मुंबई काँग्रेसच्या आणखी दोन बड्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश!

12 Feb 2024 14:21:20

Mumbai Congress


मुंबई :
मुंबई काँग्रेसचे माजी नगरसेवक जगदीश कुट्टी आणि राजेंद्र दत्तात्रेय नरवणकर यांनी काँग्रेसचा राजीनामा देत सोमवारी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री मंगलप्रभात लोढा, भाजप नेते आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.
 
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "जगदीश अमीन कुट्टी हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहिले असून आजच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. याशिवाय संघटनेचा एक मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. एक काम करणारा व्यक्ती अशी त्यांनी ओळख आहे. त्यामुळे त्यांच्यासारखा एक चांगला नेता भाजपमध्ये आला याचा आम्हाला आनंद आहे. त्यांच्या कार्याचा आणि अनुभवाचा फायदा आम्ही निश्चितच भाजपच्या विस्ताराकरिता आणि विकासाकरिता करुन घेऊ. यासोबतच त्यांनाही त्यांच्या अनुभवानुसार योग्य संधी देऊ.तसेच राजेंद्र नरवणकर हेदेखील जमिनीशी जुळलेले नेते आहेत. त्यांच्या प्रभागातील लोकांशी त्यांचे कौंटुंबिक संबंध आहे. त्यांचाही फायदा आम्हाला निश्चितपणे होईल," असे ते म्हणाले.
 
पुढे ते म्हणाले की, "मुंबई महापालिकेतील विविध पक्षातील माजी नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत. यातील बऱ्याच लोकांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याची ईच्छा दाखवली आहे. पण ज्यांचा जनतेशी संपर्क आहे त्यांनाच आम्ही प्रवेश देणार आहोत. त्यामुळे पुढच्या काळात भाजपमध्ये आणखी काही प्रवेश होणार आहेत."
 
काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोक चव्हाणांच्या राजीनाम्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, “काँग्रेसमधले अनेक चांगले नेते भाजपाच्या संपर्कात आहेत. ज्याप्रकारे गेली काही वर्षे काँग्रेस पक्ष वाटचाल करतो आहे, त्यातून जे जनतेचे नेते आहेत, त्यांची गुदमर होत आहे. त्यामुळे देशभरात हाच ट्रेंड पाहायला मिळत आहे की, जनतेचे लोकं भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. निश्चितपणे काही मोठे नेते भाजपामध्ये येतील हा मला विश्वास आहे. पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वात ज्याप्रमाणे भारत प्रगती करत आहे, ते बघता अनेक नेत्यांना वाटतं की, आपण देशाच्या जनतेसाठी काम करावं. यासाठी अनेक लोकं आमच्या संपर्कात आहेत. यात कोण कोण आहेत याचा खुलासा हळूहळू होईलच. त्यामुळे आता तुम्हाला एवढच सांगू शकतो की, आगे, आगे देखिये होता हैं क्या," असेही ते म्हणाले आहेत.


Powered By Sangraha 9.0