"३८ वर्षांच्या राजकीय प्रवासात..."; पक्षप्रवेशानंतर चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया

13 Feb 2024 13:57:43

Ashok Chavan BJP


मुंबई :
गेल्या ३८ वर्षांच्या राजकीय प्रवासात बदल करून पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपात प्रवेश करत आहे, अशी प्रतिक्रिया जेष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी दिली आहे. त्यांनी नुकताच काँग्रेसला राम राम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईतील भाजप कार्यालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. दरम्यान, काँग्रेसचे माजी आमदार अमर राजूरकर यांनीसुद्धा भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
 
यावेळी बोलताना अशोक चव्हाण यांनी सुरुवातीलाच आशिष शेलार यांचा मुंबई काँग्रेस अध्यक्ष असा उल्लेख केल्याने एकच हशा पिकला. त्यानंतर ते म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे आणि भाजपच्या असंख्य कार्यकर्त्यांनी माझे स्वागत केले, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. मी माझ्या आयुष्याची नवी सुरुवात करत आहे. गेल्या ३८ वर्षांच्या राजकीय प्रवासात बदल करून पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपात प्रवेश करत आहे. त्यांची स्फुर्ती आणि प्रेरणा घेऊन पुढील वाटचाल करता आली पाहिजे तसेच राज्याच्या आणि देशाच्या प्रगतीमध्ये आपलं योगदान दिलं पाहिजे या प्रामाणिक भुमिकेतून हा प्रवेश केला आहे."
 
"राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करताना आजवर सकारात्मक आणि विकासात्मक भूमिका घेऊन मी काम केले. विरोधी पक्षात असूनही नांदेडला न्याय देण्यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी सहकार्य केले. आगामी निवडणुकीत भाजपला अधिकाधिक यश कसे मिळेल, यासाठी माझ्या अनुभवाचा वापर करेन," असे ते म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले की, "राजकारण हे एक सेवेचं माध्यम आहे. त्यामुळे कोणावरही व्यक्तिगत टीका आणि दोषारोप करणार नाही. पंतप्रधानांनी सबका साथ सबका विकास ही भूमिका घेऊन देशाला विकसित राष्ट्राच्या रांगेत नेले. विरोधी पक्षात असतानासुद्धा चांगल्या कामाची प्रशंसा केली. मोदींच्या कामांची विरोधी पक्षातही स्तुती होते. मी भाजपाच्या ध्येय धोरणानुसार काम करेन. देवेंद्र फडणवीस सांगतील त्याप्रमाणे काम करेन. मी कोणत्याही प्रकारची मागणी केलेली नाही. ते सांगतील ती जबाबदारी स्वीकारणार," असेही ते म्हणाले आहेत.
 
तसेच हा माझा व्यक्तिगत निर्णय होता. मला कुणीही जा म्हणून सांगितलं नाही. मी या पक्षात नवीन आहे. बाकीचा विषय देवेंद्र फडणवीस पाहतील. त्यांना मदत लागली तर मी करेन, असे चव्हाण म्हणाले. यावर अशोक चव्हाण यांची मदत कुठे लागेल हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळे योग्यवेळी ती घेतली जाईल, अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली.


Powered By Sangraha 9.0