सहकाराची सीमा केवळ भारत नाही, तर विश्व असावी

08 Dec 2024 12:40:09
Dttatrey Hosabale

मुंबई : “भारतात स्वातंत्र्याच्या काळापासून सहकार ( Cooperative ) चळवळीची भूमिका महत्त्वाची आहे. सद्यस्थितीत सहकाराची सीमा केवळ भारत नाही, तर संपूर्ण विश्व असायला हवी आणि यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी केले. पृथ्वीचा ढासळत चाललेला समतोल वाचवण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. ‘सहकार भारती’चे आठवे राष्ट्रीय अधिवेशन अमृतसर येथे होत आहे. त्यावेळी अधिवेशनाच्या उद्घाटनसत्रात ते बोलत होते.

उपस्थितांना संबोधत पुढे ते म्हणाले, “आपण आर्थिक विकास करत आहे, पण सामाजिक विकासाकडे कोणाचेच लक्ष नाही. सामाजिक विकासासाठी आज संपूर्ण देशात परिवर्तनाची लाट निर्माण करण्याची गरज आहे. त्याचबरोबर, धर्म हा केवळ उपासनेपुरता मर्यादित नाही, तर धर्म जीवनाला स्थिरता देतो. जीवन आणि विकासासाठी धर्माचे पालन आवश्यक आहे. धर्माच्या चुकीच्या आकलनामुळे ते भौतिक जीवनाकडे दुर्लक्ष करत आहेत.”

सामाजिक संवेदनशीलतेकडे लक्ष देण्याची गरज

भारतातील सहकाराचे महत्त्व पटवून देताना ते म्हणाले की, “देशाच्या स्वातंत्र्यापूर्वीच सहकार चळवळ सुरू झाली होती. खर्‍या अर्थाने सहकार म्हणजे चांगले कुटुंब, लोक आणि राष्ट्रनिर्मिती, ज्यामध्ये एकमेकांबद्दल सहानुभूती असते. आज एकमेकांबद्दलची सामाजिक संवेदनशीलता संपत चालली आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.”

सहकारात सहकार्याची गरज

शेतकर्‍याचे उदाहरण देताना दत्तात्रय होसबळे म्हणाले की, “शेतकरी जेव्हा आपल्या शेतात धान्य पिकवतो, तेव्हा त्याला उपकरणासाठी लोहार, बियाणे विक्रेते, पाणी व्यवस्थापन, बाजारात व्यापारी यांसह अनेकांची गरज असते. पीक उत्पादन करणे ही केवळ एका व्यक्तीची बाब नसून ती परस्पर सहकाराची बाब आहे आणि हेच सहकाराचे सर्वात मोठे उदाहरण आहे.”

Powered By Sangraha 9.0