वर्ष सरता सरता मध्य-पूर्वेतील आणखीन एक देश - सीरिया हा अनिश्चिततेच्या गर्तेत ढकलला गेला. आधीच गृहयुद्धामुळे उद्ध्वस्त झालेला आणि इराण-रशियाच्या कुबड्यांवर उभ्या असलेल्या सीरियातील असद राजवटीचा अस्त झाला आहे. तेव्हा, सीरियाचे भवितव्य आणि त्याचे एकूणच मध्य-पूर्वेमधील भूराजकीय परिणाम याचे आकलन करणारा हा लेख...
सीरियावर गेली 20 वर्षे एकहाती हुकूमशाही गाजवणार्या बशर अल-असद यांची सत्ता अखेरीस संपुष्टात आली आहे. केवळ 13 दिवसांच्या आत बंडखोर सैन्याने अलेप्पोपासून हमापर्यंत एकामागून एक शहरे ताब्यात घेतली आणि नंतर राजधानी दमास्कसवर हल्ला चढवला. बंडखोरांची ही मोहीम किती मोठी होती, याचा अंदाज यावरून लावता येतो की, शनिवार आणि रविवार दरम्यान दमास्कसला वेढा घातल्यानंतर त्यांनी दुपारपर्यंत संपूर्ण राजधानी ताब्यात घेतली. यानंतर सीरियन सैन्यात नेतृत्वाची तीव्र कमतरता होती आणि त्यांच्या अनेक सैनिकांनी सीमा ओलांडून शेजारच्या देशांमध्ये आश्रय घेण्यास सुरुवात केली आणि अशा प्रकारे बंडखोर सैन्याने असद कुटुंबाकडून 50 वर्षांची सत्ता हिसकावून घेतली.
सीरियातील राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांची सत्ता संपुष्टात आल्यानंतर देशाच्या भवितव्याबाबत बरीच अनिश्चितता निर्माण होणे साहजिकच. ‘हयात तहरीर अल-शम’ (एचटीएस) नावाच्या गटाच्या नेतृत्वाखाली झालेल्या हल्ल्यांनंतर दीर्घकाळ सीरियावर राज्य करणार्या बशर अल-असद यांची सत्ता संपुष्टात आली. सुरुवातीला बशर सीरियात सुधारणा आणि मोकळेपणा आणतील, अशी आशा होती. तथापि, या आशा लवकरच धुळीला मिळाल्या आणि बशर यांनी आपल्या वडिलांसारखीच एकहाती राजवट चालू ठेवली. 2011च्या निदर्शने हाताळण्यात असदच्या अपयशामुळे सीरिया गृहयुद्धात बुडाला. पाच लाखांहून अधिक लोक मारले गेले, सहा लाख निर्वासित झाले. मात्र, रशिया आणि इराणच्या लष्करी पाठिंब्यामुळे असद त्या काळात फुटलेल्या बंडखोरांपासून बचावले. यावेळी त्यांना रशियन हवाई दल आणि ‘हिजबुल्ला’च्या लढवय्यांचा पाठिंबा मिळाला. तथापि, इराण आणि रशियावरील त्यांच्या अवलंबित्वाचा परिणाम असा झाला की, जेव्हा रशिया युक्रेनच्या युद्धात व्यस्त झाला आणि इराणदेखील इस्रायलशी संघर्षात अडकला, त्याचदरम्यान बंडखोरांनी असदच्या राजवटीवर जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात बंडखोरांनी अलेप्पो, हमा आणि होम्स ही सीरियातील प्रमुख शहरे ताब्यात घेतली आणि नंतर राजधानी दमास्कस गाठली.
बंडखोर नेता अबू मोहम्मद अल-गोलानी, ज्याला ‘अहमद अल-शारा’ या नावाने ओळखले जाते, त्याने सत्ता हस्तांतरित करण्यासाठी त्वरित समिती स्थापन करण्याचे आवाहन केले आहे. एका निवेदनात अल-जलालीने सीरियन जनतेने निवडलेल्या कोणत्याही नेतृत्वाला सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे. या प्रयत्नांनंतरही, ‘एचटीएस’चा ‘अल-कायदा’शी संबंध असल्याचा इतिहास आहे. अशा स्थितीत त्याच्या कारभाराच्या क्षमतेबाबत शंका उपस्थित होत आहेत.
दमास्कसमध्ये ‘एचटीएस’च्या नेतृत्वाखालील बंडखोर संघटनांच्या आगमनानंतर, प्रत्येकाच्या ओठांवर एकच प्रश्न होता, तो म्हणजे, बशर अल-असद यांचे काय झाले? मात्र, रविवारी सकाळी रशियाकडून एक निवेदन जारी करण्यात येऊन असद सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्यांच्या विमानावरील हल्ल्याची बातमीही सोशल मीडियावर व्हायरल झाली. काही वृत्तांत असे म्हटले आहे की, त्यांचे विमान कोसळले आणि असद यांच्या मृत्यूशी संबंधित चर्चाही समोर आल्या. दरम्यान, रशियाने या सर्व अफवांना पूर्णविराम देत असद आणि त्यांच्या कुटुंबीयांना आश्रय दिल्याचे स्पष्ट केले आहे.
असदचे पतन हा मध्य-पूर्वेतील रशियन प्रभावाला मोठा धक्का असल्याचे मत अनेक अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. कारण, 2015 मध्ये हस्तक्षेप केल्यापासून, रशिया हा राजवटीचा सर्वात कट्टर समर्थक होता. 2015 मध्ये रशियन राष्ट्राध्यक्षांनी हजारो सैन्य पाठवून अध्यक्ष असद यांना बळ दिले. सीरिया प्रकल्पाद्वारे रशियाचे मुख्य उद्दिष्ट स्वतःला जागतिक शक्ती म्हणून सादर करणे हे होते. सोव्हिएत युनियनच्या पतनानंतर कमी झालेली रशियन ताकद आणि वर्चस्व पश्चिमेला दाखवण्याचे पुतीन यांच्यासमोर हे पहिले मोठे आव्हान होते. पुतीन त्यांच्या ध्येयात यशस्वी झालेही होते. लष्करी मदतीच्या बदल्यात, सीरियाने आपला हमीमिम हवाई तळ आणि टार्टस नौदल तळ रशियाला 49 वर्षांसाठी कराराने दिले होते. यामुळे पूर्व भूमध्य सागरात रशियाची आघाडी मजबूत झाली होती. भूमध्य समुद्र आणि आफ्रिकेतील शक्ती संतुलनासाठी हे तळ अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. मात्र, रशियाचे लष्करी लक्ष सध्या युक्रेनमधील युद्धावर केंद्रित आहे. सीरियातील नियंत्रण गमावल्यामुळे मॉस्कोच्या या प्रदेशातील आपल्या सामरिक स्थानांचे रक्षण करण्याच्या क्षमतेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.
बशर अल-असद हे मध्य-पूर्वेतील रशियाचे सर्वात जवळचे मित्र होते. रशियाने असदला सर्व प्रकारे मदत केली. आता असद गेल्यानंतर रशियाला त्याची भरपाई होणे कठीण आहे. त्यामुळे रशिया आता आपली प्रतिमा कायम ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. या पराभवासाठी रशियन प्रसारमाध्यमांनी सीरियन लष्कराला जबाबदार धरले आहे. तथापि, नंतर त्यांनी निष्कर्ष काढला की रशियाची सध्याची प्राथमिकता स्वतःची सुरक्षा आहे. त्यास युक्रेन युद्धाचा संदर्भ होता. रशियाने सीरियातील असद सरकारला मदत का केली नाही, हे यावरून स्पष्ट झाले. मात्र, आता असद यांना आश्रय देऊन रशियाने असदना वार्यावर सोडले नसल्याचे जगाला दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.
इराणसाठीही असद यांचे जाणे हा मोठा धक्का मानला जात आहे. सीरियावरील भौगोलिकदृष्ट्या कमकुवत नियंत्रणामुळे इराणलाही अनेकविध समस्यांना सामोरे जावे लागू शकते. सीरिया इराणला लेबेनॉनशी जोडतो. हे नेटवर्क शस्त्रास्त्र हस्तांतरण आणि प्रदेशातील वाढत्या प्रभावासाठी महत्त्वपूर्ण ठरले आहे. इस्रायलशी अलीकडच्या काळात झालेल्या संघर्षामुळे आणि येमेन आणि इराकमधील इराणच्या ‘प्रॉक्सीं’च्या दबावाखाली ‘हिजबुल्ला’ कमकुवत झाल्यामुळे इराणला मोठा धक्का बसला आहे. आता त्याला आपली रणनीती बदलण्याचा विचार करावा लागेल.
इस्रायलसाठी असद राजवटीच्या पतनाने संधी आणि धोके दोन्ही येतात. सीरियामध्ये इराणचा प्रमुख मित्र देश पडल्याने त्याचे ‘हिजबुल्ला’सोबतचे संबंध तुटले आहेत. परंतु, एक प्रमुख शक्ती म्हणून ‘एचटीएस’च्या उदयाने नवीन अनिश्चितता आणली आहे. इराण आणि ‘हिजबुल्ला’ या अनागोंदीचा फायदा घेत प्रगत शस्त्रसामग्री मिळविण्यासाठी इस्रायली सैन्यदेखील सावध आहे.