अधिकार नव्हे, सेवामार्ग

09 Dec 2024 21:06:24
indira daware


प्रशासकीय सेवेतील सर्वच अधिकार हे ‘केवभ’ समाजाच्या विकास-उत्थानासाठी, या विचारांनी कार्यरत ‘बार्टी’च्या निबंधक इंदिरा अस्वार डावरे. त्यांच्या जीवनाचा मागोवा घेणारा हा लेख...

"गावातल्या लेकीबाळी कुणी बाहेर शिकायला गेल्या का? तुझी लेक हुशार आहे, तर तिला गावातच शिकव. शिक्षिका होईल.” गावकरी, नातेवाईक जयसिंग अस्वार यांना त्यावेळी सांगत होते. मात्र, जयसिंग यांनी सगळ्यांचा विरोध डावलत लेकीला म्हणजे इंदिरा यांना पुण्याला शिकायला पाठवले. त्याच इंदिरांनी ‘एमपीएससी’ परीक्षा प्रथम प्रयत्नातच उत्तीर्ण केली. आज त्याच इंदिरा ‘बार्टी’ येथे निबंधक पदावर कार्यरत आहेत. त्या ‘स्वच्छ भारत अभियान’ या विषयावर ‘पीएचडी’ही करत आहेत. कारण, हा केवळ त्यांचा अभ्यासाचा विषय नसून कृतिशीलतेचाही आहे.

‘स्वच्छ भारत अभियानां’तर्गत महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त प्रमाणात शौचालय बांधण्याचा उपक्रम त्यांच्या कारकिर्दीत संपन्न झाला. ‘स्वच्छ भारत अभियाना’अंतर्गतच सोनखत याचे ब्रॅण्डिंग करण्याकरिता ‘महा सोनखत’ नावाचे खत बचतगटामार्फत करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. खेड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या आदिवासी भागातील शाळांना सीएसआर निधी मिळवून जवळपास 84 शाळा नवीन बांधणी, दुरुस्तीसारखा अभिनव उपक्रमही केला. ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींची संपूर्ण एक ते 33 नमुने अद्ययावत करण्याकरिता ई-ग्राम प्रणालीतून संपूर्ण तालुक्यातील दप्तर संगणीकृत करून महाराष्ट्रात सर्वप्रथम प्रथम क्रमांक पटकावला. प्रशासकीय सेवेतील कायदे-नियमाअंतर्गत राहून मानवी अंत:करणाने इंदिरा अस्वार डावरे यांनी समाजासाठी काम केले. त्यांचे प्रशासकीय कार्य म्हणजे प्रशासकीय योजनांचे समाजासाठीचे कल्याणकारी रुपच. त्यामुळेच समाजासाठी असलेल्या कोणत्याही योजनेचा उपयोग तळागाळातील अत्यंज व्यक्तीच्या, कुटुंंबाच्या आणि खर्‍या गरजूंच्या उत्थानासाठी व्हावा, असा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. त्यामुळेच हागणदारीमुक्त गावासोबतच गावातील सांडपाण्याचा मुख्य प्रश्न सोडवण्यासाठी कमी खर्चातील अंतर्गत गटारी बांधणे, वृक्षलागवड, वनराई बंधारे बांधणे,14व्या वित्त आयोगातून तसेच मुद्रांकशुल्क निधीतून गावोगावी काँक्रीट रस्ते तथा विकासात्मक योजना कार्यान्वित करणे आणि मुख्यतः दलित वस्त्यांचा सुंदर आणि सर्वागीण विकास करणे, अशी अनेक कामे इंदिरा यांनी केली. ‘अधिकाराचा उपयोग समाजबांधवांच्या कल्याणासाठीच’ हे ब्रीदवाक्य जगून काम करणार्‍या इंदिरा यांचा जीवनप्रवास पाहूया.

मातंग समाजाचे जयसिंग अस्वार आणि आशा हे दाम्पत्य मूळचे जुन्नरचे. त्यांची सुकन्या इंदिरा. ओतूरच्या एका खेडेगावात अस्वारे कुटुंब वास्तव्यास होते. जयसिंग हे ग्रामसेवक. त्यांच्या घरी पहाटे 6 वाजल्यापासून अंधार पडेपर्यंत लोकं कामं घेऊन यायची. आशाबाई त्या सगळ्यांना आवर्जून चहापाणी, घरात शिजलेले अन्न द्यायच्या. का, तर दारी आलेला माणूस ग्रासलेला आहे, त्याची भूक जाणली पाहिजे म्हणून. वास्तविक पाहता अस्वारे कुटुंब गरीबच होते. कारण, त्यांचे संयुक्त कुटुंब होते. जयसिंग यांचा पगार कितीसा पुरा पडणार? घराच्या गरजा भागवण्यासाठी जयसिंग केरसुणी बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल घरी आणून द्यायचे. आशाबाई केरसुणी बनवायच्या आणि इंदिरांचे आजोबा शिवराम हे आठवडी बाजारात केरसुणी विकायचे. त्यावेळी त्यांच्या घरी वीज, पाणी नव्हते. इतकेच काय, इंदिरा यांना पायात घालायला चप्पलही नसायची. पण, गरजा पूर्ण होत नाहीत म्हणून आपण गरीब आहोत, असे इंदिरा यांना कधीही वाटले नाही.

याचे कारण इंदिरा यांचे आजोबा शिवराम. इंदिरांना त्यांचा फार लळा. ते गावाचे वैद्यच. तसेच अत्यंत धार्मिक. ते अल्पशिक्षित होते, तरीसुद्धा ते इंदिरांचा दररोज अभ्यास घ्यायचे. गावातल्या हनुमान मंदिरात हरिपाठ करण्यासाठी दररोज इंदिरांना सोबत घेऊन जात. धार्मिक प्रवृत्ती, वैद्य म्हणून गावाची करत असलेली सेवा यामुळे अस्वारी कुटुंबाला गावात मानाचे स्थान होते. आजोबा इंदिरा यांना आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद यांच्या विचारपराक्रमाच्या गाथा सांगायचे. कोणत्याही प्रसंगात समाजासाठी उभे राहायचे आणि कधीही हार मानायची नाही, हे संस्कार इंदिरांवर होत होते. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारसाहित्य वाचून त्यांच्या विचारांची दिशाही पक्की झाली.

शाळेत आणि महाविद्यालयातही त्या हुशार विद्यार्थिनी म्हणून गणल्या जात होत्या. मात्र, बारावीला इंग्रजी विषयात कमी गुण मिळवल्यामुळे त्यांचे गुणवत्ता यादीतून नाव हुकले. ‘भीतीवर मात करा’ हा क्रांतिगुरू लहुजी वस्तादांचा विचार रक्तातच होता. त्यामुळे इंदिरा यांनी निर्णय घेतला की, पुण्यात जाऊन इंग्रजी विषय घेऊनच पदवीधर व्हायचे. पुढे पुण्यात येऊन त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आणि पुढे ‘एमपीएससी’ परीक्षा उत्तीर्ण झाल्या. त्यांचा विवाह डॉ. विकास डावरे (साहाय्यक आयुक्त जीएसटी, पुणे) यांच्याशी झाला. इंदिरा या मातंग, तर डॉ. विकास हे बौद्ध समाजाचे. मात्र, दोघांचेही सामाजिक आणि वैचारिक अधिष्ठान पक्के होते. डॉ. विवेक यांनी इंदिरा यांच्या लोकसेवेच्या स्वप्नांना साकार करण्याचे बळ दिले.

इंदिरा म्हणतात अधिकारात असलेल्या कार्यक्षेत्रातून समाजातल्या गरजू, उपेक्षित, वंचित बांधवांचे हित साधणे, हे माझे लक्ष्य आहे. तसेच, आरोग्य शिक्षण आणि स्वच्छता हे समाजासाठीचे मुख्य मानक आहेत. त्यासाठी मी आयुष्यभर कार्य करणार आहे. प्रशासकीय अधिकारांना समाजाच्या सेवेचा मार्ग समजणार्‍या इंदिरा अस्वार डावरे या प्रशासकीय सेवेतल्या स्त्रीशक्तीच्या दीपस्तंभच आहेत.

9594969638
Powered By Sangraha 9.0