कथाकार ‘विवेक’

14 Feb 2024 21:53:59
Vivek Kudu


पालघरमधील जांभूळगावचे प्रा. विवेक कुडू यांना नुकताच महाराष्ट्र शासनाचा ‘ग. ल. ठोकळ पुरस्कार’ जाहीर झाला. त्यानिमित्त त्यांच्या खडतर जीवनप्रवासाचा घेतलेला मागोवा...

प्रा. विवेक कुडू यांचा जन्म मूळचा पालघर जिल्ह्यातील बहाडोली गावचा. हे गाव महाराष्ट्रात ’जांभूळगाव’ म्हणून प्रसिद्ध आहे. कारण, या गावात रसाळ गोड आणि उत्कृष्ट गुणवत्तेच्या जांभळांबरोबर माणुसकी जपणारी माणसंसुद्धा आढळतात. याच गावात विवेक यांचे प्राथमिक शिक्षण झाले. त्यानंतर लोकनायक जयप्रकाश नारायण विद्यालय आगरवाडी येथून विवेक यांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. मग पुढील शिक्षणासाठी ते पालघर जिल्ह्यातील नामवंत अशा सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात दाखल झाले. तिथून ‘मराठी’ विषयात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण त्यांनी घेतले. पण, आईवडील शेतीत मोलमजुरी करून, विवेक यांच्या विद्येची तहान भागवू शकत नव्हते. अशा वेळी आपल्या आई-वडिलांना हातभार म्हणून विवेक हेदेखील भाजी विकणे, शेतीची कामं, रेतीकाम, होमाच्या समिधा विकणे अशी बरीच काम करत.

महाविद्यालयीन जीवनात वक्तृत्व, हस्ताक्षर, रांगोळी, निबंध लेखन अशा स्पर्धांमध्येही विवेक हे आवर्जून सहभाग घेत. कारण, त्या स्पर्धा त्यांना आनंद आणि महाविद्यालयीन खर्च भागवण्यासाठी, अर्थार्जनाचा आधार देत. तसेच त्याच्या हस्ताक्षराचे आजही सर्वत्र कौतुक होते. त्यांनी सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाच्या सूचना फलकावर लिहिलेल्या सूचना आजही अनेकांचे लक्ष वेधून घेतात. महाविद्यालयात असताना ’एनसीसी’ पूर्ण केल्याने, भारतीय सैन्यात जावे, असे त्यांना वाटत असे. पण, नियतीने त्याच्या नशिबी वेगळीच वाट लिहिली होती. मग पदवी शिक्षण घेतल्यानंतर आपण पत्रकार किंवा प्राध्यापक व्हावे, असे त्यांना वाटले. गरवारे इन्स्टिट्यूटमध्ये पत्रकारितेला प्रवेश घेतला आणि आर्थिक अडचणीने पुन्हा डोकं वर काढायला सुरुवात केली. त्यामुळे त्यांनी पत्रकारितेचा अभ्यासक्रम अर्ध्यावर सोडला. पण, पुढे दुसरा पर्याय निवडत, त्यांनी ’एमए’चे शिक्षण घेतले. त्यावेळी आई-वडिलांकडे पैसे नव्हते. पण, दोन दिवस उपाशी राहिलेल्या विवेक यांची शिक्षणाची ओढ लक्षात घेऊन, वडिलांनी भाताच्या पावलीवर वखारवाल्याकडून आगाऊ पैसे आणले. मग विवेक यांनी सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात ‘एमए’साठी प्रवेश घेतला.

 तिथे अविनाश देशपांडे, डॉ. महेंद्र भवरे, डॉ. प्रतिभा कणेकर, डॉ. अरूण पाध्ये, डॉ. किरण सावे या प्राध्यापकांमुळे विवेक यांचा सर्वांगीण विकास झाला. ज्यामुळे ’सेट’ परीक्षा विवेक यांनी पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केली. त्यानंतर ते सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात मराठी विभागात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. मधल्या काळात ’टाटा इन्शुरन्स’ कंपनीसाठी विवेक काम करू लागले. पण, गोड बोलण्यापेक्षा खरं बोलण्याच्या त्यांच्या स्वभावाला ती नोकरी पटली नाही. मग प्राध्यापकाच्या नोकरीसह ते महाविद्यालयाचा मराठी विभाग आणि महाराष्ट्र शासनाच्यावतीने घेण्यात आलेल्या बोलीभाषेवरील संशोधन प्रकल्पात सहभागी झाले आणि पुढे पालघर जिल्ह्यातील अनेक बोलीभाषांवर अभ्यासपूर्ण लेखन त्यांनी वर्तमानपत्रासाठी केले.मुळात शाळा आणि महाविद्यालयात निघणार्‍या ’प्रभात’ आणि ‘मंथन’ या भित्तिपत्रकातून विवेक यांच्या लिखाणाची सुरुवात झाली. पुढे वडिलांच्या निधनानंतर त्यांनी वेदनेला वाट मोकळी करून देत, कथालेखनाकडे गांभीर्याने लक्ष दिलं. महाविद्यालयात असताना २००५ साली त्यांनी पहिली कथा लिहिली होती. त्यानंतर सातत्याने लिखाण न करता सांगण्यासारखं असल्यावरच सागावं, या वाक्याप्रमाणे विवेक यांनी तब्बल दहा वर्षांनी २०१५ साली कथालेखनाला पुन्हा सुरुवात केली. मग २०२२ साली त्यांचा ’चार चपटे मासे’ हा कथासंग्रह प्रकाशित झाला. या कथासंग्रहात वेगळ्या धाटणीच्या, ग्रामीण भागातील समस्येचा आणि ग्रामीण भागातील एकंदर परिस्थितीचा मागोवा घेणार्‍या कथा वाचकांचे लक्ष वेधून घेतात. यातील कथा वारली, आगरी, मल्हार कोळी यांच्या बोलीभाषेचा समावेश आहे. मुळात विवेक यांच्या कथा संपूर्ण काल्पनिक नसून, वास्तवाची किनार पडून, कल्पनेला मर्यादित जागा देणारी अशी आहे.

विवेक यांच्या ’चार चपटे मासे’ या कथासंग्रहाला ‘साहित्य प्रतिष्ठान सावंतवाडी‘, ’सार्वजनिक वाचनालय नाशिक’, ’मुंबई मराठी साहित्य संघ’ आणि ’कोमसाप’ या संस्थांच्या मानाच्या पुरस्कारांनी गौरवान्वित करण्यात आले. ’साहित्य अकादमी, कोलकाता’ने कथावाचनासाठी त्यांना आमंत्रित केले होते. तसेच नुकतंच त्यांना ’स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार २०२२’अंतर्गत कथा साहित्यातील ‘ग. ल. ठोकळ पुरस्कार’ जाहीर झाला. त्यामुळे एक प्रतिभावंत लेखक, उत्कृष्ट वक्ता, नावीन्यपूर्ण संकल्पनांचा पाठपुरावा करून, कल्पकतेने त्यांची अंमलबजावणी करणारा एक प्रभावी संयोजक आणि सर्वांना बरोबर घेऊन काम करणारा समन्वयक, अशा विविध अंगानी विवेक कुडू यांच्या व्यक्तिमत्त्वाचा परिचय अनेकांना होतो. त्यामुळे या सगळ्या प्रवासात आईवडील, भाऊ, सासुसासरे आणि पत्नीचा सिंहाचा वाटा असल्याचे विवेक आवर्जून सांगतात, तरी भविष्यात ’पीएचडी’ आणि बोलीभाषेच्या संदर्भातील लिखाणाचा संग्रह करण्याचा त्यांचा मानस आहे. जांभूळगावच्या विवेक यांना साहित्याच्या विशाल प्रांगणामध्ये विचारांचा आणि शब्दांचा सुगंध शिंपडत राहण्यासाठी, दै. ’मुंबई तरुण भारत’कडून खूप शुभेच्छा!


- सुप्रिम मस्कर



Powered By Sangraha 9.0