जालन्यात समाज कल्याणासाठी उभारलं जातंय "स्वा. सावरकर भवन"

12 Feb 2024 20:45:39
Swatantryaveer Savarkar Bhavan news

मुंबई : जालनामध्ये श्रीकृष्ण नारायण कुलकर्णी या ८२ वर्षाच्या सावरकर प्रेमीने आपल्या घराची जागा 'स्वातंत्र्यवीर सावरकर भवन' उभारण्यासाठी दिल्याचे समोर आले आहे. स्वातंत्रवीर सावरकरांच्या विचारांची प्रेरणा घेऊन समाजाच्या कल्याणासाठी एखादी वास्तू निर्माण व्हावी या हेतूने राहत्या घराच्या जागेवर वास्तू उभारण्याचे काम सुरु झाले आहे. सोमवार, दि. १२ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वा. भाग्यनगर येथे वास्तूचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. यावेळी ह.भ.प.डॉ. भगवान महाराज आनंदगड, लोणीचे ह.भ.प.सखाराम महाराज, वे.शा.सं.रामदास महाराज आचार्य, स्वा. सावरकर भवन ट्रस्टचे अध्यक्ष महेंद्र देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

श्रीकृष्ण नारायण कुलकर्णी हे स्वतः इंजिनिअर आहेत. त्यांचे भाग्यनगर येथील २८०० चौ.फूट जागेवर पाच खोल्यांचे घर होते. ते पाडून आज त्याठिकाणी पाच मजली स्वातंत्र्यवीर सावरकर भवन तयार होत आहे. हे केवळ एक इमारत म्हणून उभी राहणार नसून तेथे समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी निवास, अभ्यासिका, वाचनालय यासह काळानुरुप आवश्यक सोयीसुविधाही देण्याचा स्वातंत्रवीर सावरकर भवन ट्रस्टचा मानस आहे. सावरकर भवन उभारणीसाठी समाजातील दानशूर व्यक्ती आणि मित्रपरिवाराची मदत झाल्याचे श्रीकृष्ण कुलकर्णी यांनी सांगितले.

कसे असेल 'स्वातंत्र्यवीर सावरकर भवन?

जालन्यातील या सावरकर भवनाच्या पहिल्या मजल्यावर पार्कींग, दुसऱ्या मजल्यावर १२०० चौ.फूटाचा हॉल, तिसऱ्या व चौथ्या मजल्यावर लेडिज हॉस्टेल, पाचव्या मजल्यावर वाचनालय व अभ्यासिका असेल. पाच मजली इमारतीत लिफ्टची सोयही करण्यात आली आहे.

सावरकर जणू एका म्यानात दोन तलवारींसारखे...

ज्या क्रांतिकारकांमुळे इंग्रजांच्या मनात भिती निर्माण झाली, त्या क्रांतिकारकांचे मुकुटमणी म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. ते क्रांतिकारकही होते आणि महाकवी सुद्धा होते. त्यामुळे सावरकर ते असं व्यक्तिमत्त्व होतं, की जणू एका म्यानात दोन तलवारी. त्यांनी अस्पृश्यता निवारणासंदर्भातही ते अग्रेसर. त्यामुळे सावरकरांसारख्या द्रष्ट्या नेत्याप्रमाणे आपणही समाजाचं देणं लागतो; आपणही समाजासाठी काहीतरी करायला हवं, अशी भावना मनात जागृत झाली आणि त्या विचारातून आज सावरकर भवन निर्माण होत आहे. - इंजि. श्रीकृष्ण नारायण कुलकर्णी, संस्थापक, स्वा. सावरकर भवन ट्रस्ट



 
Powered By Sangraha 9.0