आपण जगाच्या विकासात शांतीपूर्ण भूमिका निभावण्याचा प्रयत्न करतोय, असे चीन भासवत असतो. त्यामुळेच रशिया-युक्रेन युद्ध असू दे की, इस्रायल- हमास युद्ध असू दे, चीन नेहमी म्हणतो की, हे युद्ध थांबवा. तसेच सध्या पाकिस्तानमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभूतपूर्व अंतर्गत असंतोष माजला आहे. यावरही चीनने म्हणे पाकिस्तानला विनंती केली आहे की, पाकिस्तानच्या शांततेसाठी सगळ्या राजकीय पक्षांनी एकत्रित यायला हवे. चीन असे म्हणतो त्यावेळी एकच वाटते की, कुत्र्याचे शेपूट सरळ होणार का? कसे आहे? विंचू नांगी मारायचे सोडेल का? खरेच आहे चीनने कितीही शांतीदूत आहोत, असे भासवले तरीसुद्धा चीन जगाच्या कुरापती काढणार नाही, असे होणे नाही.
उदाहरणार्थ, नुकतेच चीन जगाला भासवत होता की, आपण भूतानशी शांतीवार्ता करत आहोत. मात्र, अमेरिकन उपग्रहाने चीनचे खरे रूप (जे आधीच जगाला माहिती आहे) उघडे केले. चीनने भूतानशी शांतीवार्ता करण्याचा बहाणा करत, सगळ ठीक आहे, असे भासवले. प्रत्यक्षात मात्र चीनने भूतानच्या सीमेवर तीन गावे वसवली. तिथे 235 चीनसमर्थक कुटुंबांना वसवले. इतकेच काय? चीन आणि भूतान सीमेवरच्या तमालुंग गावाचा आकार आता दुप्पट आहे. या गावात चीनने तिबेट स्वायत्त क्षेत्रातील 38 कुटुंबांना वसवले. चीनच्या समोर भूतान अतिशय लहान देश. आर्थिक आणि जागतिक स्तरावर चीन आणि भूतानची बरोबरी होऊच शकत नाही. मात्र, भूतानची स्वतःची सामाजिक आणि धार्मिक संस्कृती आहे. इतिहास आहे, अशा परिस्थितीत चीन एकीकडे भूतानशी सलोख्याचे मैत्रीचे संबंध दाखवले. दुसरीकडे भूतान सीमेवरील गावावर चीन कब्जा करत आहे. या गावातील दारिद्य्र रेषेखालील कुटुंबाचे जीवनमान उंचावत आहोत, असेही चीनचे म्हणणे. मात्र, या गावात चीनने वसवलेल्या घरात चीनचे राष्ट्रपती जिनपिंगचा फोटो लावला आहे. भूतान नव्हे, तर चीनचे नागरिक आहोत, असेच एकंदर वातावरण या कुटुंबांच्या घरात आहे. चीनसाठी यात नवल आणि नवे काहीच नाही.
चीन आजूबाजूच्या सगळ्याच शेजारी देशांना कायमच डोकेदुखी ठरला आहे. भारत आणि भूतान हे दोन देश सोडले, तर चीनने शेजारील 12 देशांशी सीमावादावर त्याच्यापरीने तोडगाही काढला आहे. चीनच्या परीने तोडगा म्हणजे काय? तर आजूबाजूच्या छोट्या देशांना पायाभूत सुविधासाठी कर्ज देतो, सीमा भागावरील गावांना मूळ प्रवाहात आणतो, असे दाखवत चीनने त्या शेजारील देशांच्या सीमेवर आपले व्यवस्थित बस्तान बांधले. देशाच्या विकासकामात सहकार्य करतो म्हणतो पाकिस्तान आणि श्रीलंकेमध्ये चीनने काय परिस्थिती आणली, हे सगळ्या जगाने पाहिले. दोन्ही देशाचा आर्थिक डोलारा कोसळला. सामाजिक आणि राजकीय संघर्ष शिगेला पोहोचला. इथेच चीन थांबला नाही, तर आफ्रिकेतील गरीब देशांनाही चीनने जाळ्यात ओढले. अमेरिकेमध्ये हजारो हेक्टर जमीन चीनने भाडे तत्वावर शेतीसाठी घेतली आहे. जागतिक अभ्यासकांच्या मते, चीनचा हा दिखावा आहे.
असो. नुकतेच चीन आणि नेपाळ वादही चव्हाट्यावर आला. 70च्या दशकांपासून नेपाळने पोखरा विमानतळासाठी काम सुरू केले. पण, भांडवलाअभावी ते काम पूर्णत्वास येत नव्हते. नुकतेच पोखरा विमानतळ पूर्णत्वास आले. लगेच चीनने म्हटले की, पोखरा विमानतळ हे चीनच्या ‘बेल्ट अॅण्ड रोड इनिशिएटिव्ह’ (बीआरआय)अंतर्गत केलेला प्रकल्प आहे. चीनने असे म्हटले कारण, ‘बीआरआय’अंतर्गत येणार्या प्रकल्पावर चीनचे प्रभुत्व असते. मात्र, नेपाळचे म्हणणे आहे की, नेपाळने ‘बेल्ट ‘बीआरआय’ अंतर्गत चीनसोबत केवळ करारावर हस्ताक्षर केले. अजून याअंतर्गत कोणतेही काम झाले नाही. पोखरासाठी चीनने कर्ज दिले आहे. त्यामुळे चीनचा या विमानतळावर कोणताही अधिकार नाही. पोखरा विमानतळावर चीनने सांगितलेल्या अधिकारामुळे नेपाळची जनता भयंकर चिडली. रस्त्यावर उतरली. कारण, पोखरा विमानतळ हा नेपाळचा राष्ट्रीय अभिमानाचा विषय आहे. यामुळे चीन आणि नेपाळचे संबंध तणावग्रस्त झाले आहेत. दुसरीकडे चीनमध्ये अंतर्गत तणावही वाढतच आहे. चीन जागतिक स्तरावर मजबूत आहोत, असे दाखवतो. मात्र, येणारा काळ चीनची खरी आंतरिक स्थिती उलगडून दाखवेल, हे नक्की!
9594969638