"संजय राऊतांचं पुढचं टार्गेट वंचित बहुजन आघाडी!"

13 Feb 2024 15:20:55

Raut


मुंबई :
संजय राजाराम राऊतांनी जिथे जिथे पाऊल ठेवेलेलं आहे एकतर ते घर तुटलंय किंवा पक्ष फुटला आहे. उद्धवजी, पवार साहेब आणि काँग्रेस संपल्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीकडे संजय राऊतांनी आपलं लक्ष वळवलेलं आहे, असा टोला भाजप आमदार नितेश राणेंनी लगावला आहे. मंगळवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
 
नितेश राणे म्हणाले की, "संजय राजाराम राऊतांनी जिथे जिथे पाऊल ठेवेलेलं आहे एकतर ते घर तुटलंय किंवा पक्ष फुटला आहे. स्वत:च्या मालकाची अवस्था आज ना घर का ना घाट का अशी करुन टाकली आहे. पवार साहेबांचा चेला म्हणवून घेऊन त्यांची आज काय अवस्था केली हे उभा महाराष्ट्र पाहतो आहे. उद्धव ठाकरेंना आणि पवारांना संपवलं. त्यानंतर काँग्रेस उरली होती. त्या काँग्रसची काय अवस्था झाली आहे हे सर्वांनी पाहिलंच आहे. त्यामुळे मी पहिल्या दिवसापासून हेच सांगत आहे की, संजय राऊतांना कुणीही घरात किंवा पक्ष कार्यालयात घेऊ नये. कारण त्याचे परिणाम सातत्याने महाराष्ट्रात दिसत आहेत."
 
"उद्धवजी, पवार साहेब आणि काँग्रेस संपल्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीकडे संजय राऊतांनी आपलं लक्ष वळवलेलं आहे. म्हणूनच मी प्रकाश आंबेडकरांना एवढंच सांगेन की, जे उद्धवजी, पवार साहेब आणि काँग्रेसला कळलं नाही ते तुम्हाला वेळेत कळलं तर तुमच्यासाठी चांगलं आहे. अन्यथा संजय राऊत तुमचीही अवस्था या तिघांसारखी करुन टाकेल. त्यामुळे यावर थोडं लक्ष द्या," असे ते म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले की, "संजय राऊत तुम्ही कितीही वल्गना करा पण महाविकास आघाडीचा पोपट आता अधिकृत पद्धतीने मेलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपचे मिशन ४५ प्लसची गाडी चौथ्या गियरमध्ये निघालेली आहे. या विजय घोडदौडकडे जात असताना आमच्या रस्त्यात जे जे येतील ते नेस्तनाबुत होऊन जातील," असेही ते म्हणाले. तसेच अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशावर राऊतांनी केलेल्या टीकेवरही राणेंनी प्रत्युत्तर दिले आहे. अशोक चव्हाण तुमच्या मंत्रिमंडळात असताना तुम्हाला हे आरोप का दिसले नाहीत? असा सवाल त्यांनी केला आहे.



Powered By Sangraha 9.0