‘लोकल ते ग्लोबल’ होण्याच्या शर्यतीत आणि जागतिकीकरणाच्या चढाओढीत या जगालाच जणू निसर्गाचा, पर्यावरणाचा आणि पर्यायाने होणार्या अपरिमित नुकसानाचा विसर पडतोय का, असा प्रश्न उपस्थित केला तर तो अजिबात वावगा ठरू नये. मोठमोठ्या कंपन्या, प्रचंड प्रदूषण निर्माण करणारे कारखाने यांची संख्याही वाढत असताना, यावर फेरविचार केला जातोय का, हाही एक प्रश्नच.
बरं, अविकसित आणि विकसनशील देश सोडाच; पण विकसित देशांनी या महत्त्वाच्या प्रश्नांना प्राधान्यक्रमाने विचारात घ्यायला हवे ना? दक्षिण अमेरिकेतील चिलीमध्ये सर्वांत मोठ्या रस्त्याच्या बांधकामामुळे वर्षानुवर्षे जुने असलेल्या जंगलाचे, काही झाडांचे आणि पर्यायाने तेथील जैवविविधतेचे नुकसान होणार असल्याचे काही अहवाल आणि वृत्त प्रसिद्ध झाले आहे. या रस्त्याच्या बांधकामामुळे काही प्राचीन आणि दीर्घायुषी वनस्पतींच्या प्रजातींचे नुकसान होणार आहे, असे स्पष्ट मत शास्त्रज्ञांनी अहवालात मांडले आहे. या रस्त्याचा काही भाग म्हणजेच जवळजवळ दहा किलोमीटर (सहा मैल) इतका ‘अलेर्स कोस्टेरो नॅशनल पार्क’मधून जातो. प्रस्तावित असलेल्या या मार्गावर अलेर्सचे पुरातन वृक्ष आहेत. या प्रजातींच्या संरक्षणासाठी तयार करण्यात आलेले, हे एक संरक्षित क्षेत्र.
रस्त्याचा एक भाग ‘अलेर्स कोस्टेरो नॅशनल पार्क’मधून जाईल, जे संरक्षित क्षेत्र आहे. ‘अलर्स (फिटझरोया कप्रेसॉईड्स)’ हे जगातील सर्वाधिक काळ जगणार्या वृक्ष प्रजातींपैकी एक संरक्षित प्रजाती. या प्रजाती केवळ चिली आणि अर्जेंटिनामध्ये आढळत असून, अनेक दशकांच्या अंदाधुंद वृक्षतोडीमुळे ’इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर’ (खणउछ) आणि चिली सरकार यांनी लुप्तप्राय म्हणून वर्गीकृत केले आहे. ’सायन्स’ या वैज्ञानिक पत्रिकेमध्ये प्रकाशित केलेल्या, एका पत्रामध्ये शास्त्रज्ञ आणि संशोधकांनी या रस्त्याच्या कामाविषयी धोक्याचा इशारा दिला असून, याबरोबर शेकडो प्राचीन झाडांचे नुकसान अटळ असून, त्याचबरोबर तेथील जैवविविधतेलाही मोठा धोका पोहोचणार असल्याचे सांगितले आहे.
या क्षेत्रामध्ये लुप्तप्राय प्रजातींचा समावेश असून, हा एक आणखी मोठा धोका आहे. या प्रकल्पांतर्गत किती झाडे तोडण्यात येतील, याचा कोणताही आकडा उपलब्ध नाही, असाही आक्षेप या अहवालातून नोंदवण्यात आला आहे. जंगल परिसरात लागणारे ९९ टक्के वणवे मानवी कारणांमुळे लागतात, असे त्यांचे म्हणणे असून, त्यापैकी काही चुकून अपघाताने लागलेले किंवा जाणीवपूर्वक लावलेले असतात, असेही संशोधकांनी नमूद केले आहे. अशा प्रकारे लागणार्या वणव्यांमध्ये अनेक प्रजाती भरडल्या जातात. तसेच जैवविविधेतेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. म्हणूनच या परिसरात नष्टप्राय आणि मोठ्या प्रमाणावर धोक्यात असलेल्या प्रजातींचा प्रश्न निर्माण होत आहे.
दुसरीकडे, या ठिकाणी यापूर्वीही रस्ता अस्तित्वात होताच. काही कारणाने वापर बंद झाल्यानंतर, तिथे झाडांची वाढ होऊन, जंगलाची निर्मिती झाली, असा युक्तिवाद केला जातो. पूर्वीच्या रस्त्यामुळे नुकसान होत नव्हते का, असा सवाल उपस्थित केला जात असताना, या रस्त्याचे राष्ट्रीय उद्यानाचा परिसर वगळला, तर उर्वरित काम पूर्ण झालेले आहे. विकासाची पाऊले उचलताना, जैवविविधतेचे नुकसान होणारच का, तर थोड्याफार प्रमाणात होईलही. पण, ते परिणाम कमीत कमी कसे करता येतील, यावर लक्ष केंद्रित करणेही तितकेच आवश्यक आहे.
महाराष्ट्र हे भारतातील एकमेव असे राज्य आहे की, ज्याने ’समृद्धी महामार्ग’ हा राज्यातील सर्वांत लांब महामार्ग तयार करताना, त्यामध्ये ‘वाईल्डलाईफ मिटिगेशन मेजर्स’ म्हणजेच ‘वन्यजीव शमन उपायांचा वापर’ केला गेला. ‘अंडरपासेस’ आणि ‘ओव्हरपासेस’ यांची निर्मिती करत, या महामार्गामध्ये येणार्या अभयारण्यातील वन्यजीवांना कसा कमीतकमी फटका बसेल, त्यादृष्टीने प्रयत्न केले गेले. दक्षिण अमेरिकेसारख्या देशात हे शक्य नाही का? महामार्गाची बांधणी जरी विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची असली, तरी वन्यजीव आणि पर्यावरण यांचा अजिबात विसर पडू न देता, त्यावर उपाय शोधणे गरजेचे आहे. शासकीय स्तरावरील अधिकार्यांबरोबरच निसर्गाचा शास्त्रीय अभ्यास आणि संवर्धन करणार्या सर्व मंडळींनी एकत्रितपणे यावर उपाय शोधायला हवा, तरच हा मार्ग विनाशाचा नव्हे तर शाश्वत विकासाचा ठरेल, यात यत्किंचितही शंका नाही.