तिसऱ्या कसोटीत भारत सुस्थितीत; दुसऱ्या डावात ३२२ धावांची आघाडी

    17-Feb-2024
Total Views |
Ind vs eng test series 3rd test at rajkot

राजकोट :
भारत व इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना राजकोट येथे खेळविण्यात येत आहे. भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात १२६ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. त्यानंतर दुसरा डावाचा खेळ सुरू झाल्यानंतर भारत २ बाद १९६ धावांसह सुस्थितीत आहे. तसेच, टीम इंडियाकडे ३२२ धावांची बहुमोल आघाडी घेत सामन्यावर आपली पकड मजबूत केली आहे.


दरम्यान, सलामीवीर यशस्वी जयस्वालने (१०४ नाबाद) शानदार शतक ठोकले असून त्यानंतर रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर गेला. त्यानंतर रजत पाटीदार एकही धावा न करता स्वस्तात माघारी परतला. दिवसअखेर भारत २ बाद १९६ धावा केल्या आहेत. तसेच, शुभमन गिल २ षटकार व ६ चौकारांसह ६५ धावांवर खेळत आहे.

 
इंग्लंडचा पहिला डाव ३१९ धावांवर आटोपला. या धावसंख्येत सलामीवीर बेन डकेट याने १५१ चेंडूत १५३ धावांची तडाखेबाज खेळी करत टीम इंडियावर दबाव आणला. भारतीय गोलंदाजांची दमछाक झाल्याचे यादरम्यान पाहायला मिळाले. टीम इंडियाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद सिराजने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. फिरकीपटू द्वयीने प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या.

 
आता उर्वरित दोन दिवसांचा खेळ शिल्लक राहिला असून चौथ्या दिवसाच्या सुरूवातीला भारतीय फलंदाज फळी काय रणनीती आखणार, इंग्लंडला विजयासाठी किती धावांचे लक्ष्य देणार, एकंदरीत भारताचा डाव घोषित करण्यासंदर्भात टीम मॅनेजमेंट काय निर्णय घेत हे पाहणे, महत्त्वाचे असणार आहे. या सगळ्यात टीम इंडिया तिसरा कसोटी सामना जिंकत पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-१ ने आघाडी घेणार का, याकडे क्रिकेट रसिकांचे लक्ष असणार आहे.