कर्तृत्वाची उत्तुंग झेप...

19 Feb 2024 19:56:07
Article on Aarti Kamble

राष्ट्रीय स्तरावर यशस्वी उद्योजिका म्हणून स्वतःचे अस्तित्व निर्माण करणार्‍या, मुंबईच्या आरती कांबळे. प्रचंड श्रद्धाशील, कष्टाळू आणि बुद्धिमान आरती यांच्या जीवनाचा मागोवा घेणारा हा लेख...
 
रात्रीचे ११ वाजले होते. आरती आणि त्यांचे पती अतीन दिवसभराचे काम आटपून नुकतेच झोपले होते. इतक्यात फोन वाजला. समारेच्या व्यक्तीने विचारले की, ’‘अरुणाचलमध्ये कधी येणार?” आरती आणि अतीन यांनी सल्लामसलत करत, समोरच्या व्यक्तीला सांगितले की, ’‘आलोच!” त्यानंतर दोघे रात्री अडीच वाजताच्या विमानाने पहाटे अरुणाचलला पोहोचले. गेले तीन वर्षं ‘तो’ प्रकल्प मिळवण्यासाठी आरती आणि अतीन प्रयत्नरत होते. ‘इतका महत्त्वाचा मोठा प्रकल्प तुमच्यासारख्या छोट्या उद्योजकांना का देतील?’ असे अनेकांनी त्यांना म्हटलेही होते, तरीसुद्धा आरती आणि अतीनने हा प्रकल्प मिळवण्यासाठी अथक प्रयत्न सुरू ठेवले. त्यासाठी सगळ्या कायदेशीर बाबी, संपर्क संबंध सगळे-सगळे अभ्यास करून निर्माण केले होते. शेवटी संबंधितांकडून त्यांना तो प्रकल्प मिळालाच. अरुणाचलसारख्या राज्यामध्ये मुंबईतून जाऊन मोठा प्रकल्प चालवणे म्हणजे जावे त्यांच्या वंशाच!

पण, आरती यांनी स्थानिक नागरिकांशी सलोख्याचे संबंध निर्माण केले, त्यांच्या आरोग्य आणि शिक्षणासाठी सेवा करणे सुरू केले. इतकेच नाही, तर त्या प्रकल्पामध्ये स्थानिक, होतकरू, गुणवान लोकांना काम करण्याची संधी दिली. इतरही विकासकामे सुरू केली. ’आरती पॉवर अ‍ॅडव्हेंचर प्रा. लि.’अंतर्गत ’यामिंग ग्रीन एनर्जी’ कंपनीच्या माध्यमातून ही कामे अरुणाचलमध्ये सुरू आहेत. मराठी माणूस उद्योगधंदा करू शकत नाही.तसेच महिला फक्त पापड-लोणची बनवू शकतात, हा एक जो गैरसमज आहे, त्याला आरती कांबळेंनी छेद दिला. देवाधर्मावर प्रचंड श्रद्धा आणि विश्वास असलेल्या आरती कांबळे यांनी सिद्ध केले की, माणूस त्याच्या कर्तृत्वाच्या आणि गुणांच्या जोरावर सगळे विश्व जिंकू शकतो. आरती कांबळे यांना अयोध्येतील राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी संबंधित यंत्रणेकडून आमंत्रणही होते. चेंबूर येथे राहणार्‍या आरती कांबळे यांचा हा यशपूर्ण प्रवासाचा मागोवा घेताना जाणवते की, त्यांनी नेहमी मानवी मूल्ये जपली. भारतीय संस्कार, कुटुंब पद्धती यांना प्राधान्य दिले.

आरती कांबळे या माहेरच्या अनिता शेरखाने. विठ्ठल शेरखाने आणि गोदावरी हे दाम्पत्य मूळचे कर्नाटकातले. दोघांना चार अपत्ये. त्यापैकी एक अनिता. विठ्ठल यांनी लेकीला तळहाताच्या फोडासारखे जपले. बाबांचा छोटा उद्योग त्यातील संघर्ष आणि सचोटीने त्यांनी नावारुपाला आणलेला, त्यांचा बांधकाम व्यवसाय हे सगळे अनिता जवळून अनुभवत होत्या. त्यांना कलाक्षेत्रात रस होता. महाविद्यालयीन दशेतच त्यांनी ’फॅशन डिझायनिंग’चा कोर्स केला. कोर्स केल्यानंतर त्यांनी घरी प्रदर्शन आयोजित केलेे. त्या प्रदर्शनामधील अनिता यांच्या कलाकृती, कल्पकता पाहून सगळे जण विठ्ठल यांचे अभिनंदन करत म्हणू लागले की, ’लेक कर्तृत्ववान, हुशार आहे!’ त्यावेळी विठ्ठल यांच्या डोळ्यात आनंदाचे, अभिमानाचे अश्रू तरळले. वडिलांच्या डोळ्यातले ते आनंद, अभिमानाचे अश्रू अनिता यांच्या प्रेरणेचे स्रोत ठरले. खरे तर अनिता यांच्या घरी पैशांची कमतरता नव्हतीच. पण, तरीही स्वतः काहीतरी करायला हवे, म्हणून महाविद्यालयात शिकत असताना, त्यांनी स्वतःचा ’फॅशन डिझायनिंग’चा व्यवसाय सुरू केला.

असो. पुढे त्यांचा विवाह अतीन कांबळे यांच्याशी झाला. विवाहानंतर अनिता यांचे नाव आरती झाले. आरती यांच्या सासरी तीन पिढ्यांचे संयुक्त कुटुंब. माहेरी चमचाही हाताने न घेणार्‍या, आरती त्यांना सून म्हणून घरातल्या सगळ्या जबाबदार्‍या सांभाळाव्या लागल्या. या कामी त्यांच्या आज्जेसासू आणि सासूबाई, नंणद यांनी सहकार्य केले. घर सांभाळतानाच, आरती यांनी ’फॅशन डिझायनिंग’मध्ये पुढील शिक्षण घेतले. वडिलोपार्जित व्यवसायासोबतच स्वतःचा व्यवसाय सुरू करावा म्हणून अतीन आणि आरती खाद्यपदार्थ वितरण व्यवसायात उतरले. ’आरती इंटरप्रायझेस’च्या नावाने उद्योग सुरू झाला. घरदार, सगेसोयरे, पैपाहुणे सगळे सांभाळत, आरती १८-१८ तास काम करू लागल्या.

काही वर्षांतच ’आरती इंटरप्रायझेस’ कोट्यवधींची उलाढाल करू लागले. पुढे आरती यांनी ’आय लव्ह’ हा ब्रॅण्ड सुरू केला. या माध्यमातून अन्नधान्य, सुकामेवा, खाद्यपदार्थ यांसंदर्भातला व्यवसाय सुरू झाला. या ब्रॅ्रण्डमध्ये सर्वच कामासाठी महिलांना संधी दिली गेली. ’कोरोना’ काळ आरती यांच्यासाठी खडतर होता. त्यांच्या लाडक्या पित्याचा मृत्यू ‘कोरोना’ काळातच झाला. आरती यांच्या उद्योगालाही झळ बसली. मात्र, आरती यांनी एकाही कामगाराला कमी केले नाही. काम नसतानाही सर्वच कामगारांना वेतन आणि सुविधा दिल्या. आरती यांना सख्खे आणि चुलत मिळून ११ नंडा आणि आठ दीर आहेत आणि या सगळ्यांच्या आरती लाडक्या वहिनी आहेत. आरती म्हणतात, “उद्योग क्षेत्रातले विश्वासू नाव; मात्र माहेर आणि सासर या दोघांचेही हक्काचे मायेचे ठिकाण म्हणजे आरती आहेत.”
 
आरती म्हणतात की, ”आज मी जे आहे, ते माझ्या बाबांमुळे. माझे तिन्ही भाऊ आणि पतीही माझ्यासोबत नेहमीच उभे राहिले. माझ्या वडिलांनी शिकवले की, पैसा मिळवणे सोपे आहे. मात्र, त्या पैशातून समाजाचे ऋण फेडता येणे महत्त्वाचे. ते ऋण मला फेडायचे आहे.” तर अशा सामाजिक बांधिलकी जपणार्‍या, यशस्वी उद्योजिका आरती या खरोखर देशाच्या उद्योग-व्यवसाय आणि सामाजिक क्षेत्रातल्या आदर्श आणि दिशादर्शक आहेत.

९५९४९६९६३८
Powered By Sangraha 9.0