सुमारे २०० दशलक्ष वर्षांपासून दक्षिण अमेरिकेतील नैऋत्य चिलीमधील प्राचीन वाल्दिव्हियन समशीतोष्ण जंगल हे वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजातींसाठी आश्रयस्थान राहिले आहे. हे ठिकाण जागतिक ‘जैवविविधता हॉटस्पॉट’ म्हणून नावारुपालाही आले.
या जंगलांमध्ये ‘मंकी पझल ट्री’ (अरौकेरिया अराउकाना), लुप्तप्राय ‘चिनचिला’ (चिंचिला लॅनिगेरा), दक्षिणेकडील ‘पुडू’ (पुडू पुडा) तसेच जगातील सर्वात लहान हरीण आणि ‘ज्युआन फर्नांडिस फायरक्राऊन’ (हमिंगबर्ड) आणि उत्तरी डार्विनचा बेडूक या दोन धोक्यात असलेल्या प्रजातींचा अधिवास आहे; परंतु जंगलतोड आणि वाढत्या मानवी लोकसंख्येमुळे या प्रदेशावर गंभीर परिणाम झाला आहे. जगातील सर्वात लहान असलेल्या, जंगली मांजर ‘गिना’चे (लेओपार्डस गिग्ना) भविष्य धोक्यात आले आहे. बांबू आणि फर्नच्या दाट जंगल परिसरात उंदीर, छोटे पक्षी आणि सरपटणारे प्राणी खाऊन ही छोटीशी मांजर आपला उदरनिर्वाह करते. पण, ‘गिना’च्या अधिवासातील वाढलेल्या, मानवी हालचालींमुळे तिचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
‘गिना’चे वजन फक्त ९०० ग्रॅम ते तीन किलोपर्यंत भरते. झुपकेदार शेपटी, तपकिरी-करडा रंग आणि गालावरील विशिष्ट ठिपके यांवरून ‘गिना’ मांजर ओळखता येते. आपल्या सामान्य घरगुती मांजरींपेक्षा ही ‘गिना’ खूपच लहान. सह्याद्रीतील वाघाटीशी या ‘गिना’चा संबंध जोडता येऊ शकतो. ही प्रजाती द. अमेरिकेतील सर्वात धोक्यात असलेल्या मांजरींपैकी एक आहे आणि सध्या ‘असुरक्षित’ म्हणून ‘आययुसीएन’च्या लाल यादीत सूचिबद्ध आहे. मध्य आणि दक्षिण चिली, नैऋत्य अर्जेंटिना आणि दक्षिण चिलीच्या किनार्यावरील चिलो बेटावरील सुमारे १ लाख, ६० हजार चौ.किमी इतके तिचे अधिवास क्षेत्र आहे. उत्तर आणि मध्य चिलीमध्ये ‘गिना’च्या उपप्रजाती राहतात. जंगलातील असली म्हणून काय, शेवटी मांजरच ती! या ‘गिना’ खुराडातील कोंबड्या मारून खातात. ‘चिकन किलर’ म्हणून ख्याती असल्यामुळे मग या मांजरांचीही लोक शिकार करतात.
यामुळे स्थानिक लोकांमध्ये ही मांजर बदनाम आहे. तेथील लोक या मांजरीची तुलना रक्तपिपासू ‘व्हॅम्पायर’शी करतात. त्यांचा असा समज आहे की, या मांजरी हल्ला करतात आणि पशुधनाचे रक्त पितात. त्यांच्या अधिवासालगतच्या भागात भटके कुत्रे हे चिलीमधील पशुधनाचे खरे शिकारी. पण, बहुदा आळ येतो या मांजरींवर. हे भटके कुत्रे ‘गिना’ मांजरींसाठी धोकाच. मानव-वन्यजीव संघर्ष हा ‘गिना’च्या अधिवास कमी होण्यामुळे झालेला, फक्त एक परिणाम आहे. खरं तर चिली देश हा त्याच्या विस्तीर्ण संरक्षित क्षेत्रांसाठी प्रसिद्ध. आजपर्यंत तेथील सरकारने त्याच्या ४२ टक्के सागरी क्षेत्राचे आणि २२ टक्के जमिनी क्षेत्रांचे रितसर कायद्याने संरक्षण केले आहे. परंतु, संरक्षित क्षेत्राजवळील जमिनीचा वापर बदलत गेला आहे, ही ‘गिना’साठी सर्वात मोठी चिंतेची बाब आहे.
दरम्यान, जंगलतोड आणि मानवी लोकसंख्या आजूबाजूला वाढल्यामुळे, ‘गिना’चा अधिवास धोक्यात आला आणि वस्ती नष्ट झाल्यामुळे ‘गिना’च्या अस्तित्वावर परिणाम झाला आहे. दहा वर्षांपूर्वी म्हणजेच २०१४ मध्ये झालेल्या जैविक संवर्धनाच्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, वॉल्दिव्हियन वन-वनस्पतीपैकी केवळ ३० टक्के जगली आहेत आणि चिलीमधील अस्थिर राजकीय वातावरणामुळे चिलीच्या मूळ जंगलांचे भविष्य अस्पष्ट राहिले आहे. या मांजरींच्या संवर्धनाकरिता जनसामान्यांमध्ये ‘गिना’बद्दल माहिती पोहोचविणे गरजेचे आहे. यासाठी काही प्रकल्प राबविले जातात.
चिलीच्या लॉस लागोस प्रदेशातील दलदलीच्या जंगलात आयोजित कॅमेरा ट्रॅप्ससह लोक आधारित निरीक्षण प्रकल्प आहे. येथे समाजातील सदस्य कॅमेरा ट्रॅपचे निरीक्षण करतील आणि त्यांच्या निष्कर्षांवर अहवाल देतील. याचबरोबर मानवी वस्तीमधील कोंबड्यांच्या खुराड्याजवळ कॅमेरा ट्रॅप बसविले जातील. या ट्रॅपमध्ये मांजर टिपली गेली, तर कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज होईल. या आगामी प्रकल्पामुळे ‘गिना’सोबतचा मानवी संघर्ष कमी होण्याची आस पर्यावरणप्रेमींना आहे. ‘गिना’ला वाचवण्यासाठीच्या, उपायांमध्ये स्थानिक लोकांचा समावेश असणे आवश्यक आहे. चिलीमधील नवीन पर्यावरणीय कायदा, ‘गिना’ आणि जंगलतोडीमुळे प्रभावित झालेल्या, इतर प्रजातींच्या संवर्धनात मदत करेल, अशी आशा!