वेध संस्कृतीचा

17 Feb 2024 22:31:39
Vedha Sanskruticha book

कोणतेही पुस्तक वाचायला हातात घेताना आपण काय पाहतो? पुस्तकाचं नाव? लेखकाचं नाव? मुखपृष्ठ? बरोबर. त्यानंतर विकत घ्यायचं ठरत असेल, तर आपण त्याच मागचं पान पाहतो. मलपृष्ठावर पुस्तकाचं मर्म लक्षात येईल, असा एखादा परिच्छेद असतो. मी काय पाहते माहितीय, पुस्तकाची अर्पणपत्रिका! त्या संबंध कोर्‍या पानावर केवळ चार-पाच शब्दच लिहून, पान फुकट का घालवले आहे, असा प्रश्न मला पूर्वी नेहमी पडत असे. याच कुतूहलातून अर्पणपत्रिकेतला आत्मा लक्षात येऊ लागला. लेखिकेच्या त्याच्या लिखाणाप्रति असलेल्या भावना इथेच लक्षात येतात आणि आपण स्वतःला त्या पुस्तकाशी जोडून घेऊ शकतो.

लेखिकेने हे पुस्तक आपल्या सासूबाईंना आणि सर्व मावस सासूबाईंना अर्पण केलंय. त्यांच्या एकत्रित कुटुंब पद्धतीचा आणि एकत्र जमल्यानंतरच्या एकमेकांप्रति जिव्हाळ्याच्या संबंधांबाबत हे पण सांगतं. स्वाती काळे या अतिशय संवेदनशील लेखिका. आपल्या आजवरच्या आयुष्यात मतं गेलेल्या तरंगांना नेमके जोखून, त्यांनी आजवर लेखन केलं. त्यांच्या ’गोष्टीपलीकडचे महाभारत’ या पुस्तकाला अनेक पुरस्कार मिळाले. ’यस्टरडे‘, ‘टुडे’, ’टुमारो ऑफ इंडिरेक्ट टक्सेशन’ या पुस्तकाला मानाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे, तर ’दर्पण’ या त्यांनी संपादित केलेल्या नियतकालिकाच्या ’एबीसीआय’चे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ‘डॉग बॉय’, ‘प्रतिरूप’, ‘विश्वातील दहा आदर्श शिक्षिका’ अशी काही पुस्तके त्यांनी अनुवादित केली. पुस्तकाबद्दल बोलण्यापूर्वी लेखिकेचा अल्पपरिचय करून देणे गरजेचे वाटते. स्वाती यांनी नागपूर विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतल्यावर, नाशिक येथे फायनान्स सर्व्हिसेसमध्ये वर्ग एक अधिकारी म्हणून १९९४ साली आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. सरकारी नोकरीतील जबाबदार्‍या समर्थपणे सांभाळून, त्यांनी इतरही विविध क्षेत्रांमध्ये आपली छाप पाडली. इंडियन मायथोलॉजी, सौंदर्यशास्त्र, पुरातत्त्वशास्त्र यांच्या त्या अभ्यासक. फ्रेंच भाषेतही त्यांना विशेष रुची. तसेच भारतीय नृत्य प्रकारात कथ्थकमध्येही त्या विशारद आहेत.
 
’वेध संस्कृतीचा’ ही लेखमाला यापूर्वी दै. ’नागपूर तरूण भारत’च्या ’आसमंत’ पुरवणीत दर रविवारी प्रसिद्ध होत होती. या लेखमालेतून विदर्भाच्या तसेच संपूर्ण महाराष्ट्राच्या संपन्न संस्कृतीचा वेध लेखिकेने घेतला आहे.लेखक अशोक समेळ यांनी या पुस्तकाला प्रस्तावना दिली आहे. लहानपणापासून संस्कृती कशी आपल्यात रमत जाते आणि आपण मग तिच्याशी एकरूप होतो, हे त्यांनी सांगितले आहे. आईपासून पुढे सगळं घर आपलं होतं आणि घरात सर्वत्र व्यापून राहिलेली संस्कृती आपलीशी होते. हे सगळं आईमुळेच, घरातल्या मायाळू स्त्रीमुळेच! हे म्हणताना, त्यांनी आईने गायच्या अंगाई गीतांचा उल्लेख केला आहे. ते म्हणतात की, ”बाळ लहान असताना, आई अडगुलं मडगुलं करते आणि बाळ मोठं झालं, तरी त्याला तीट लावतच राहते. या सर्व प्रवासात द्वापारयुगापासून कलियुगापर्यंतचा लेखाजोखा घेतला आहे. सर्वच युगात आई बाळाला तीट लावतेच. प्रत्येक माता आपल्या संस्कृतीची एका अर्थी चालक आणि वाहक आहे.”

सतीश भावसार यांनी या पुस्तकाचे मुखपृष्ठ साकारले आहे. मुखपृष्ठ म्हणजे एकूण १७ छायाचित्रांचे कोलाज. वैदर्भीय समृद्ध संस्कृतीचा भरजरी आलेखच या मुखपृष्ठावर झळकलेला. या पुस्तकात अनेक लहानलहान गोष्टींतून लहानपणीच्या कथा- आख्यायिका सांगितल्या आहेत. आज विकासाच्या बदलत्या परिघात संस्कृतीच्या पाऊलखुणा या गोष्टी रुपातून जीवंत ठेवण्याचा स्वाती यांचा हा प्रयत्न वाखाणण्याजोगा. गणपतीच्या सर्व कथा आख्यायिकांच्या माध्यमातून सांगितल्या आहेत. प्रत्येक सणाला गावागावात वेगवेगळ्या प्रथा. नागपंचमीचा सण विदर्भात ’वारूळ पंचमी’ म्हणून साजरा केला जातो. त्यावेळी गावातल्या सर्व अठरापगड जातीच्या स्त्रिया एकत्र येऊन, वारुळाला फेर धरून नाचतात. रात्री उशिरा घरी जातात. सर्व जाती समावेशक व्यवस्थेचा हा एक उत्तम नमुना. यावेळी घरातल्या सासूने सुनेवर रागवायची प्रथा असते; परंतु सासूनेही पूर्वी हेच केले असते. पुढे सरकणारा काळ आणि नातेसंबंधातील कालसापेक्षता दाखवण्याचा उत्तम प्रयत्न यातून केला आहे. लोकगीते, त्यामागच्या श्रद्धा, ग्रामदेवतांच्या जन्म, पाऊस पडावा म्हणून बेडकाची काढलेली मिरवणूक, कोकणच्या राजाचे विदर्भातले कौतुक अशा अनेक लोककथा पानापानावर वाचायच्या असतील, तर हे उत्तम पुस्तक.


लेखक : स्वाती काळे
प्रकाशक : भरारी प्रकाशन
पृष्ठसंख्या : २१०
मूल्य : ३२० रु.


मृगा वर्तक


Powered By Sangraha 9.0