शहाजीराजांना कुराणाची नि पोटच्या मुलाची कसम खाऊन विश्वास देणारा, नवाब मुस्तफाखान त्यावेळी जसा दाढीतल्या दाढीत हसला असेल; तसेच हे सगळे राजनैतिक देखावे करताना, पाक पंतप्रधान नवाज शरीफ गालातल्या गालात आणि पाक सरसेनापती जनरल परवेझ मुशर्रफ मिशीतल्या मिशीत हसले असतील. कारण, हिंदूंना बेसावध ठेवून, त्यांचा विश्वासघात करण्याची त्यांची योजना केव्हाच सुरू झाली होती.
बघता-बघता २५ वर्षं उलटली त्या घटनेला. १९ फेब्रुवारी १९९९ हा तो दिवस होता. भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी एका भल्या मोठ्या बसमधून अमृतसरहून लाहोरकडे निघाले होते. ‘सदा-ए-सरहद’ म्हणजे ‘सरहद्दीची हाक’ असं मोठं काव्यात्मक नाव या बस फेरीला देण्यात आलं होतं. बसमध्ये पंतप्रधानांसोबत राजकीय सल्लागार, मुत्सद्दी यांच्याप्रमाणेच लोकप्रिय चित्रपट अभिनेते देव आनंद आणि शत्रुघ्न सिन्हा, कवी जावेद अख्तर, पत्रकार कुलदीप नय्यर, क्रिकेटपटू कपिल देव, चित्रकार सतीश गुजराल, सुप्रसिद्ध भरतनाट्यम् नर्तिका मल्लिका साराभाई इत्यादी झगमगती मंडळी होती.
ही बस पाकिस्तानच्या सीमेवरच्या बाघा या ठिकाणी पोहोचली. तिथे त्यांच्या स्वागताला पाक पंतप्रधान नवाज शरीफ जातीने उभे होते. प्रचंड जल्लोष झाला. मग दोन्ही पंतप्रधानांच्या वाहनांचे सजवलेले ताफे लाहोर शहरात पोहोचले. तिथे रावी नदीच्या काठावर ‘मिनार-ए-पाकिस्तान’ या २०० फूट उंचीच्या भव्य मनोर्यासमोर एका विशाल सभास्थानी भारताच्या पंतप्रधानांचं पुन्हा एकदा जंगी स्वागत करण्यात आलं. पाकिस्तान सरकारमधील झाडून सगळे मंत्री, राजकीय नेते आणि उच्च सरकारी अधिकारी तिथे उपस्थित होते. सगळ्यांनी गोड-गोड हसून मिठ्या-बिठ्या मारून, भारतीय शिष्टमंडळाचं स्वागत केलं. पाकिस्तानी सैन्याच्या भूदल, नौदल आणि वायुदलाच्या निवडक तुकड्यांनी भारताच्या पंतप्रधानांना मानवंदना दिली. सगळे औपचारिक राजकीय शिष्टाचार (प्रोटोकॉल) व्यवस्थित पार पाडण्यात आले.
अं! पण, तीनही सेनादलाचे प्रमुख कुठे दिसत नाहीत ते? तीनही दलांचे सर्वोच्च सेनापती आणि भूदल प्रमुख असणारे जनरल परवेझ मुशर्रफ, नौदल प्रमुख अॅडमिरल फसीह बोखारी आणि वायुदल प्रमुख एअर चिफ मार्शल परवीझ कुरेशी मेहदी हे कुठे दिसत कसे नाहीत? ही भारताच्या पंतप्रधानांची पाकिस्तानला अधिकृत भेट आहे. तीनही सेनाप्रमुखांनी पाहुण्या राष्ट्रप्रमुखांना भेटणं आणि कडक सॅल्यूट ठोकणं, हा राजशिष्टाचार आहे. पाकिस्तानी सेनापतींनी या समारंभाला गैरहजर राहणं, हे राजशिष्टाचाराचं सरळ-सरळ उल्लंघन होतं. भारतीय अधिकार्यांनी ही गोष्ट पंतप्रधान वाजपेयींच्या लक्षात आणून दिली असावी. पाकिस्तानात खरी सत्ता राजकारण्यांच्या नव्हे, तर सैन्याच्या हाती असते आणि तीनही सेनापतींनी गैरहजर राहून, हिंदू पंतप्रधानांना मानवंदना देणं टाळलेलं आहे, ही गंभीर संकटाची सूचना होती. पण, अटलजी मैत्र जोडायला आलेले होते. त्यांनी आपलं अमोघ वक्तृत्त्व सुरू केलं.
हम जंग न होने देंगे।
विश्वशांति के साधक हैं हम।
जंग न होने देंगे।
कभी न खेतों में फिर खुनी खाद फलेगी।
आस्मान फिर कभी ना अंगारे उगलेगा।
युद्धविहिन विश्व का सपना
फिर भंग न होने देंगे॥
खरोखरच धन्य आहेत, हे हिंदू लोक. दि. २३ मार्च १९४० या दिवशी अगदी याच ठिकाणी महंमद अली जिनांच्या नेतृत्वाखाली ’मुस्लीम लीग’चं अधिवेशन झालं होतं आणि मुसलमानांसाठी स्वतंत्र पाकिस्तानचा ठराव झाला होता. ’इंग्रजांच्या अमलाखालील भारत या देशात हिंदू आणि मुसलमान ही दोन भिन्न राष्ट्रे आहेत. आम्हा मुसलमानांना भावी काळात हिंदूंसोबत राहायचे नाही. आम्हाला आमचा वेगळा देश हवा,’ असं या ठरावात म्हटलं होतं. पुढच्या सातच वर्षांत जिनांनी आपलं हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवून दाखवलं होतं. पुढे १९६८ साली पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी ’मुस्लीम लीग’च्या त्या ऐतिहासिक अधिवेशन स्थळावर ’मिनार-ए-पाकिस्तान’ हा २०० फूट उंचीचा भव्य मनोरा उभारला होता. हिंदूंच्या बेछूट कत्तली करून, निर्माण झालेल्या पाकिस्तानच्या निर्मिती स्मारकासमोर आज भारताचा पंतप्रधान अगदी मनापासून कविता म्हणत होता-हम जंग न होने देंगे!
अटलजींची ती कविता आणि त्यांचं मनमोहक वक्तृत्त्व इतकं विलक्षण प्रभावी होतं की, त्या सभास्थानी उपस्थित असणारा एकूण एक माणूस अगदी भारून गेला. नंतरच्या आपल्या भाषणात पाक पंतप्रधान नवाज शरीफ म्हणाले की, “अटलजींच्या आजच्या भाषणाचा प्रभाव एवढा आहे की, ते पाकिस्तानात सुद्धा निवडणूक जिंकतील!” राजकारणात असं म्हटलं जातं की, इतिहास पुनःपुन्हा स्वतःची पुनरावृत्ती करत असतो. समान घटना पुनःपुन्हा घडत असतात. मात्र, त्या जशाच्या तशा नसतात. देश-काल-परिस्थितीनुसार त्यांच्या तपशिलात बदल होत असतो. कर्नाटकात (आताच्या तामिळनाडूमध्ये) जिंजी किल्ल्याच्या पायथ्याशी तळ ठोकून बसलेल्या, शहाजीराजे भोसले यांना आदिलशहाचा वजीर मुस्तफाखान याने गोडगोड बोलून असंच भुलवलं, गाफिल केलं आणि अखेर कैद करून साखळदंडांनी बांधून विजापुरात आणलं होतं.
दि. १९ फेब्रुवारी १९९९च्या भव्य स्वागत समारंभानंतर दि. २१ फेबु्रवारीला लाहोरमध्येच भारत-पाक यांच्यात मैत्रीचा करार झाला. १९७२ च्या ‘शिमला करारा’प्रमाणेच याला ’लाहोर करार’ म्हटलं गेलं. भारतात, पाकिस्तानात आणि एकंदर जगभरातल्या प्रसारमाध्यमांमध्ये याबद्दल भरभरून लिहिलं गेलं. त्यावेळी सोशल मीडिया आलेली नव्हती; पण दूरदर्शनवर असंख्य वाहिन्यांचं पेव फुटलेलं होतं. त्या सगळ्या वाहिन्यांवर चर्चा, परिसंवाद यांचा भरपूर गदारोळ झाला. दक्षिण आशियात शांती आणि सामंजस्याचं नवं पर्व म्हणून पश्चिमी माध्यमांनीही या घटनेला भरपूर ’कव्हरेज’ दिलं.
पण, शहाजीराजांना कुराणाची नि पोटच्या मुलाची कसम खाऊन विश्वास देणारा, नवाब मुस्तफाखान त्यावेळी जसा दाढीतल्या दाढीत हसला असेल; तसेच हे सगळे राजनैतिक देखावे करताना, पाक पंतप्रधान नवाज शरीफ गालातल्या गालात आणि पाक सरसेनापती जनरल परवेझ मुशर्रफ मिशीतल्या मिशीत हसले असतील. कारण, हिंदूंना बेसावध ठेवून, त्यांचा विश्वासघात करण्याची त्यांची योजना केव्हाच सुरू झाली होती. अगदी जन्मल्या क्षणापासून पाकिस्तानला काश्मीर प्रांत हवा होता; पण १९४७-४८, १९६५, १९७१ अशी तीन वेळा युद्धं करून आणि १९८८ पासून छद्म युद्धाद्वारे (प्रॉक्सी वॉर) काश्मीर खोर्यात घातपात, लुटालूट, बेछूट हत्याकांडे यांचा कहर करूनही काश्मीरवर ताबा मिळवता येईना. ऑक्टोबर १९९८ मध्ये जनरल मुशर्रफ हा पाकिस्तानचा सरसेनापती बनला. हा मुशर्रफ १९६५ आणि १९७१ अशा दोन्ही युद्धांत भारतीय सेनेविरुद्ध प्रत्यक्ष लढलेला होता. शिवाय तो पाक सेनेच्या ’स्पेशल सर्व्हिस ग्रुप’ या कमांडो दलातला अधिकारी होता.
काश्मीर प्रांतातलं काश्मीर खोरं आणि जम्मू विभाग हे दोन्ही भूभाग जिंकणं अशक्य आहे, असं पाहिल्यावर त्याने आपलं लक्ष आणखी पूर्वेकडच्या लद्दाख या भूभागाकडे वळवलं. (लद्दाख हा योग्य उच्चार. लडाख हे भ्रष्ट इंग्रजी उच्चाराचं अनुकरण.) लद्दाख हा भूभाग बर्फाळ आणि म्हणूनच अधिक दुर्गम. तिथली लोकसंख्या फारच विरळ आहे. १९७२च्या ‘शिमला करारा’नुसार, काश्मीर खोर्यातील उरी ते लद्दाख भागाचे मुख्यालय असणारे लेह यांच्या उत्तरेकडे प्रत्यक्ष ताबा रेखा- ‘लाईन ऑफ कंट्रोल’ उर्फ ’एलओसी’ आहे. या ’एलओसी’ला लागूनच उरी-बारामुल्ला-श्रीनगर-सोनमर्ग-झोजिला-द्रास-कारगिल-लेह असा ५३५ किमीचा भारताचा पहिला राष्ट्रीय महामार्ग ’नॅशनल हायवे नंबर वन’ उर्फ ‘एनएच-वन’ आहे. या ‘एनएच-वन’च्या उत्तरेच्या अत्यंत दुर्गम अशा पर्वतरांगेत १६ ते १८ हजार फूट उंचीची अनेक शिखरं आहेत. डिसेंबर ते एप्रिल या काळात तिथे इतकी कडाक्याची थंडी असते की, कुणीच तिथे जाऊ शकत नाही. त्यामुळे या पर्वत शिखरांवरच्या टेहळणी चौक्या रिकाम्या सोडून, भारतीय सैनिक खाली येतात नि मे महिन्यात परत तिथे जाऊन, ’एलओसी’वर पहारा देतात.
मुशर्रफने ठरवलं की, पाक सैनिक नागरी वेशात म्हणजे काश्मीर मुक्त करण्यासाठी स्वेच्छेने लढणार्या, ’मुजाहिद्दीन’ स्वयंस्फूर्त सैनिकांच्या वेशात फेब्रुवारीतच या पर्वत शिखरांवर जाऊन, पक्क्या चौक्या उभारतील. मेमध्ये भारतीय सैनिक तिथे आले की, त्यांना पिटाळून लावून, ’एनएच-वन’ ताब्यात घेतील. एकदा लेह मिळालं की, लद्दाख विभाग मिळालाच. मग संघर्षाला घाबरणारे हे हिंदू नेते ‘युनो’कडे धाव घेतील; कडक, अतिकडक वगैरे निषेध खलिते पाठवतील आणि समजा आलेच लढायला तर आता आपल्याकडे अणुबॉम्ब आहे. शिवाय या बावळट हिंदूंना क्रिकेटचं फार वेड आहे. क्रिकेटची मॅच बघताना, ते तहानभूक तर सोडाच, संडासला जायलासुद्धा विसरतात. तेव्हा ’विश्वचषक’ क्रिकेट स्पर्धा भरवून, तिच्या गुंगीत हिंदू समाजाला गुंग करून ठेवा.
मुशर्रफने बेत तर मोठा नामी आखला. इंग्लंड हा पाकचा जन्मदाता देश. मे १९९९ पासून इंग्लंडमध्ये ’विश्वचषक’ क्रिकेट स्पर्धा ठरवून, इंग्लंडने पाकला हिरवा बावटा दाखवला. पाक सैनिकांनी फेब्रुवारी १९९९च्या सुरुवातीला द्रास ते कारगिल भागात चौक्या उभारल्यासुद्धा. एवढंच नव्हे, तर ७ फेब्रुवारी १९९९ या दिवशी खुद्द मुशर्रफ त्यातल्या एका चौकीला भेटसुद्धा देऊन आले.
म्हणजे लक्षात घ्या, पाकचा सरसेनापती भारताच्या हद्दीत बेकायदा उभ्या केलेल्या चौक्यांना भेट देण्यासाठी, बेधडक आंतरराष्ट्रीय सरहद्द ओलांडून आला. सगळा बंदोबस्त बघून गेला. ही घटना दि. ७ फेब्रुवारीची आणि दि. १९ फेब्रुवारीला पाकचे पंतप्रधान भारताच्या पंतप्रधानांचं मानभावीपणे स्वागत करून, दि. २१ फेब्रुवारीला त्यांच्याशी शांततेचा करार करत होते. फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल संपले. ३ मे १९९९ या दिवशी पाकच्या घुसखोरीची पहिली खबर भारतीय सैन्याला कारगिल भागातल्या मेंढपाळांकडून मिळाली. प्रत्याघात करायला हिंदू समाजाला नेहमीच वेळ लागतो. पण, मग एकदा का तो जगन्नाथाचा रथ चालू झाला की, मग सगळे विरोधक पाचोळ्यासारखे उडून जातात. तसंच भारतीय सैन्य आणि हिंदू समाज हे युद्धोन्मुख व्हायला महिनाभराचा काळ लागला. ६ जून १९९९ या दिवसापासून भारतीय सैन्याचा जबरदस्त प्रत्याघात सुरू झाला. भंपक क्रिकेट स्पर्धा, त्यात शरीर प्रदर्शन करीत कॉमेंट्री करणार्या चवचाल नट्या, राजकारण्यांचे भ्रष्टाचार इत्यादी विषय कुठच्या कुठे उडून गेले आणि घराघरातल्या दूरदर्शनवरून भारतीय लष्कराच्या गगनभेदी बोफोर्स तोफा गर्जू लागल्या. दैनिकं, साप्ताहिकं, मासिकं विशेष वार्ताहर पाठवून, विशेषांक काढून वाचकांना युद्धवार्ता देऊ लागली. हिंदू समाजात एक अपूर्व युद्ध उत्साह निर्माण झाला. तो अनुभवून शेळपट समाजवादी साहित्यिक आणि लबाड साम्यवादी विचारवंत बावरले.
आणि भारतीय सैन्यातल्या बहाद्दरांनी खरोखरच कमाल केली. भौगोलिक परिस्थिती संपूर्ण प्रतिकूल होती. भारतीय सैनिक १६ ते १८ हजार फूट उंचीच्या शिखरांच्या पायथ्याशी सपाटीवर होते, तर पाक सैनिक त्या शिखरांच्या माथ्यावर पक्के बंकर्स बनवून बसले होते. आमचे बहाद्दर जवान वरून बरसणार्या गोळ्यांच्या वर्षावात ते सरळसोट उभे कडे चढून गेले आणि हातघाईची लढाई करून, त्यांनी ते बंकर्स जिंकले. ग्रेनेडियर योगेंद्रसिंग यादव, लेफ्टनंट मनोजकुमार पांडे, कॅप्टन विक्रम बात्रा किती नावं घ्यावीत? २६ जुलै १९९९ या दिवशी भारतीय सैन्याने शेवटचा पाकी सैनिक भारतीय भूमीवरून हाकलला.
शहाजीराजांना कैद केल्यावर, आदिलशहाने फर्रादखान नामक सरदाराला शहाजी राजाचं बंगळूर शहर जिंकण्यासाठी आणि फत्तेखानाला पुणं जिंकण्यासाठी पाठवलं होतं. फक्त १८ वर्षांचे असलेल्या शिवरायांनी फत्तेखानाचा, तर त्यांचे सख्खे थोरले बंधू संभाजीराजे यांनी फर्रादखानाचा सणसणीत पराभव केला होता.