मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शक आणि निर्माते सुभाष घै यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीमुसार, घै यांना श्वास घेण्यास त्रास आणि अशक्तपणा आल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले होते.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुभाष घै यांच्या तब्येतीत आता सुधारणा होत असून डॉक्टर करत असलेल्या उपचारांना ते प्रतिसाद देत आहेत.
तसेच, सुभाष घै यांच्या सोशल मिडिया अकाऊंटवरुन त्यांच्या तब्येतीबद्दल एक पोस्ट करण्यात आली होती. त्यात असे लिहिले होते की, "माझ्या तब्येतीबद्दल मित्र आणि आप्तेष्ट करत असलेली चौकशी भारावून टाकणारी आहे. गोवा येथे संपन्न झालेल्या इफ्फी २०२४ च्या सोहळ्यानंतर झालेल्या धावपळीमुळे माझी तब्येत बिघडली होती. आता हळूहळू माझी प्रकृती सुधारत असून पण लवकरच भेटू".
सुभाष घै यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शन, निर्मिती करण्यापूर्वी अभिनेता म्हणून करिअरची सुरुवात केली होती. तकदीर आणि आराधना सारख्या चित्रपटात त्यांनी छोट्या भूमिका केल्या. त्यानंतर त्यांनी ताल, परदेस, खलनायक, राम लख्खन, हिरो, कर्मा, विधाता, कर्ज अशा अनेक सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शन करत आपली ओळख निर्माण केली.