डॅमेज कंट्रोलच्या बैठकीला काँग्रेस आमदारांची दांडी! पटोलेंची सारवासारव
15 Feb 2024 12:19:23
मुंबई : गुरुवारी काँग्रेस पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीला अनेक आमदार अनुपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विचारले असता ते सारवासारव करताना दिसले. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे.
नाना पटोले म्हणाले की, "या अफवा पसरवल्या जात असून यात काहीही तथ्य नाही. उद्यापासून लोणावळा येथे काँग्रेस पक्षाचे दोन दिवसीय शिबिर होणार आहे. त्यानिमित्ताने आम्हाला जायचं आहे. योगायोगाने आज राज्यसभेचा फॉर्मसुद्धा भरायचा आहे. त्यामुळे इथूनच आम्ही सगळ्या आमदारांसह तिथे जाणार आहोत."
आमदारांच्या अनुपस्थितीबद्दल बोलताना ते म्हणाले की, "माझं आणि बाळासाहेब थोरात यांचं आमदारांशी बोलणं झालं आहे. हंबर्डेंच्या घरी त्यांच्या मुलाचं लग्न आहे आणि त्यांनी आमची परवानगी घेतली आहे. नांदेडचे माधवराव जवळकर यांनीदेखील आमची परवानगी घेतली आहे. ते शिबिराला उपस्थित राहणार आहेत. प्रत्येकजण आपापल्या व्यक्तिगत कामामुळे अनुपस्थित राहणार आहेत. आमची परवानगी घेऊनच ते अनुपस्थित राहणार आहेत. काँग्रेसचे सगळे आमदार एकत्र आहेत आणि एकत्रच राहणार यात दुमत नाही," अशी सारवासारव त्यांनी केली आहे.