मणिपूरला का जात नाही? बिल्कीस बानोकडे जा,” असे नुकतेच उबाठा गटाचे ‘साहेब’ अर्थसंकल्पाला उत्तर देताना म्हणाले. देशाचा अर्थसंकल्प आणि मणिपूर किंवा बिल्कीस बानो यांचा अर्थोअर्थी काहीही संबंध आहे का? पण, निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केल्यावर, त्यातले अ की ठ त्यांना कळले नसणारच! तसेही त्यांना अर्थसंकल्पातले काहीच कळत नाही, असे काही वर्षांपूर्वी ते स्वतःच सीतारामन यांच्यासमोर एका कार्यक्रमात म्हणाले होते. आता काय म्हणावे? या साहेबांना म्हणे, राष्ट्रीय स्तरावर नेतृत्व करायचे आहे. खरे तर यांच्या सत्ताकाळात महाराष्ट्राने जे अंधारयुग अनुभवले, त्याचा विसर यांना पडला. सुशांत सिंह, दिशा सालियान, पूजा, मनसुख हिरेन, साधू हत्याकांड, १०० कोटी-वाजे हे सगळे सगळे ते विसरले. पण, ते विसरले म्हणून महाराष्ट्र काही ते अंधारयुग विसरला नाही. राष्ट्रीय स्तरावर नेतृत्व करण्यासाठी, वाटेल ती तिकडम करण्याची तयारी असलेल्या, या साहेबांनी एकदा तरी देशाबद्दल नव्हे महाराष्ट्राबद्दल गांभीर्याने विचार केला असता तर? पण, त्यांना कसलेच गांभीर्य नाही, असे लोक म्हणतात. उदाहरणार्थ, शूर्पणखेचे नाक लक्ष्मणाने कापले. ते का कापले, याचेही कारण आहेच. मात्र, शूर्पणखेचे नाक रामाने कापले, असे नुकतेच स्वतः प्रखर हिंदुत्ववादी आहोत, असा गैरसमज असलेले, हे उबाठा गटाचे साहेब म्हटले. ‘डास चावला तर खाजवायचे कसे’, हे वाक्य ज्या सहजतेने ते म्हणाले, त्याच सहजतेने त्यांनी रामाने शूर्पणखेचे नाक कापले असे म्हणावे? आता कुणी म्हणेल, नसेल एखाद्याला माहिती रामायण, काही जबरदस्ती आहे का? पण, माहिती नसेल तर अज्ञानता पाजळायची कशाला? दुसरीकडे संजय राऊतांचा एक व्हिडिओ प्रसाारमाध्यमांवर आला, त्यात ते म्हणाले की, रावणाने शूर्पणखेचे नाक कापले. अर्थात ते काहीही म्हणू शकतात. कारण, त्यांची स्पर्धा सध्या अंधारेबाईंशी आणि किरण मानेंशी आहे. विषयांतर झाले, पुन्हा मुद्द्याकडे वळू. साहेबांना अर्थसंकल्प म्हणजे मणिपूर आणि बिल्कीस बानोसाठीची काहीतरी तरतूद आहे, असे वाटले आहे का? अज्ञानात सुख असते, असे म्हणतात; पण इथे तर अज्ञानातच आयुष्याचे इतिकर्तव्य सफलसुफल आहे. तिथे मेणबत्ती पेटवा, नाही तर मशाल, उजेड काही पडणार नाही.
सत्य समजतील का?
"देशात कोणत्या जातीची किती लोकसंख्या आहे, हे स्पष्टपणे कळायला हवे,” असे नुकतेच राहुल गांधींनी म्हटले. यापूर्वी ते म्हणाले होते की, ”जिसकी जितनी आबादी उतना उसका हक!” काय म्हणावे? मर्यादित लोकसंख्या असणे, हा काय गुन्हा आहे का? मग या देशात बहुसंख्य हिंदू आहेत आणि अल्पसंख्याक मुस्लीम आहेत. मग बहुसंख्य हिंदूंनाच सगळा हक्क द्यायचा, असे राहुल गांधी त्यांच्या तोंडाने एकदा तरी म्हणण्याची हिंमत करतील का? छे! त्यांच्या सत्ताकाळात त्यांचे मौनधारी पंतप्रधान मनमोहन सिंग तर स्पष्टच म्हणाले होते की, ”देशाच्या साधनसंपत्तीवर पहिला हक्क अल्पसंख्यांकांचाच आहे!” सध्या राहुल गांधी यांची कसलीशी यात्राही सुरू आहे. यात्रेमध्ये राहुल गांधी यांनी काय बोलायचे, तो उतारा ठरलेला आहे. प्रत्येक भाजपशासित राज्यात राहुल गांधी म्हणतात की, देशभरात सगळ्यात जास्त भ्रष्टाचार, बेरोजगारी याच राज्यात आहे. याच राज्यात सगळ्यात जास्त अल्पसंख्याक, दलित समाजावर अत्याचार होतो. तसेच याच राज्याचा मुख्यमंत्री सगळ्या जगात भ्रष्टाचारी आहे. याचबरोबर मोदी आणि अदानी यांच्याबद्दल अपशब्द वापरले की, झाले राहुल गांधींचे ‘मोहब्बत की दुकान’ पूर्ण. पण, ज्या अदानीच्या नावाने राहुल गांधी तिन्ही त्रिकाळ शंख करत असतात, कर्नाटक राज्याच्या काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी तर अदानींसोबत कित्येक करार केले. पक्षाचेच लोक किंमत देत नाहीत, म्हटल्यावर उरलीसुरली ’इंडिया’ आघाडी तरी काय करणार? त्यामुळेच राहुल गांधींचे सहकारी पक्ष ज्या राज्यात सत्तेत आहेत, त्या राज्यात आणि बिहार आणि प. बंगालमध्येही ही त्यांना विरोध झाला. यावर काही लोक म्हणतात की, सहानुभूती मिळवण्यासाठी हा राहुल गांधींचा कांगावा. या सगळ्या घडामोडीत ’इंडिया’ आघाडीत आता कोण शिल्लक उरेल, याचीही शाश्वती नाही. या पार्श्वभूमीवर राहुल यांनी देशात कोणत्या जातीचे किती लोक राहतात, यापेक्षा ’इंडिया’ आघाडीत किती पक्ष राहतात, हे आधी पाहिले तर बरे होईल. कारण, स्वतःचे भवितव्य घडवायला, समाज सक्षम आहेत. राहुल गांधी हे सत्य समजतील का?
९५९४९६९६३८