'धुळे ते अयोध्या' पहिली एस.टी रवाना!

10 Feb 2024 14:05:09

Dhule-Ayodhya
(Dhule to Ayodhya ST Bus)

मुंबई : अयोध्येत २२ जानेवारीला श्रीरामललाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून मंदिर सर्व भाविकांसाठी खुले करण्यात आले. देशभरातून लाखो भाविक अयोध्येत येऊन दरदिवशी रामललाचे दर्शन घेत आहेत. महाराष्ट्रातून अयोध्येला जाणाऱ्या भाविकांची संख्याही मोठ्याप्रमाणात आहे. मुंबई ते अयोध्या रेल्वे सेवा असली तरी भाविकांची गैरसोय होऊ नये आणि सर्वांना अयोध्या प्रवास करता यावा यासाठी एसटी महामंडळाने पुढाकार घेत धुळ्याहून थेट अयोध्येसाठी बस सेवा सुरू केली आहे. शनिवार, दि. १० जानेवारी रोजी पहाटे ४ वाजता पहिली बस धुळ्याहून अयोध्येसाठी रवाना झाली.

धुळे परिवहन महामंडळाने पहिल्यांदाच सुरु केलेल्या या बससेवेला भाविकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. बसचा एकूण प्रवास तब्बल २० तासांचा असेल. १६०० किलोमीटरचा प्रवास करून ही बस सकाळी अयोध्येला पोहोचते. वाराणसी आणि प्रयागराज याठिकाणीसुद्धा बसला थांबा दिला आहे. चौथ्या दिवशी बस परत धुळ्याच्या दिशेने निघते व रात्री उशिरा येऊन पोहोचते. या प्रवासाचा दर सध्या ४५४५ रु. इतका आहे. बस राज्यबाहेर प्रवास करत असल्याने ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना यात सवलत देण्यात आलेली नाही. बीडहूनसुद्धा अयोध्येसाठी अशीच बससेवा सुरु होणार आहे, मात्र तारीख अद्याप निश्चित झालेली नाही.

Powered By Sangraha 9.0