नाशिक : आयाम, नाशिक आयोजित ‘गोदावरी ( Godavari ) संवाद २०२४’ गुरुदक्षिणा सभागृह, कॉलेज रोड येथे रविवार, दि. ८ डिसेंबर रोजी उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या उद्घाटनाला पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपस्थित होते. कर्णिक यांनी त्यांच्या मनोगतात डीप स्टेट आणि इतर विषय किती महत्त्वाचे आहेत, हे सांगितले. ते म्हणाले, “आपला समाज, संस्कृती, आर्थिक व्यवस्था व्यवस्थित ठेवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. आयाम नाशिक असे कार्यक्रम घेऊन हा प्रयत्न करत आहे. त्यासाठी त्यांचे अभिनंदन. यानंतर ‘डीप स्टेट अॅण्ड वर्ल्ड ऑर्डर’ या विषयावर चर्चासत्र झाले. यात वैशाली करमरकर, अभिजित जोग, शेफाली वैद्य, दीपक करंजीकर, ओंकार दाभाडकर असे विचारवंत सहभागी झाले. पुढील सत्रात रुबिका लियाकत यांनी ‘इंडियन मीडिया एक्सपेक्टेशन अॅण्ड रियालिटी’ या विषयावर मार्गदर्शन झाले.
भोजन मध्यांतरानंतरच्या चर्चासत्रात आनंद नरसिंहन, रुबिका लियाकत, विक्रम संपत, शेफाली वैद्य हे ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत सहभागी झाले. ‘वक्फ बोर्ड अॅक्ट अॅण्ड इट्स इंप्लिकेशन’ या विषयावर अॅड. आशिष सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. ज्येष्ठ पत्रकार आनंद नरसिंहन यांनी ‘भारत फ्रॉम द परस्पेक्टेव्हिव ऑफ मीडिया’ या विषयावर संवाद साधला. समारोपाच्या सत्रात स्वातंत्र्यवीर सावरकर सन्मान पुरस्कार सोहळा पार पाडला. या सोहळ्यास जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची विशेष उपस्थिती होती. पुरस्कार ज्येष्ठ अभ्यासक आणि इतिहासकार विक्रम संपत यांना आयामचे अध्यक्ष डॉ. भरत केळकर यांच्या हस्ते प्रदान केला गेला.
यावेळी जिल्हाधिकारी शर्मा म्हणाले की, “स्वा. सावरकर हे नाशिकच नाही, तर संपूर्ण देशाचा अभिमान आहेत. आयाम नाशिकचा हा प्रयत्न स्तुत्य आहे.” यावेळी प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर शेफाली वैद्य यांनी विक्रम संपत यांची मुलाखत घेतली. ते म्हणाले, “सावरकरांच्या जन्मभूमीत मिळालेला हा सन्मान माझ्यासाठी मोलाचा आहे.” बहुआयामी विक्रम संपत यांनी आपल्या इतिहासकार होण्याचा प्रवास उलगडून दाखवला. विविध सत्रांना नाशिककरांची उपस्थिती लक्षणीय होती. सूत्रसंचालन कल्पेश कुलकर्णी यांनी, तर ‘वंदे मातरम्’ गीत रसिका नातू यांनी सादर केले.
सत्य हाच आमचा विमर्श
दीपप्रज्वलनानंतर आयाम नाशिकचे अध्यक्ष डॉ. भरत केळकर यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, “मागील चार पिढ्यांमध्ये शत्रू समोर दिसत होते. आता मात्र आपले शत्रू आपल्यासमोर नाहीत, ते विमर्श स्वरुपात आहेत. ही आपली खरी लढाई आहे. ‘एआय’सारख्या तंत्रज्ञानाने सगळेच बदलत आहे. अशा वेळी संपर्क आणि संवाद हाच या सगळ्यावर उपाय आहे. हेच काम आयाम नाशिक करत आहे. सत्य हाच आमचा विमर्श आहे. ‘गोदावरी संवाद कार्यक्रम’ म्हणजे यज्ञ, मान्यवरांचे विचार म्हणजे मंत्र आहेत. त्याचा विचार नक्कीच व्हावा.”