युपीएचा कार्यकाळ घोटाळ्यांचा तर, एनडीएचा कार्यकाळ विकासाचा : उपमुख्यमंत्री फडणवीस

10 Feb 2024 14:30:19

Fadanvis


मुंबई :
युपीएचा कार्यकाळ घोटाळ्यांचा होता, तर एनडीएचा कार्यकाळ विकासाचा आहे, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. २००४ ते २०१४ या युपीएच्या कार्यकाळाशी तुलना करणारी श्वेतपत्रिका केंद्र सरकारने जारी केली असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "युपीएचा सगळा कार्यकाळ हा घोटाळ्यांचा कार्यकाळ होता आणि गेली दहा वर्षे हा विकासाचा कार्यकाळ आहे. युपीएच्या दहा वर्षांत महागाईचा सरासरी दर ८.२ टक्के होता आणि एनडीएच्या कार्यकाळात तो ५ टक्के आहे. त्यामुळे ते आता महागाई महागाई ओरडत आहेत, पण यापेक्षा जास्त महागाई युपीएच्या काळात होती. युपीएच्या काळात सगळ्या सरकारी बँका डबघाईला अल्या होत्या. एनडीएच्या धोरणामुळे जवळपास सगळ्या सरकारी बँका डबघाईतून बाहेर आल्या आहेत, हेदेखील या श्वेतपत्रामध्ये बघायला मिळतंय. युपीएच्या दहा वर्षांमध्ये २०१४ पर्यंत भारतात केवळ १४ कोटी गॅस कनेक्शन होते आणि एनडीएच्या सरकारमध्ये ३१ कोटीपेक्षाही ही संख्या पुढे गेली. म्हणजेच दुपटीपेक्षा जास्त घरी दहा वर्षांत गॅस कनेक्शन पोहोचवण्याचं काम सरकारने केलं आहे."
 
"विद्युतीकरणामध्ये १८ हजार गावं वीजेपासून पुर्णपणे लांब होती. त्यांना विद्युत कनेक्शन देण्याचं काम सरकारने केलं. युपीएच्या काळात सरासरी प्रति दिवशी १० तास वीज उपलब्ध व्हायची आणि आता ती २१ तास उपलब्ध होत आहे. डीबीटीच्या माध्यमातून केवळ दहा कोटी खात्यांना फायदा मिळायचा आणि सरकारच्या योजना त्यांच्यापर्यंत जायच्या. मात्र, आता १६६ कोटी लोकांना ३१० योजनांचा थेट फायदा मिळत आहे," असे त्यांनी सांगितले.
 
ते पुढे म्हणाले की, "एवढंच नाही तर, युपीएच्या काळात केवळ ६ कोटी इंटरनेट युझर्स होते, ती संख्या आता ९० कोटींच्या पलिकडे गेली आहे. यूपीए काळात ३८७ मेडिकल कॉलेज होती. आज ती संख्या ७०६ पेक्षा पुढे गेली आहे. जवळपास देशात ५१ हजार डॉक्टर तयार व्हायचे. दहा वर्षांत ती संख्या आता लाखाच्यावर गेली आहे. स्वातंत्र्यापासून युपीएच्या काळापर्यंत देशात ६७६ विद्यापीठे होती. आज ही संख्या वाढून ११६८ झालेली आहे. केवळ पाच शहरांमध्ये मेट्रोचे नेटवर्क होते तेच आता २० शहरांमध्ये आहे. युपीएच्या काळात २० हजार किलोमीटरही रस्ते नव्हते, आता मात्र ५४ हजार किलोमीटर लांबीचे महामार्ग बांधून झाले आहेत. २०१४ पर्यंत देशात केवळ ७४ विमानतळं होती. आता ती संख्या १४९ झाली आहे."
 
"युपीएच्या काळात आपली निर्यात ७.६ डॉलरची होती. ती आता तीन पटीने वाढून २२.७ बिलियन डॉलर झाली आहे. २०१४ पर्यंत भारतात केवळ ३५० स्टार्टअप होते. आता ही संख्या १ लाख १७ हजार झालेली आहे. त्यामुळे ही श्वेतपत्रिका बघितल्यास युपीएचा कार्यकाळ हा एकुणच काळा आणि केवळ मुठभर लोकांचा विकास करणारा घोटाळ्याचा कार्यकाळ होता. तर एनडीएचा कार्यकाळ हा सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या माध्यमातून भारताला जगातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवणारा कार्यकाळ राहिला आहे," असे म्हणत यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभारही मानले.
 
 

Powered By Sangraha 9.0