“संघ स्वयंसेवकांनी कुठल्याही क्षेत्रात जावे पण मी...” आप्पासाहेब जोशींची ती आठवण सांगताना पद्मभूषण राजदत्त

10 Feb 2024 15:05:59

rajdutt 
 
 
रसिका शिंदे-पॉल
 
मुंबई : वयाच्या पाचव्या वर्षापासून मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कार्यरत आहे. कालांतराने मला चित्रपटसृष्टीची ओढ लागली आणि मी आमच्या वर्धा जिल्ह्याच्या आमच्या संघचालकांना आप्पा जोशी यांना पत्र लिहून चित्रपट व्यवसायात जाऊ का असे विचारले. त्यावर मला संघ स्वयंसेवकांनी कुठल्याही क्षेत्रात जावे पण मी संघ स्वयंसेवक आहे हे विसरु नये ही शिकवण दिली आणि मी चित्रपटांकडे वळलो, असे पद्मभूषण राजदत्त यांनी म्हटले. नुकताच त्यांना केंद्र सरकारने पद्मभूषण पुरस्कार जाहिर केला आहे. या निमित्ताने 'महाएमटीबी'ने त्यांच्याशी संवाद साधला होता. या संवादावेळी त्यांनी संघातील जुन्या आठवणींना उजाळा दिला.
 
पद्मभूषण राजदत्त यांनी आठवण सांगत म्हटले की, “चित्रपट व्यवसायात जायचा विचार केल्यानंतर मी दोन पत्र लिहिली एक वडिलांना आणि दुसरे वर्ध्याच्या आमच्या संघचालकांना आप्पा जोशी यांना. त्या पत्रात मी लिहिले की, मी चित्रपट व्यवयासात जाऊ का? चालेल का?. बैठकीच्या ठिकाणी आप्पांना माझे ते पत्र मिळाले. त्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तृतीय सरसंघचालक प.पू.बाळासाहेब देवरस तिथे बसले होते. आप्पासाहेबांनी त्यांना मला या पत्राचे उत्तर लिहायला सांगितले. बाळासाहेबांनी मला जे पत्र पाठवलं त्यात ‘तु हा प्रश्न केलाच का? असे विचारत पुढे म्हटले की, संघ स्वयंसेवकांनी कुठल्याही क्षेत्रात जावे पण मी संघ स्वयंसेवक आहे हे विसरु नये आणि तिथून माझ्या चित्रपटसृष्टीची सुरुवात राजाभाऊंचे बोट धरुन सुरु झाली”.
 
“…म्हणून स्वत:ला ‘राजदत्त’ दिले नाव”, पद्मभूषण राजदत्त यांनी सांगितले नावामागचे रहस्य
 
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कार्यरत असताना मला चित्रपटसृष्टीची ओढ लागली. आणि मी स्वयंसेवक आहे हे न विसरुन राजा परांजपे यांचे बोट धरुन या क्षेत्रात आलो. ७ वर्ष त्यांच्याकडे शिकल्यानंतर १९६७ साली मी माझा पहिला स्वतंत्र चित्रपट ‘मधुचंद्र’ दिग्दर्शित केला. त्यावेळी माझ्या मनात आलं की तुला हे सगळं कुणी शिकवलं? तर ज्यांच्यामुळे तु हे सारं काही शिकलास त्याचं नाव कायम लक्षात ठेवून त्यांचा आदर ठेवला पाहिजे. त्यामुळेच माझे चित्रपटसृष्टीतील गुरु राजा परांजपे यांच्या नावातील राज आणि माझ्या खऱ्या दत्तात्रय नावातील दत्त असे नाव घेऊन मी माझ्या गुरुंचे राजा परांजपे यांचे स्मरण राहावे म्हणून समाजाला माझे नाव ‘राजदत्त’ असं केलं”.
 
 
 
Powered By Sangraha 9.0