रशियातील विरोधी पक्षनेते आणि व्लादिमीर पुतीन यांचे कट्टर विरोधक अलेक्सी नवलनी यांचा तुरुंगातच संशयास्पद मृत्यू झाल्याने, रशियात खळबळ उडाली आहे. अलेक्सी यांना तुरुंगात विष देण्यात आल्याची माहिती असून, त्यांना वाचविण्याचा प्रयत्नदेखील तुरूंग अधिकार्यांनी केला नसल्याचे बोलले जात आहे. अलेक्सी यांच्या पत्नी युलिया यांच्यासहित अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनीही नवलनी यांच्या मृत्यूसाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना जबाबदार धरले आहे. बेलारूसमधून निष्कासित विरोधी पक्षनेत्या स्वेतलाना तिखानोव्स्काया यांनीही पुतीन यांनाच या मृत्यूसाठी जबाबदार मानले आहे.
या संशयास्पद मृत्यूनंतर रशियासहित अनेक देशांमध्ये पुतीन यांच्याविरोधात नागरिकांनी रस्त्यावर उतरत, विरोध प्रदर्शन केले. ब्रिटन, फ्रान्स, इटली, बल्गेरिया, सर्बिया, अर्जेंटिना या देशांमध्ये लोकांनी रशियन उच्चायुक्ताला घेराव घालत आंदोलन केले. दरम्यान, मृत्यूच्या एक दिवस आधी म्हणजेच, दि. १५ फेब्रुवारी रोजी अलेक्सी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयीन सुनावणीला हजर होते. या व्हिडिओत नवलनी एकदम ठणठणीत असल्याचे दिसून येत असून, ते न्यायाधीशांसोबत हास्यविनोदसुद्धा करताहेत. मात्र, तुरूंग प्रशासनाने तुरुंगात चालताना, अलेक्सी बेशुद्ध होऊन खाली कोसळले आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले आहे.
मॉस्को पोलिसांनी याप्रकरणी काही जणांना ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी सुरू आहे. नवलनी हा काही साधासुधा व्यक्ती नव्हता. थेट पुतीन यांना ललकारणारा माणूस म्हणून त्यांना ओळखले जायचे. रशियामध्ये लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी, ते प्रयत्नशील होते. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी रशियातील भ्रष्टाचार, लोकशाहीची पुनर्स्थापना करण्यासाठी लढा सुरू ठेवला. सामान्यांच्या अधिकारांसाठी ते नेहमी संघर्ष करत राहिले. अनेकदा त्यांच्यावर विषप्रयोग होऊनही, ते जीवंत राहिले. नवलनी यांच्या मृत्यूकडे आता राजकीय हत्या म्हणून पाहिले जात आहे. ४७ वर्षीय नवलनी यांना आर्क्टिक सर्कलच्या उत्तरेस ४० मैल अंतरावर असलेल्या, तुरुंगात ठेवण्यात आले होते. या तुरुंगात जगभरातील सर्वात धोकादायक कैद्यांना ठेवले जाते, ज्याला ’पिनल कॉलनी’ असेही म्हणतात. या तुरुंगात कैद्यांना इतक्या यातना दिल्या जातात की, ते स्वतःहून गतप्राण होतात.
उणे तापमानात अनवाणी चालणे, सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत कैद्यांना फक्त चालणे किंवा उभे राहणे म्हणजे या तुरुंगात कैद्यांना दिवसभरात बसण्याची परवानगी नसते. त्यामुळे इतक्या यातना सहन केल्यामुळेच, अलेक्सी यांनी जीव सोडला का, असा प्रश्न उभा राहत आहे. मात्र, जोपर्यंत अलेक्सी जीवंत राहिले, त्यांनी पुतीनविरोधात देशभर एल्गार पुकारला होता. आपली हत्या होऊ शकते, याची भविष्यवाणी त्यांनी आधीच केलेली होती आणि तसेच घडलेसुद्धा. मात्र, अलेक्सी हे पुतीन यांचे कट्टर विरोधक का बनले, हेदेखील जाणून घेणे आवश्यक आहे. २०११ साली अलेक्सी यांनी पुतीन यांच्या पक्षामध्ये सुरू असलेल्या, भ्रष्टाचाराची पोलखोल केली. त्यांना १५ दिवसांसाठी तुरुंगात पाठविण्यात आले.
२०१३ साली नवलनी यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली तुरुंगात पाठविण्यात आले. २०१७ साली अलेक्सी यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. २०१९ साली विरोध प्रदर्शन केल्याने, ३० दिवसांचा तुरूंगवास झाला. याचवर्षी त्यांना विष देऊन, मारण्याचाही प्रयत्न झाला. २०२० साली पुन्हा त्यांच्यावर विषप्रयोग करण्याचा प्रयत्न झाल्याच्या बातम्या समोर आल्या. २०२१ साली नवलनी यांना थेट १९ वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आणि आता तर त्यांच्या मृत्यूचीच बातमी समोर आली आहे. यानंतर जगभरात अलेक्सी यांच्या समर्थनार्थ रॅली काढल्या जात आहेत. सर्वांचा सवाल एकच आहे की, अचानक नवलनी यांचा मृत्यू कसा झाला?
नवलनी हे रशियात निवडणुकांतील पारदर्शकतेसाठी आग्रही होते. २०१३ साली मॉस्कोच्या महापौरपदासाठी ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि दुसर्या स्थानी राहिले. पुढे त्यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढविण्याचादेखील प्रयत्न केला; मात्र स्वतःवर दाखल गुन्ह्यांमुळे त्यांना ही निवडणूक लढविता आली नाही. एकूणच नवलनी यांच्या मृत्यूचे गौडबंगाल समोर येईल, असे तूर्त वाटत नसले, तरीही रशियासाठी आणि त्याचबरोबर व्लादिमीर पुतीन यांच्यासाठी ही धोक्याची घंटा नक्कीच आहे.