फडणवीसांच्या १६ मिनिटांच्या पत्रकार परिषदेने अख्खी काँग्रेस अस्वस्थ!

12 Feb 2024 16:31:58

Fadanvis Press


मुंबई :
काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी पक्षाच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला आहे. याशिवाय मुंबई काँग्रेसचे माजी नगरसेवक जगदीश कुट्टी आणि राजेंद्र दत्तात्रेय नरवणकर यांनी काँग्रेसचा राजीनामा देत सोमवारी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत अनेक खुलासे केले आहेत. काँग्रेसमधले अनेक चांगले नेते भाजपाच्या संपर्कात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. फडणवीसांच्या या १५ मिनिटांच्या पत्रकार परिषदेने अख्खी काँग्रेस अस्वस्थ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
 
अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे दिल्लीला रवाना झाले आहेत. याबाबत काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींशी ते चर्चा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, पक्षश्रेष्ठींना भेटल्यानंतर यावर काय तोडगा निघतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 
पत्रकार परिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मुंबई महापालिकेतील विविध पक्षातील माजी नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत. यातील बऱ्याच लोकांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याची ईच्छा दाखवली आहे. पण ज्यांचा जनतेशी संपर्क आहे त्यांनाच आम्ही प्रवेश देणार आहोत. त्यामुळे पुढच्या काळात भाजपमध्ये आणखी काही प्रवेश होणार आहेत."
 
काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोक चव्हाणांच्या राजीनाम्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, “काँग्रेसमधले अनेक चांगले नेते भाजपाच्या संपर्कात आहेत. ज्याप्रकारे गेली काही वर्षे काँग्रेस पक्ष वाटचाल करतो आहे, त्यातून जे जनतेचे नेते आहेत, त्यांची गुदमर होत आहे. त्यामुळे देशभरात हाच ट्रेंड पाहायला मिळत आहे की, जनतेचे लोकं भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. निश्चितपणे काही मोठे नेते भाजपामध्ये येतील हा मला विश्वास आहे. पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वात ज्याप्रमाणे भारत प्रगती करत आहे, ते बघता अनेक नेत्यांना वाटतं की, आपण देशाच्या जनतेसाठी काम करावं. यासाठी अनेक लोकं आमच्या संपर्कात आहेत. यात कोण कोण आहेत याचा खुलासा हळूहळू होईलच. त्यामुळे आता तुम्हाला एवढच सांगू शकतो की, आगे, आगे देखिये होता हैं क्या," असेही ते म्हणाले आहेत. उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या पत्रकार परिषदेनंतर काँग्रेस पक्ष कामाला लागला आहे.



Powered By Sangraha 9.0