्थित रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले. त्यानंतर लगेचच पुण्यात साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांनी त्यांना सुवर्णपदक प्रदान केले व त्या समारंभात ’मास्टर कृष्णा’ अशी उपाधीही बहाल केली. त्या क्षणापासून तो ‘बाल गायकनट मास्टर कृष्णा’ म्हणूनच ओळखला जाऊ लागला आणि पुढे ‘मास्टर कृष्णराव/मास्तर कृष्णराव (मास्तर)’ या नावाने ते अखिल भारतात प्रसिद्ध पावले. १९३४ सालामध्ये ‘वंदे मातरम्’ या गीताला संगीतबद्ध करून, ते ध्वनिमुद्रित करावे, असे त्यांच्या मनात आले आणि एका तेजस्वी, लखलखीत राष्ट्रभक्ती पर्वाचा प्रारंभ झाला.
 
‘वंदे मातरम्’ हे दोन शब्द नव्हेत, तर ’मंत्र’ बनले होते. या मंत्राने इतिहास घडवला. ’मातृ देवो भवः’ मानणार्‍या आपल्या भारतीय संस्कृतीचा जागर घडविणारी कविता १८७५च्या सुमारास बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या अलौकिक प्रतिभेतून साकार झाली आणि ती कविता बंकिमचंद्रांनी १८८२ मध्ये स्वतःच्या ’आनंदमठ’ कादंबरीत अंतर्भूत केली. अशा प्रकारे ‘वंदे मातरम्’ या वंद्य मंत्राचा जन्म झाला. १८९६च्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात रवींद्रनाथ टागोरांनी या गीताचे पहिले जाहीर गायन केले व पुढे हीच परंपरा प्रत्येक राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात चालू राहिली. याचा सर्व इतिहास या पुस्तकात ’वंदे मातरम्चा सांगीतिक प्रवास’ या प्रकरणात वर्णन केला आहे. तो वाचताना एक वेगळे माहितीचे दालन समोर येते.

१९३६ साली बर्लिन ’ऑलिम्पिक’मध्ये मास्तरांनी स्वकृत चालीत गायलेल्या, ‘वंदे मातरम्’ची ध्वनिमुद्रिका भारताचे राष्ट्रगीत म्हणून सर्वप्रथम वाजवली गेली. १९३७ साली पुणे येथील टिळक स्मारक मंदिरात साजर्‍या केलेल्या पहिल्या ‘वंदे मातरम्’ दिनानिमित्त प्रचंड जनसमुदायासमोर व मान्यवरांच्या उपस्थितीत मास्तरांनी या गीताचे सुरेल गायन सादर केले. त्याप्रसंगी ल. ब. भोपटकर वकिलांनी मानाची भरजरी शाल देऊन, मास्तरांचा सत्कार केला, तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी त्यांचे विशेष कौतुक केले. त्यावेळी ‘वंदे मातरम्’ हेच भारताचे राष्ट्रगीत झाले पाहिजे, ही भावना जनमानसात दृढ केली गेली. त्या स्वातंत्र्यपूर्व काळात आकाशवाणी हे कलावंतांचे अनेकानेक रसिकांपर्यंत पोहोचण्याचे एकमेव प्रभावी माध्यम होते. आकाशवाणीसारख्या सर्वदूर पोहोचणार्‍या व कलावंतांना आर्थिक स्थैर्य देणार्‍या माध्यमात दि. ७ ऑगस्ट १९३८ या दिवशी मास्तरांनी आपल्या मैफलीत ’वंदे’ हा शब्द उच्चारताच, त्याक्षणी झेड. बुखारी या अधिकार्‍याने आकाशवाणीतील विजेचा प्रवाह खंडित केला आणि पुढील ’मातरम्’ हा शब्दच प्रसारित होऊ दिला नाही. हा स्वतःचा नव्हे, तर ‘वंदे मातरम्’चा व पर्यायाने देशभक्तीचा अपमान मानून, मास्तरांनी आकाशवाणीवर न गाण्याची प्रतिज्ञा केली व ती प्रतिज्ञा थोडीथोडकी नव्हे तर तब्बल नऊ वर्षे पाळली. या काळात दि. ८ ऑगस्ट १९४२ या दिवशी मुंबईतील गवालिया टँक (आताचे ऑगस्ट क्रांती मैदान) मैदानावर ’भारत छोडो’च्या राष्ट्रीय अधिवेशनात स्वतःच्या अटकेची पर्वा न करता, मास्तरांनी निर्भीडपणे भव्य समुदायासमोर हे गीत स्वकृत चालीत संपूर्ण कडव्यांसहित गायले. आधीच पेटलेला जनसमुदाय हे गीत ऐकल्यावर, अधिक त्वेषाने पेटून उठला.

पुढे स्वातंत्र्योत्तर काळात १९४७ ते १९५० या कालावधीत मास्तरांनी संसदेत घटना समितीच्या सदस्यांसमोर ‘वंदे मातरम्’चे स्वकृत चालीत आवर्जून गायन सादर केले. त्यावर स्वकीयांनी घेतलेले सर्व आक्षेप दूर करण्यासाठी कमालीचा संघर्ष केला. सैन्यातील घोषावर ‘वंदे मातरम्’ हे ‘मार्च साँग’ म्हणून वाजविता यावे, याकरिता मास्तरांनी स्वतः पोलीस ग्राऊंडवर जाऊन ‘मार्चिंग स्टेप्स’ शिकून घेतल्या. सैन्यातील घोषवादक अधिकार्‍यांना या गीताचे नोटेशन शिकवले व त्यांच्याकडून सराव करून घेतला. मास्तरांनी या गीतास झिंझोटी रागात सुलभ चाल दिली असल्याने त्यांनी अनेक महाविद्यालये, शाळांमध्ये जाऊन हे गीत सामूहिकरित्या विद्यार्थ्यांकडून गाऊन घेतले. इतक्या विविध पातळ्यांवरून, विविध व्यक्तींना या गीतासंबंधी समजावून सांगताना त्यांनी वेळ, पैसा, कष्ट या कशाचीच तमा बाळगली नाही. सर्व आघाड्यांवर ते एखाद्या लढवय्यासारखे लढत होते. बरं, हे देशकार्य करत असताना, त्यांचे इतर सांगीतिक कार्यदेखील अखंडपणे सुरूच होते.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर ‘वन्दे मातरम्’ हेच गीत राष्ट्रगीत होणार, अशी सर्व भारतीयांना खात्री वाटत होती. याविषयी पुसटशी शंकादेखील कुणाच्याच मनात उरली नव्हती. पण, दि. २४ जानेवारी १९५० रोजी संसदेत घटना समितीची अंतिम बैठक झाली. त्यावेळी राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्यामार्फत एक निवेदन वाचून दाखवले गेले. त्यामध्ये ’जन-गण-मन’ला राष्ट्रगीत  आणि ‘वंदे मातरम्’ला राष्ट्रीय गीत म्हणून दिलेली मान्यता सरळ-सरळ जाहीर केली गेली. घटना समितीच्या सदस्यांचे मतदान घेण्याचे टाळण्यात आले होते व एकाधिकारशाही पद्धत वापरून, राष्ट्रगीताबाबत हा थेट निर्णय घेण्यात आला होता. तत्कालीन पंतप्रधानांच्या व मुस्लीम लीगच्या राजकारणी डावपेचांमुळे ‘वंदे मातरम्’ या मंत्राचीच गळचेपी केली गेली. परंतु, १९४७ ते १९५० या कालावधीत मास्तरांनी दिलेल्या सांगीतिक संघर्षाला काही प्रमाणात यश मिळाले होते; कारण ‘वंदे मातरम्’ गीताला सरकारतर्फे पूर्णपणे न अव्हेरता, निदान ‘राष्ट्रीय गीता’चा बहुमान देण्यात आला होता.

हा सारा थरार या पुस्तकात प्रत्यक्ष घडला, तसा अत्यंत सोप्या, प्रवाही भाषेत, त्या लढ्या संदर्भातील पत्रव्यवहार, ध्वनिमुद्रिका, समकालीन वर्तमानपत्रांतील कात्रणे, मास्तरांच्या हस्ताक्षरातील टिपणे, नोटेशन्स यांचा प्रचंड धांडोळा घेऊन मांडला आहे. तसेच या पुस्तकाच्या प्रकाशिका असलेल्या, प्रिया फुलंब्रीकर या मास्तरांच्या नातीने आजोबांविषयीच्या आत्यंतिक प्रेमादराने हा तेजस्वी इतिहास प्रकट केला आहे, हे ही कौतुकास्पद! या पुस्तकाची भारतमातेच्या चरणी वाहिलेली अर्पणपत्रिका, मुखपृष्ठ, अक्षरलेखन, मांडणी आणि छायाचित्रे हे सर्वच समयोचित.

डॉ. अनुजा कुलकर्णी
(लेखिका आयुर्वेदतज्ज्ञ असून ’अखिल भारतीय साहित्य परिषदे’च्या पश्चिम महाराष्ट्राच्या कार्याध्यक्ष आहेत.)
‘वन्देमास्तरम्’ हे पुस्तक पुढील ठिकाणी उपलब्ध आहे : बुकगंगा, अक्षरधारा बुक गॅलरी : बाजीराव रोड, पुणे-२, उत्कर्ष प्रकाशन : ७०१, डेक्कन जिमखाना, पुणे-४, बिल्वबिभास प्रकाशन : ११७४, सदाशिव पेठ, पुणे-३०.
(अधिक माहितीसाठी संपर्क - प्रिया फुलंब्रीकर - ९७६६६२३४०९)
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.