लोकसभा निवडणुकीपूर्वीच लागू होणार सुधारित नागरिकत्व कायदा!

10 Feb 2024 16:23:24
Citizenship Amendment Act News

नवी दिल्ली : देशात लोकसभा निवडणुकीपूर्वीच सुधारित नागरिकत्व कायदा अर्थात सीएए लागू करण्यात येणार आहे, अशी घोषणा केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी केली आहे. एका खासगी वृत्तसंस्थेतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.लोकसभा निवडणुकीपूर्वी सीएए लागू करण्यासाठी अधिसूचना जारी केली जाईल आणि त्याची अंमलबजावणीही केली जाईल. सीएए कोणत्याही व्यक्तीचे नागरिकत्व हिरावून घेणार नाही. धार्मिक छळाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानी, अफगाणी आणि बांगलादेशात राहणाऱ्या धार्मिक अल्पसंख्याकांनाच नागरिकत्व देणे हा त्याचा उद्देश आहे. असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्पष्ट केले.

अमित शाह म्हणाले की, काँग्रेसने शेजारील देशातील अत्याचारित अल्पसंख्याकांना नागरिकत्व देण्याचे आश्वासन दिले आहे. "जेव्हा देशाची फाळणी झाली आणि तिथे अल्पसंख्याकांवर अत्याचार झाले, तेव्हा सर्वांना भारतात जायचे होते, तेव्हा काँग्रेसने सांगितले होते की तुम्ही भारतात या, तुम्हाला येथे नागरिकत्व दिले जाईल", त्यामुळे काँग्रेसने यास आता विरोध करू नये, असेही शाह म्हणाले.

केंद्रीय गृहमंत्र्यांनी विरोधकांवर मुस्लिमांची दिशाभूल केल्याचा आरोप केला. ते म्हणाले, "सीएएबद्दल आमच्या मुस्लिम बांधवांची दिशाभूल केली जात आहे आणि चिथावणी दिली जात आहे. सीएए केवळ पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातील धार्मिक अल्पसंख्याकांना नागरिकत्व देण्यासाठी आहे." ते म्हणाले की नरेंद्र मोदी सरकारने लागू केलेल्या सीएएचे उद्दिष्ट 31 डिसेंबर 2014 पूर्वी बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात आलेल्या हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चनांसह छळ झालेल्या गैर-मुस्लिम स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व प्रदान करणे आहे, असेही शाह यांनी यावेळी नमूद केले आहे.
Powered By Sangraha 9.0