मुंबई : तुताऱ्या वाजवा नाहीतर मशाली पेटवा पण आम्ही ४५ पेक्षा अधिक जागा जिंकू, असे वक्तव्य उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. महाराष्ट्रातील जनता तुतारीच वाजवणार आहे, असे उबाठा गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले होते. यावर आता चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाला तुतारी हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. शनिवारी रायगडावर या चिन्हाचं अनावरण पार पडलं. याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, "महाराष्ट्रातील ११ कोटी जनता यापुढे हातात मशाल घेऊन तुतारी वाजवणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला अत्यंत चांगलं ऐतिहासिक चिन्ह मिळालेलं आहे."
यावर आता मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राऊतांना जोरदार टोला लगावला. ते म्हणाले की, "तुताऱ्या वाजवा नाहीतर मशाली पेटवा पण आम्ही ४५ पेक्षा अधिक जागा जिंकू. आतापर्यंत आम्ही महाराष्ट्रात ४५ जागा जिंकु असं म्हणत होतो. परंतू, हा आकडाही आता आम्ही पार करु असं दिसत आहे," असे ते म्हणाले.