ठाणे : गणेशोत्सवाला अजून बराच अवधी असला तरी गणपतीच्या मूर्ती बनविण्याआधीच महापालिकेने मूर्तीकारांची बैठक घेवून यावर्षी घरगुती गणेशाच्या मूर्ती या शाडूच्याच बनविण्यात याव्यात. यासाठी लागणारी शाडू माती, जागा आणि इतर सुविधा महापालिका उपलब्ध करुन देईल. अशी ठोस भूमिका महापालिकेने घेतली आहे. तसेच मूर्तीकारांच्या उर्वरित मागण्यांबाबतही सकारात्मक विचार करुन सुवर्णमध्य काढण्यात येईल असे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी नमूद केले.
ठाणे महापालिकेतील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात नुकतीच (२२ फेब्रुवारी) मूर्तीकारांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीस मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान तसेच बहुसंख्य मूर्तीकार उपस्थित होते. शाडूमातीच्या मुर्त्या या पर्यावरणपूरक असल्यामुळे यंदा घरगुती गणेशाची मूर्ती ही शाडूची असेल याची दक्षता मूर्तीकारांनी घ्यावयाची आहे. तसेच गणेशमूर्ती साठवणूक करण्यासाठी तसेच मूर्ती बनविण्यासाठी जागा उपलब्ध व्हावी यासाठी महापालिकेकडे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे.
त्याचप्रमाणे मुर्तीकारांना शाडूची माती देखील उपलब्ध करुन दिली जाणार आहे. मूर्तीकार किती मूर्ती घडविणार आहेत, किती साठा करणार आहेत याची सर्व माहिती महापालिकेस देणे बंधनकारक असणार आहे. नागरिकांमध्ये याबाबत जनजागृती व्हावी यासाठी कारखानदारांनी कारखान्यात फलक लावावा. प्लॅस्टर ऑफ पॅरिसऐवजी पर्यावरणपूरक असलेल्या गणेशमूर्ती बनवाव्यात. असे आवाहन अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी यावेळी केले.
बाहेरच्या मूर्तीकारांना जिल्हाबंदी करावी
शाडूच्या मूर्ती बनविण्यासाठी बराच कालावधी लागतो, यासाठी मूर्तीकारांना महापालिकेच्या पडीक किंवा मोकळ्या जागा १२ महिन्यांसाठी उपलब्ध करुन द्याव्यात. तसेच जे अधिकृत मूर्तीकार आहेत त्यांना महापालिकेने ओळखपत्र द्यावे. बाहेरच्या मूर्तीकारांना जिल्हाबंदी करावी. तसेच जे मूर्तीकार बाहेरून मुर्ती आणून त्याची विक्री करतात त्यांना देखील परवानगी बंधनकारक करावी. जे मूर्तीकार शाडू माती ऐवजी पीओपीच्या मूर्ती तयार करतात त्यांच्यावर निर्बंध आणण्यासह सर्वत्र जनजागृती करावी. अशा मागण्या मूर्तीकारांनी बैठकीत केल्या असता त्यावर सकारात्मक तोडगा काढणार असल्याचे मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान यांनी सांगितले.