अवधपुरी अती सुंदर बनायी...

10 Feb 2024 21:18:38
Ayodhya
 
अयोध्येतील दि. २२ जानेवारीचा रामललाचा भव्यदिव्य प्राणप्रतिष्ठापना सोहळा ‘याची देही, याची डोळा’ अनुभवणारे सर्वस्वी भाग्यवानच! अशाच भाग्यवान भारतीयांपैकी एक म्हणजे लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त). अयोध्येतील त्या अनुपम आणि कालातीत अनुभवाचे हे शब्दचित्रण...

ऑक्टोबर महिन्यातील तो दिवस...  अचानक मला एक फोन कॉलवर विचारण्यात आले की, ’‘जर तुम्हाला अयोध्या येथे निमंत्रित करण्यात आले, तर तुम्ही इच्छुक आहात काय?” या संपूर्ण सोहळ्याविषयी कोणतीही पूर्व माहिती नसताना माझे उत्तर, “होय, का नाही, मी नक्कीच जाईन!”या गोष्टीनंतर काही दिवस गेले आणि डिसेंबरमध्ये अचानक वेगवान गोष्टी घडू लागल्या. प्रवास आणि अयोध्येच्या मुक्कामाबाबत संपर्क साधला जाऊ लागला, तोपर्यंत देखील या सोहळ्यासाठी निवडक निमंत्रितांपैकी मी एक असल्याची जाणीव नव्हती. जेव्हा अतिशय सुंदर निमंत्रणपत्रिका अक्षतांसह माझ्या घरी येऊन व्यक्तिशः देण्यात आली, तेव्हा माझ्या मनात औत्सुक्य आणि अनेक भावना एकत्र दाटून येत होत्या.माध्यमांमधून या सोहळ्याबाबत विविध विधाने, प्रतिक्रिया समजत; तेव्हा देशातील सर्वात मोठ्या सेक्युलर असलेल्या संरक्षण दलाच्या माझ्यासारख्या व्यक्तीच्या मनात द्विधा स्थिती निर्माण झाली होती. मात्र, जसा जाण्याचा दिवस जवळ येत गेला, तशी माझी भूमिका जाण्याविषयी अधिक उत्साही होत गेली. एका ऐतिहासिक सोहळ्यासाठी प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची उत्सुकता अधिक निर्माण होत गेली.

अयोध्यानगरी...

नव्याने उद्घाटन झालेल्या सुंदर विमानतळावर पोहोचल्यावर चंदनचा टिळा भाळी रेखून, आमचे पारंपरिक मंगल स्वागत करण्यात आले आणि पुढे कशा प्रकारचे आयोजन असेल, याची कल्पनाच यानिमित्ताने आली.तीनही संरक्षण दलातील माजी प्रमुखांना या सोहळ्यासाठी आवर्जून निमंत्रित करण्यात आले होते. ‘डोग्रा रेजिमेंट सेंटर’ येथे सर्वांचे सस्नेह स्वागत करण्यात आले.
विमानतळावर संपर्क अधिकार्‍यांनी उत्साही स्वागत केले. तद्नंतर ऑफिसर्स मेस येथे सेनादलाच्या परंपरेप्रमाणे सहर्ष स्वागत करण्यात आले. अशा वातावरणात उपभोगलेल्या पदाची गरिमा पुनःश्च एकदा परावर्तित झाल्याची संवेदना निर्माण झाली. सेवेत असतानाच्या पूर्वीच्या अगदी वातावरणात परतल्यासारखी जाणीव निर्माण झाली.त्या संध्याकाळी नवनिर्मिलेल्या अयोध्या शहराचा फेरफटका केला. इथल्या प्रत्येक घराला, नव्या आणि जुन्या इमारतींना सणाचा, मांगल्याचा साज चढला होता. लक्षावधी फुलांनी आणि दिव्यांच्या आरासाने इथले प्रत्येक रस्ते सजले होते. जनसमुदाय जणू प्रत्येक मार्गावर भजने आणि संगीताच्या स्वरात दंग झाला होता. ठरावीक वेळेतच होणारी ’जय श्रीरामा’ची घोषणा आसमंत निनादून टाकत होती.शरयू नदीवरील जुन्या-नव्याची सांगड घालून, दिमाखाने सजलेले घाट उत्साहाचे साक्षीदार बनले होते. या ठिकाणची शिल्पे आणि ठीकठिकाणी होणारे संगीत व नाट्याविष्काराचा कार्यक्रम संपूर्ण वातावरण मंजुळ करणारे होते.संपूर्ण शहरात हजारो भाविक आणि शेकडो वाहने असताना, इथल्या प्रत्येक व्यक्ती आनंदात आणि उत्साहात होता. गर्दीचा उत्साह शिगेला पोहोचला असतानादेखील प्रत्येक व्यक्तीच्या मनात संयम होता. कुठेही भांडणे, हातवारे दिसून आले नाहीत.

ऐतिहासिक दिवस

दि. २२ जानेवारीची ती मंगल पहाट उजाडली आणि माझ्या मुलास निखिलला त्याच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा संदेश पाठविले. त्याचा वाढदिवस आजच्या शुभदिनी आल्याचा देखील आई म्हणून एक वेगळाच आनंद झाला.एकत्रित चहापान, समूह छायाचित्रानंतर पोलीस पायलट कारमधून आमच्या २० वाहनांचा जथ्था मंदिराकडे पोहोचला. अत्यंत रेखीव, भव्य कलात्मकतेची साक्ष देणारा परिसर पाहून मी आश्चर्यचकित आणि आनंदित झाले. अल्पावधित एवढ्या मोठ्या निर्माणाचे शिवधनुष्य पेलणे, हे खरोखरच एक मोठे कार्य होते. निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर मंदिराच्या दर्शनाने माझे नयन भरून आले.सुप्रसिद्ध गायक, संगीतकारांनी प्रत्यक्ष गायलेले दोहे आणि भजनांनी सुरेल वातावरण निर्माण झाले होते. गर्दी असतानाही कुठेही धक्काबुक्की, चढाओढ नव्हती. निमंत्रितांना बसण्यासाठी श्वेत आसने परिसरात होती. स्वयंसेवक सर्व मान्यवरांना आपआपल्या स्थानापर्यंत पोहोचवित होते. तातडीने पाणी व अल्पोपहार उपस्थितांना देत होते. भव्य स्क्रिनवर परिसराची दृश्ये दाखविली जात होती. जगभरातील प्रत्येक क्षेत्रातील दिग्गज निमंत्रित मान्यवर आवर्जून हे अनुभवण्यासाठी उपस्थित होते. आपआपसात कोण सेल्फी व मंदिराच्या परिसरात छायाचित्र टिपत होते.

नियोजित वेळेवर मा. पंतप्रधानांचे धीरोदत्त आत्मविश्वासपूर्ण पावले टाकत आगमन झाले. रामललाला अर्पण करण्यासाठी काही वस्तू त्यांच्या समवेत होत्या. उपस्थित जनसमुदाय आदराने उभा राहिला. संपूर्ण आसमंतात एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली होती. हे राष्ट्र एक आशादायक उज्ज्वल भविष्यासाठी नवनिर्मिती करण्यासाठी ‘आत्मनिर्भर’ असल्याची प्रचिती आली.पूजा सुरू झाली आणि मंत्रोच्चारांच्या पवित्र ध्वनीलहरींमध्ये मी स्वतः हरवून गेले. स्नेह, बंधुभाव, आदर, आनंद आणि अपार शांततेचा तो एकत्रित अविस्मरणीय अनुभव होता. पूजा आणि आरती संपताच, अवकाशातून भारतीय वायूदलातर्फे संपूर्ण परिसरात गुलाब पाकळ्यांचा वर्षाव करण्यात आला. हा संपूर्ण अनुभव अवर्णनीय असा होता. मा. पंतप्रधान गेल्यावर दर्शनाची ओढ लागली. एवढ्या गर्दीत कसे होणार? मनातला हा प्रश्न सुनियोजनामुळे फारसा उरला नाही. थोड्याच वेळात मंदिरात प्रवेश झाला. स्थापत्य कलांचे, शिल्पांचे अनोखे प्रदर्शन असलेले भव्य मंदिर, त्यातील गर्भगृह, उभारण्यात आलेला प्रत्येक कोरीव खांब, त्यातील शिल्पे अत्युच्च कलात्मकतेची साक्ष देत होती आणि ज्या क्षणांची उत्कंठा होती, त्या रामललांचे दर्शन झाले. मनमोहक प्रसन्न, निरागस हास्य, राजीवलोचन बालमुद्रेतील रामललांचे दर्शन झाले.

जवळच भव्य स्वर्णदाराजवळ शांततेत बसून, मी माझ्या विद्यापीठ परिवारासाठी प्रार्थना केली. मनात अतीव शांतता व समाधानाची प्राप्ती झाल्याचे अनुभुती होत होती. या सोहळ्यासाठी प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे भाग्य मिळाल्याने, मी रामललाला धन्यवाद दिले. तेव्हा माझ्या मनात शांतता आणि आनंदाचा भाव होता. विचार प्रक्रियाएका ध्येयासाठी जेव्हा लोक तन-मन-धनाने एकत्र येतात, तेव्हा प्रचंड मोठ्या गोष्टी घडू शकतात, या उक्तीवरचा माझा विश्वास अधिक दृढ झाला. शांततामय सहजीवन, बंधुता आणि आनंदाचे वातावरण असलेले रामराज्य देशभर निर्माण व्हावे, अशा पद्धतीने आपण या सोहळ्याकडे पाहायला हवे. राष्ट्रीयत्वाची भावना राखत, धर्माच्या पलीकडे जाऊन, या सोहळ्याकडे वेगळ्या परिप्रेक्ष्यातून पाहावयास हवे.आपसातील दुजाभाव, कटुता संपुष्टात आली, तर विश्वासातील सर्वात महान राष्ट्र बनण्याचे सामर्थ्य आपल्याकडे आहे. मात्र, त्यासाठी भ्रष्टाचार, किरकोळ मतभेद आणि आपल्या प्रभावशाली तरुणाईला सुयोग्य दिशादर्शनाचे कार्य केल्यास, ते शक्य आहे. आध्यात्मिक मार्गाचा अवलंब करून, आपल्या संस्कृतीची नाळ आपल्या सर्वांना घट्ट जोडून ठेवेल, यात शंका नाही.

लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त)
(लेखिका महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकच्या कुलगुरू आहेत.)
(शब्दांकन : डॉ. स्वप्नील तोरणे)


 
Powered By Sangraha 9.0