"काँग्रेसला लोकसभेत एकही जागा मिळणार नाही"

13 Feb 2024 14:55:41
 mallikarjun
 
नवी दिल्ली : "दिल्लीत काँग्रेसची स्थिती इतकी खराब आहे की, काँग्रेससाठी एकही जागा दिली जाऊ शकत नाही, मात्र आघाडी पाहता त्यांना एक जागा दिली जाईल." असे वक्तव्य आपचे राज्यसभा सदस्य आणि पक्षाचे संघटन सरचिटणीस डॉ. संदीप पाठक यांनी केले. संदीप पाठक यांनी हे वक्तव्य आम आदमी पक्षाच्या पीएसी समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना केले.
 
इंडी आघाडीत जागावाटपासाठी होत असलेल्या विलंबाला त्यांनी काँग्रेसला जबाबदार धरले. ते म्हणाले की, "'आप'च्या पीए समितीमध्ये आज मुख्य चर्चा लोकसभा निवडणूक आणि या निवडणुकीसाठी काँग्रेससोबत युती यावर झाली. देशाच्या हितासाठी आम्ही भाजपचा पराभव करण्यासाठी इंडी आघाडीसोबत एकत्र आलो आहोत. युतीचा उद्देश देशाच्या हिताचा आहे, त्यामुळे 'आप' आघाडीचा भाग राहणार आहे. आम आदमी पार्टी पूर्णपणे युतीसोबत आहे. मात्र निवडणुकीबाबत काँग्रेसकडून विलंब होत आहे."
 
काँग्रेसच्या कारभारावर नाराजी व्यक्त करताना पाठक म्हणाले की, "काँग्रेससोबत दोनवेळा बैठका झाल्या, बैठका चांगल्या वातावरणात झाल्या, पण कोणताही निष्कर्ष निघालेला नाही. त्यानंतर पुढील बैठक झाली नाही. आम्ही बैठकीची वाट पाहत होतो. काँग्रेसच्या दौऱ्यामुळे उशीर होत असल्याचे आम्हाला सांगण्यात आले, मात्र ही बैठक कधी होणार हेही काँग्रेस नेत्यांना सांगता येत नाही. अशा स्थितीत निवडणूक कशी जिंकणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आप दिल्लीत काँग्रेसला एक जागा देणार आहे. यावर कोणताही निष्कर्ष न निघाल्यास येत्या काही दिवसांत आप दिल्लीतील सहा जागांवर उमेदवार जाहीर करेल."
 
 
Powered By Sangraha 9.0