सपाची वेगळी चूल

09 Dec 2024 21:49:43
samajwadi party to quit alliance


विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पुरता धुव्वा उडाला. निवडणूक निकाल लागल्यानंतर मविआला निकालावर विश्वासच बसेना. त्यानंतरही मविआतील उखाळ्या पाखाळ्या निघायचे काही थांबेना. उबाठा गटाची गत तर कुणीही यावं आणि टपली मारून जावं, अशी. आमदारकीची शपथ घेण्यासाठी उबाठा गटाने चांगलेच आढेवेढे घेतले. इकडे सपाचे अबू आझमी आणि रईस शेख शपथ घेऊन मोकळे झाले. तिकडे मविआचे तळ्यात-मळ्यात असताना दोघांनीही शपथ घेण्यास प्राधान्य दिले. त्याचप्रमाणे मविआतून बाहेर पडण्याचा निर्णयही सपाच्या अबू आझमी यांनी जाहीर केला. बाबरी मशीद पाडणार्‍यांचे अभिनंदन आणि हिंदुत्ववादीभूमिका कायम असणार, असे उबाठा गट सांगत असल्याने आम्ही त्यांच्याबरोबर राहू शकत नाही, असे आझमी यांनी स्पष्ट केले. आम्ही धर्मनिरपेक्षवादी असून मविआ जर हिंदुत्ववादी भूमिकेचे समर्थन करत असेल, तर आम्ही त्यांच्यासोबत राहणार नसल्याचे आझमी यांनी स्पष्ट केले. याचबरोबर, आझमी यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनाही चार शब्द सांगितले. मुळात दोन आमदार असतानाही सपाने मविआमधून बाहेर पडणार असल्याचे सांगितले, मात्र ते बाहेर पडो, वा ना पडो तसाही फार काही फरक पडणार नव्हता. मात्र, उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी उबाठाचे हिंदुत्व बेगडी असल्याचे सिद्ध केले. आझमींना उत्तर देताना युवराज आदित्य सपाला भाजपची ‘बी’ टीम बोलून मोकळे झाले, मात्र खरी अडचण वेगळीच आहे. ती त्यांना बोलूनही दाखवता येत नाही, हे खरे. सपासारखा पक्षही आता उबाठा गटाला काय करायचे आणि काय नाही करायचे, याचे सल्ले देत असतो, यापेक्षा वाईट वेळ तरी काय म्हणावी म्हणा! आमदारकीची शपथ नाही घेतली, तर विधानसभेच्या कामकाजात सहभागी होता येत नाही, याची कल्पना उबाठा गटाला आहेच. त्यामुळे आधी शपथ न घेण्याची भूमिका त्यांना हिंदुत्वासारखीच गुंडाळून ठेवावी लागली. आता तर फक्त सपा आहे, भविष्यात काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या खर्‍या चेहर्‍यांचा सामना उबाठा गटाला करायचा आहे. दोन आमदारांची सपा नाकावर टिच्चून मविआतून बाहेर पडते आणि युवराज आदित्य मात्र इच्छा असूनही ‘हायकमांड’मुळे गप्प राहतात. उबाठाला आणखी कितीदा ‘बी’ टीमचा आधार घ्यावा लागेल, हे येत्या काळातच समजेल.

ममतांना नेतृत्वाची भूल


'भारत जोडो यात्रे’चा अंक काढून पाहिला. त्यानंतर त्याचा नवा अंकही पार पडला. मात्र, ‘संविधान हटाओ’चा ‘फेक नॅरेटिव्ह’ पसरवूनही काँग्रेसला शंभरी काही गाठता आली नाही. पदरी पराभव पडूनही काँग्रेसने अगदी विजयश्री खेचून आणल्यासारखे आव चेहर्‍यावर आणले. मात्र, भाजपप्रणित ‘एनडीए’ने दणदणीत बहुमत मिळवले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसर्‍यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाले. या दुःखातून आणि सुतकातून काँग्रेस आणि त्यांची ‘इंडी’ आघाडी अजूनही बाहेर आलेली नाही. सोरोस, अदानी, अंबानी यापलीकडे काँग्रेसचा ‘हात’ पोहोचतच नाही. राहुल गांधी यांना स्वप्नेसुद्धा अदानी यांचीच पडत असावी, इतके ते सध्या ‘अदानी’ नावाने पछाडले आहेत. यत्र-तत्र-सर्वत्र त्यांचा केवळ आणि केवळ ‘अदानी’ नावाचा जप सुरू असतो. अशाने त्यांच्या ‘इंडी’ आघाडीतही दुफळी माजण्यास प्रारंभ झाला आहे. तसे पाहिल्यास लोकसभा निवडणुकांपूर्वीच ‘इंडी’ आघाडीत पंतप्रधान कोण होणार, यावरून दुफळी माजलेलीच होती, पराभवानंतर त्यात आणखी भर पडली. जसे महाराष्ट्रात कोणीही येतो आणि उबाठा गटाला टपली मारून जातो, त्याचप्रमाणे अगदी काँग्रेसलाही ‘इंडी’ आघाडीत कुणीही येतो आणि फुकाचे सल्ले देत बसतो. कहर म्हणजे, हिंदू अत्याचारांनी जळत्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही ‘इंडी’ आघाडीला दिवसा तारे दाखवले आहेत. हरियाणा आणि महाराष्ट्रात काँग्रेसच्या दारुण पराभवावर त्यांनी नाराजी व्यक्त करत, जर मला संधी लाभली, तर मी ‘इंडी’ आघाडीचे नेतृत्व करण्यास तयार असल्याचे सांगितले. म्हणजेच, बॅनर्जी यांनी थेट राहुलगांधींनाच आव्हान दिले. ‘इंडी’ आघाडी गठित करण्यासाठी मी पुढाकार घेतला. आता ज्यांच्याकडे ती चालविण्याची जबाबदारी आहे, त्यांनी नीट चालवावी असे बॅनर्जी यांनी सांगितले. जर ते शक्य नसेल, तर मी त्यासाठी तयार असल्याचे संकेत त्यांनी दिले. मुख्यमंत्री आणि ‘इंडी’ आघाडीचे नेतृत्व अशा दोन्ही जबाबदार्‍या मी पश्चिम बंगालमधून सांभाळेन, असे त्यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे, मेलेल्या पोपटाला जीवंत करण्यासाठी ममता बॅनर्जी पुढाकार घेण्याचे म्हणत आहेत. मात्र, बंगालमधील हिंसाचार आणि हिंदूंवरील अनन्वित अत्याचारावर कारवाई करायला त्यांना थोडासाही वेळ नाही...

 
Powered By Sangraha 9.0