मोठी बातमी! 'या' विभागातील पदभरती परीक्षा २० व २१ फेब्रुवारीला होणार

19 Feb 2024 16:04:07
Department of Soil and Water Conservation Recruitment

मुंबई : 
 मृदा व जलसंधारण विभागाच्या अधिपत्याखालील राज्यस्तर व जिल्हा परिषद यंत्रणेतील जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट-ब (अराजपत्रित) या संवर्गातील ६७० रिक्त पदे सरळसेवेने भरण्यात येणार आहेत. यासाठी आयुक्त, मृद व जलसंधारण, छत्रपती संभाजीनगर यांच्यामार्फत दि. १९/१२/२०२३ रोजी या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून परीक्षा टी.सी. एस. कंपनीमार्फत, ऑनलाईन पद्धतीने दि. २० व २१ फेब्रुवारी २०२४ रोजी २८ जिल्ह्यामध्ये एकूण ६६ केंद्रांवर घेण्यात येणार आहे. ही परीक्षा पारदर्शी व व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी पुरेशी दक्षता घेण्यात आली असून यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्याची माहिती मृद व जलसंधारण सचिव सुनील चव्हाण यांनी दिली.


जरूर वाचा >>  NABARD Recruitment 2024 : विविध पदांकरिता भरती सुरू, जाणून घ्या कसा कराल अर्ज

सर्व परीक्षा केंद्रांवर सी.सी.टि.व्ही.यंत्रणा, जॅमर यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांवर उमेदवारांची पूर्वतपासणी करुनच प्रवेश देण्यात येणार आहे. उमेदवारांस कोणत्याही स्वरुपाचे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स, ब्लुटुथ उपकरणे इत्यादी वापरण्यास व बाळगण्यास बंदी असणार आहे. उमेदवार प्रणालीमध्ये इंटरनेट अॅक्सेस नसणार आहे. शिवाय प्रश्नपत्रिका सीलबंद आणि सुरक्षितता बाळगून व्हीपीएन वापरुन डेटा सेंटरमध्ये हस्तांतरित केली जाणार आहे.
 
संपूर्ण परीक्षा पारदर्शी पध्दतीने पार पाडण्याबाबत swcd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सविस्तर सूचना प्रसारित केल्या आहेत. यासंदर्भात टीसीएस कंपनीचे प्रतिनिधी व संबंधित शासकीय अधिकाऱ्यांची मंत्रालयात दि. १८ फेब्रुवारीला सविस्तर बैठक घेवून सूचना दिल्याची माहितीही चव्हाण यांनी दिली.
 
परीक्षा केंद्राबाहेर आवश्यक पोलीस बंदोबस्त उपलब्ध करण्याबाबत सूचना देण्यात आल्या असून सर्व परीक्षा केंद्रांवर विभागाकडून निरीक्षक नेमण्यात आलेले आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एम.पी.एस.सी.) अभियांत्रिकी सेवा परीक्षा, २०२२ च्या मुलाखती दिनांक २०/०२/२०२४ ते दि.२७/०२/२०२४ या कालावधीत आयोजित केल्या आहेत. सदरहू अभियांत्रिकी सेवा परीक्षा, २०२२ च्या मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या व दि.२० व २१ फेब्रुवारी, २०२४ रोजीच्या परीक्षेस बसलेल्या उमेदवारांच्या मुलाखती पुढे ढकलण्याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगास विनंती करण्यात आली असून आयोगाकडून मुलाखतीसाठी सुधारित दिनांक देण्यात येणार आहे. याची सर्व संबंधित परीक्षार्थींनी नोंद घेण्याचे आवाहन सचिव चव्हाण यांनी केले आहे.

Powered By Sangraha 9.0