चव्हाणांच्या प्रवेशामुळे भाजप आणि महायुतीची शक्ती वाढली : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

13 Feb 2024 13:31:43

Chavan, Fadanvis & Bawankule


मुंबई :
काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर जेष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईतील भाजप कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. दरम्यान, काँग्रेसचे माजी आमदार अमर राजूरकर यांनीसुद्धा भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
 
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "आज सगळ्यांकरिता आनंदाचा दिवस आहे. महाराष्ट्रातलं एक जेष्ठ नेतृत्व ज्यांनी अनेक वर्ष विधानसभा आणि लोकसभा गाजवली, ज्यांनी विविध मंत्रीपदं भुषवली आणि दोनवेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कारकीर्द लाभलेले जेष्ठ नेते अशोक चव्हाण हे आज भाजपमध्ये प्रदेश करत आहेत. त्यांच्यासारख्या जेष्ठ नेत्याच्या प्रवेशामुळे महाराष्ट्रात भाजपची आणि महायुतीची शक्ती वाढली आहे यात शंका नाही."
 
"आज देशभरात पंतप्रधान मोदींनी ज्याप्रकारे भारताला विकसित करण्याचं स्वप्न पुर्णत्वाकडे नेण्याचं काम सुरु केलं, त्यामुळे देशभरातल्या अनेक चांगल्या नेत्यांना आपणही देशाच्या मुख्य प्रवाहात काम करावं असा विचार आला. त्यातील एक प्रमुख नेतृत्व म्हणून अशोक चव्हाणांकडे आपण बघु शकतो. विकासाच्या मुख्य धारेत योगदान करण्याची संधी मला द्या, कुठल्याही पदाची मला अपेक्षा नाही, अशी इच्छा अशोक चव्हाणांनी व्यक्त केली होती. येत्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या प्रवेशामुळे महाराष्ट्रात आणि विशेषत: मराठवाड्यात महायुतीला विशेष बळ मिळेल, असा मला विश्वास आहे. यानंतर लवकरच हजारों कार्यकर्ते आणि नेते यांच्या प्रवेशाचा कार्यक्रमदेखील आम्ही आयोजित करु," असेही ते म्हणाले आहेत.



Powered By Sangraha 9.0