गोधडीची ‘संस्कार शिदोरी!’

13 Feb 2024 20:53:43
 Article on Smita Khamkar
 
प्रत्येकाच्या जिव्हाळ्याच्या अशा पारंपरिक गोधडीला आधुनिकतेचा साज चढवत, त्याला दैनंदिन वापरातील वस्तूमध्ये रुपांतरित करणार्‍या स्मिता खामकर यांच्या या ‘संस्कार शिदोरी’विषयी...

ग्रामीण भागात आजही ‘गोधडी’ हा तितकाच जिव्हाळ्याचा विषय. गोधडीतून मिळणारी मायेची ऊब प्रत्येकाला आपल्या बालपणीच्या आठवणीत रममाण करते. वापरलेल्या साड्यांपासूनही गोधडी शिवली जात असली, तरी शहरात मात्र हे प्रमाण तसे तुलनेने अत्यल्प. हे लक्षात घेता, गोधडीच्या ग्रामीण परंपरेला आधुनिकतेचा साज चढवत नवीन कापडापासून गोधडी तयार करणार्‍या कोल्हापूरमधील स्मिता खामकर यांनी ‘संस्कार शिदोरी‘ हा ब्रॅण्ड नावारुपास आणला आहे.
 
स्मिता यांचे शालेय शिक्षण कोल्हापूरमधील पालिकेच्या राजमाता जिजाऊ मुलींच्या शाळेत झाले. पुढे त्यांनी वाणिज्य शाखेतून पदवी घेतली. शिक्षण झाल्यावर त्याचे लग्न नौदलातील राजेश खामकर यांच्याशी झाले.सुरुवातीपासूनच समाजकार्याची आणि नावीन्यपूर्ण कलाकुसरीची आवड असल्याने कोल्हापुरातील ‘इनरव्हील क्लब’सह विविध सामाजिक संस्थांच्या विविध उपक्रमांत स्मिता सहभागी होत असत. यातूनच त्यांना लुप्त होत चाललेल्या गोधडी कलेस नवी दिशा देण्याचा विचार मनात आला. परंतु, याच दरम्यान कोरोनाची साथ आली आणि अनेक व्यवसाय बंद पडले. त्यांच्या परिसरातील महिलांना नवीन रोजगार देण्यासाठी स्मिता यांनी मार्च २०२१ मध्ये गोधडीची निर्मिती सुरू केली. स्थानिक महिलांच्या हाताला काम देणे, हा त्यांचा मुख्य उद्देश होता. त्यातच ‘लॉकडाऊन’मध्ये त्यांच्या आजूबाजूच्या अनेक गरजू कुटुंबांची आर्थिक घडी विस्कटली होती. घरातील कर्त्या पुरुषांचा कामधंदा, नोकरी गेली, तर कोरोनामुळे कित्येक कुटुंबांचा आधारच हरपला होता. ही बाब लक्षात घेता, अशा कुटुंबांतील महिलांना रोजगाराची संधी देण्यासाठी स्मिता यांनी गोधडी निर्मितीच्या व्यवसायाला अधिक चालना देण्याचे ठरवले.

प्रारंभीच्या काळात स्मिता यांनी २० गरजू महिलांना गोधडी कशी शिवायची, याचे रीतसर प्रशिक्षण दिले. एवढेच नाही तर गोधडी शिवणार्‍या महिलांकडून त्यांनी विविध पॅटर्न शिकून घेतले, तर काही नवीन पॅटर्न स्वत: तयारदेखील केले. प्रशिक्षित महिला शिलाईमध्ये तरबेज झाल्यानंतर गोधडी निर्मिती आणि विक्रीला त्यांनी सुरुवात केली. मागणी आणि पॅटर्ननुसार गोधडीची मशीन शिलाई, हात शिलाई करून घेतली जात. गोधडी निर्मिती आणि विक्रीला सुरुवात झाली. तेवढ्यात पुन्हा कोरोना काळातील संचारबंदी सुरू झाल्याने, गोधडीची विक्री फेसबुकसारख्या समाजमाध्यमावरून सुरू केली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याने व्यवसाय अधिक जोमाने वाढत गेला. आजवर स्मिता यांनी अडीच हजार महिलांना गोधडी शिवण्याचे प्रशिक्षण दिले आहे. तसेच अनेक नामवंत संस्थांमार्फतही हजारो महिलांना याबाबतचे प्रशिक्षण दिले जात आहे. प्रशिक्षित महिलांना गोधडी शिवायला दिली जाते. महिला त्यांच्या वेळेनुसार गोधडी शिवून देतात. एक गोधडी शिवण्यासाठी आकारमान आणि डिझाईननुसार साधारण ३ ते १५ दिवसांपर्यंतचा कालावधी लागतो.
 
गोधडीचा पारंपरिक साज कायम ठेवत, स्मिता यांनी पॅटर्नमध्ये आधुनिकता आणली. जन्मलेल्या बाळाच्या मऊदार दुपट्यापासून ते हॉलमध्ये अंथरायचे कार्पेट, सिंगल-डबल बेडसाठी गोधडी, दुपट्टा पॅटर्न अशा वेगवेगळ्या आकारात आणि डिझाईनमध्ये गोधडी निर्मिती केली जाते. याशिवाय विविध सणांना भेटवस्तू म्हणून बटवे, वॉल हँगिंग, कार्पेट आदी प्रकारही गोधडी पॅटर्नमध्ये उपलब्ध करून दिले आहेत. बाजारपेठेची मागणी आणि ग्राहकांची आवड लक्षात घेऊनच विविध उत्पादनांचे पॅटर्न तयार केले जातात.

स्मिता यांनी २०२२ साली दसर्‍याच्या पाचव्या माळेला एक हजार गोधडी विणणार्‍या महिलांच्या सहभागातून २१ फूट बाय २१ फूट आकाराची महागोधडी करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या चरणी अर्पण केली. याशिवाय कोल्हापुरातील शिवाजी पेठेतील गणपती मूर्तीला कलाकुसरीचे वस्त्र प्रदान करण्यात आले. हे केवळ महिलांच्या संघटितपणामुळे शक्य झाले असल्याचे ते सांगतात. नजीकच्या काळात राज्यातील मेट्रो शहरांमध्ये असलेल्या मॉलमध्ये महाराष्ट्राच्या संस्कृतीतला पारंपरिक ठेवा असलेल्या गोधडीला स्थान मिळवून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तसेच अधिकाधिक शहरांमध्ये गोधडी प्रशिक्षण शिबीर भरवून जास्तीत जास्त महिलांना स्वयंसिद्धा बनवण्याचा त्यांचा मानस आहे.

आजच्या बर्‍याच गृहिणी या घरकामात अडकून पडल्याचे चित्र आहे. बर्‍याच महिला ‘आम्हाला स्वत:साठी वेळ मिळत नाही, लग्न, मुले झाले म्हणून खूप काही करायचे राहून गेले,’ अशी तक्रार करतात. खरे पाहता एक गृहिणीची दुपारपर्यंत बरीचशी काम आवरलेली असतात. त्यानंतरचा बराच वेळ या महिला टीव्ही, सोशल मीडियावर घालवता. त्याऐवजी जसा वेळ मिळेल तसा गृहिणींनी आपली आवड, छंद जोपासले पाहिजे. काहीही झाले तरी आपल्याला आवडणार्‍या गोष्टीसाठी छंदासाठी वेळ काढायला हवा, त्यात खंड पडता कामा नये. कारण, हीच तुमची आवड, छंद तुम्हाला अस्तित्वाची जाणीव करून देत राहील, त्यातूनच तुमची समाजात एक नवीन ओळख निर्माण होईल. मी स्वतः सगळं घर, मूलं सांभाळून वयाच्या ४०व्या वर्षी व्यवसाय सुरू केला. त्यामुळे कुठलाही न्यूनगंड न बाळगता इच्छा असल्यास आयुष्यातील कोणत्याही टप्प्यापासून सुरुवात होऊ शकते. फक्त ती करण्याची दृढ इच्छाशक्ती अंगी हवी, असे ते आवर्जून सांगतात. स्मिता खामकर यांना पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा.

गौरव परदेशी
८६०५७६८३६६
Powered By Sangraha 9.0