पुणे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. यावेळी पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यामुळे या प्रकल्पाला गती मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाल्याचे मानले जात आहे.
पुणे आणि नाशिक या दोन शहरांदरम्यान अधिक जलद दळणवळणाची सुविधा उपलब्ध व्हावी अशी अनेक वर्षांची मागणी आहे. यासंदर्भात, पुणे- नाशिक हायस्पीड रेल्वेमार्ग प्रकल्पाकडे लक्ष लागून राहिले आहे. दोन्ही शहरांना जोडणारा हा सुमारे २२५ किलोमीटरचा रेल्वेमार्ग आहे. हा मार्ग झाल्यास या दोन्ही शहरांतील प्रवास अधिक सुलभ होईल, विकासाला अधिक गती मिळेल त्याचप्रमाणे दोन्ही शहरांदरम्यान असलेल्या गावांनाही या मार्गाचा लाभ होईल.
त्यामुळे हा मार्ग लवकरात लवकर व्हावा, अशी अपेक्षा अनेकदा व्यक्त केली गेली आहे. पुणे - नाशिक या हायस्पीड रेल्वे प्रकल्पामुळे गेल्या अनेक वर्षांची पुणे व नाशिक शहरातील नागरिकांची मागणी पूर्ण होणार आहे.