आखातात सनातन पताका

15 Feb 2024 21:23:34
BAPS Hindu temple


वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर नुकतेच अबुधाबी येथील भव्य स्वामीनारायण मंदिराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. अन्य धर्मियांना त्यांच्या परंपरा पाळणे दुरापास्त असणार्‍या, या भूमीमध्ये थेट भव्य हिंदू मंदिर उभे राहिले. संयुक्त अरब अमिरातीमधील हे पहिले हिंदू मंदिर असून, पश्चिम आशियामधील हे सर्वात मोठे मंदिर. ’बीएपीएस’ संस्थेने या मंदिराची उभारणी केली. आतापर्यंत भारतासहित लंडन, न्यूयॉर्क, नैरोबी, ह्यूस्टन, शिकागो, टोरंटो व अटलांटामध्येही मंदिरे उभारण्यात आली असून अशा जवळपास १ हजार, ५५० मंदिरांची निर्मिती ’बीएपीएस’ संस्थेद्वारे करण्यात आली. युएईची लोकसंख्या जवळपास एक कोटींच्या आसपास असून, त्यापैकी तब्बल ३५ लाख नागरिक भारतीय आहेत. यापैकी २० लाख तर एकट्या अबुधाबीमध्ये राहतात. विशेष म्हणजे, जवळपास १५० ते २०० कुटुंब ’बीएपीएस’ संस्थेशी थेट जोडली गेली आहेत. मागील अनेक वर्षांपासून युएईमध्ये मंदिर उभारण्याची मागणी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या केली जात होती. अखेर या मागणीला मूर्त स्वरूप प्राप्त झाले आहे.

अबुधाबी येथील हे स्वामीनारायण मंदिर आपल्या अनेक वैशिष्ट्यांमुळे तितकेच भव्य आणि खास आहे. २०१५ साली पंतप्रधान मोदींनी युएईच्या राष्ट्राध्यक्षांसमोर मंदिराचा प्रस्ताव मांडला होता, तेव्हा तुम्ही रेघ ओढाल, ती जमीन तुम्हाला दिली जाईल, असा शब्द दिला गेला आणि तो खरादेखील करून दाखवला. योगायोग म्हणजे, प्रिन्स झायद शेख यांनी जी वालुकामय जमीन दिली, तिच्या खाली प्रदीर्घ शिलाखंड होता, त्यामुळे नागर शैलीत बांधल्या जाणार्‍या, या मंदिराचा प्रश्न सुटला. आधी फक्त १३.५ जमीन दिली; मात्र त्यांनी नंतर स्वतःहून आणखी १३.५ एकर जमीन देण्याची घोषणा केली. नागर शैलीतील सात शिखर या ठिकाणी असून, २७ एकरमध्ये मंदिराचा विस्तार आहे. १३.५ एकरात मुख्य परिसर आणि उर्वरित भागात पार्किंगची सुविधा असणार आहे. १ हजार, ४०० कार आणि ५० बसेसची या ठिकाणी सहज पार्किंग करता येणे शक्य आहे. मंदिर १०८ फूट उंच, २६२ फूट लांबीचे आणि १८० फूट रुंदीचे आहे. बाहेरील भागात राजस्थानमधील गुलाबी खडक असून, आतील भागात इटलीतील संगमरवर खडकाचा वापर करण्यात आला आहे. तब्बल ७०० कोटी रूपयांचा खर्च या मंदिराच्या निर्मितीसाठी आला.

मंदिरात दोन केंद्रीय घुमट असून त्यातील एकाला ’सद्भाव’ आणि दुसर्‍याला ‘शांतीचा घुमट’ अशी नावे देण्यात आली आहे. सर्वात मोठ्या थ्रीडी मुद्रण भिंतीलाही ’सद्भावना भिंत’ असे नाव देण्यात आले आहे. मंदिर निर्माणासंदर्भातील एक व्हिडिओदेखील या ठिकाणी दाखविण्यात येईल. ’सद्भाव’ या शब्दाला ३० आधुनिक व प्राचीन भाषांमध्ये दर्शविण्यात आले आहे. या मंदिरातील सातही शिखरे संयुक्त अरब अमिरातीच्या सात शेख राज्यांचे निर्देशक आहेत. एक प्रेक्षागृह असून आसनक्षमता तीन हजार इतकी आहे. सभा स्थळ, प्रदर्शन कक्ष आणि सामुदायिक केंद्राचीही निर्मिती करण्यात आली असून मंदिर सर्वांसाठी खुले असणार आहे. मंदिराच्या प्रत्येक दगडावर राजस्थानात शिल्पकाम झाल्यानंतर, जहाजाद्वारे ही शिल्पे अबुधाबीत आणण्यात आली. भारतातील रेड सॅण्डस्टोनचा वापर करण्यात आला असून, हा दगड ५० अंश तापमानातही गरम होत नाही. मंदिरात दहा वेगवेगळ्या ठिकाणी सेन्सर्स लावण्यात आले असून त्याद्वारे मंदिरावरील दबाव, तापमान, भूकंपासह भूगर्भातील हालचाली यांविषयी माहिती मिळू शकेल.

१९९७ साली ’बीएपीएस’चे आचार्य अबुधाबीत आले असता, त्यांनी अबुधाबीत मंदिर बनविण्याचा संकल्प सोडला, पुढे याची जबाबदारी रोहित पटेल यांनी आपल्या खांद्यावर घेतली. मंदिराची निर्माती संस्था हिंदू, मुख्य सल्लागार नास्तिक, जमीन दाता मुस्लीम सरकार, संचालक जैन, रचना अभियंता बौद्ध, प्रकल्प व्यवस्थापक शीख तर बांधकाम कंत्राटदार पारशी आहे. मंदिराच्या चारही बाजूंना ९६ घंटा आणि गोमुख आहेत. कुठेही लोखंडाचा वापर करण्यात आला नसून खांब गोलाकार आणि षट्कोणीय आहेत. मंदिरात राम, सीता, लक्ष्मण, मारुती, राधाकृष्ण, शिव, पार्वती, जगन्नाथ, तिरूपती बालाजी व नारायण स्वामी अशा विविध देवतांच्या मूर्त्या आहेत. गंगा, यमुनेचे पाणी आणून, तिथे नदी बनवण्यात आली असून, वाराणसीसारख्या घाटाची निर्मितीही करण्यात आली आहे. अशा अनेक वैशिष्ट्यांमुळे हे स्वामी नारायण मंदिर युएईत सनातन धर्माची ओळख बनले आहे, हे मात्र नक्की.



Powered By Sangraha 9.0