लोककलेचे यश

08 Dec 2024 23:14:06
 
यश जळवी
 
लोककलेचे महत्त्व फार. कोकणातील ‘दशावतार’ ही अशीच एक प्रसिद्ध लोककला. या लोककलेचा प्रसार व्हावा, यासाठी पूर्णवेळ दशावतारी म्हणून काम करणार्‍या यश जळवी यांच्याविषयी...
 
ला म्हणजे काय तर कला म्हणजे अभिव्यक्ती, कला म्हणजे कल्पनाशक्ती, कला म्हणजे अंतर्ज्ञान, कला म्हणजे अनुकरण, कला म्हणजे प्रतिनिधित्व, कला म्हणजे अनुभव, कला म्हणजे संवाद, कला म्हणजे माहिती अशा सर्व गुणासरितांचा संगम ज्याचे ठायी झालेला असतो तो म्हणजे कलाकार. चित्रपट ते नाटक अशा विविध ठिकाणी आपण सहज कलाकारांना बघत असलो, तरी लोककलेतील प्रसिद्धीपासून दूरच राहिले आहेत, ही शोकांतिका. अशीच कोकणातील प्रसिद्ध लोककला म्हणजे दशावतार होय! या कलेच्या प्रसार, प्रचार आणि प्रसिद्धीसाठी सर्वस्व झोकून दिलेले कलाकार म्हणजे कुडाळचे यश जळवी होय.
 
मुंबईला जन्म झालेल्या यश यांचे दोन वर्षांपर्यंतचे बालपण मुंबईमध्ये गेले. यश यांची आई मुंबईतील लोकलमध्ये निरनिराळ्या वस्तूंची विक्री करत असे, तर त्यांचे वडील सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत होते. त्यामुळे आपल्या पाल्यला एक सुरक्षित वातावरण मिळावे, या हेतूने यश यांच्या आईवडिलांनी वयाच्या दुसर्‍या वर्षीच यश यांना त्यांच्या गावाला म्हणजे, कुडाळ येथे त्यांच्या आजीआजोबांकडे पाठवले. त्यामुळे यश यांचे शालेय शिक्षण गावालाच झाले. इयत्ता पहिलीमध्ये यश यांच्या वर्गात अवघी तीन मुले आणि बाकीच्या मुली अशी स्थिती. त्यामुळे सुरुवातीपासूनच विविध स्पर्धांमध्ये भाग घेण्याची आवड असलेल्या यश यांना वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये सहभागी होण्यासाठी स्त्रीपात्र करण्याशिवाय गत्यंतरच नव्हते. तिथेच त्यांची पहिल्यांदा रंगभूमीवर स्त्रीभूमिकेशी नाळ जोडली गेली, ती आजतागयत घट्ट आहे. त्यानंतर यश यांनी विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. मात्र, ते रमले ते दशावतारात! गावामध्ये विविध जत्रा, यात्रा यांच्या निमित्ताने दशावताराच्या विविध कंपनी येत. त्यावेळी यश यांचे आजोबा जय यांचा हात पकडून त्यांना दशावतारी नाटके बघण्यासाठी घेऊन जात असत. त्यावेळेपासूनच एक पुरुष स्त्रीपात्र कसे साकारतो, याचे कुतूहल यश यांना होते. ‘दशावतारी’ कंपनीच्या रंगभूषा आणि वेशभूषा सुरू असलेल्या ठिकाणी, यश रेंगाळत असत. त्यावेळी स्त्रीपात्राचा श्रृंगाराचा त्यांनी अभ्यास केला. त्यांच्या परिचयाचे असलेले प्रशांत पावस्कर यांच्यामुळे दशावताराची आवड यश यांना लागली. त्यानंतर शालेय जीवनात अनेक दशावतारी नाटकांमध्ये स्त्रीपात्राची भूमिका करण्याचे शिवधनुष्य यश यांनी समर्थपणे पेलली.
 
मात्र, यश स्त्रीभूमिका करतो म्हणून गावातील काही लोकांनी त्यांच्याविषयी नको ते बोलण्यास, त्यांची मस्करी करून मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली.तरीही यश यांनी रंगदेवतेची सेवा सोडली नाही. मात्र, जेव्हा याबाबत यश यांच्या आईवडिलांना समजले, तेव्हा त्यांनी यश यांना स्त्रीपात्र न साकारण्याची गळ मुलाच्या काळजीपोटी घातली. त्यामुळे काही काळ यश यांना स्त्रीपात्र साकारण्यापासून स्वतःलारोखावे लागले. मात्र, इयत्ता नववीमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाला त्यांनी सादर केलेल्या दशावतारी नाटकात स्त्रीभूमिका करण्यावाचून पर्याय उरला नाही. आईवडील काही या कार्यक्रमाला येणार नाही, या भावनेने त्यांनीदेखील ही भूमिका करण्यास होकार दिला. मात्र, रंगमंचावर जेव्हा त्यांनी स्त्री श्रृंगार करून प्रवेश केला, तेव्हा पहिल्याच रांगेत यश यांची आई बसली होती. त्यामुळे यश यांचा प्रचंड गोंधळ उडाला. मात्र, भूमिकेला नीट न्याय देऊन यश घरी आले. त्यावेळी यश यांना आई आणि वडिलांचे बोल सहन करावे लागले. आई जरी बोल लावत असली, तरी प्रत्यक्ष आपल्या लेकराच्या सादरीकरणाला प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद तिने प्रत्यक्ष अनुभवला असल्याने, तिच्या बोल लावण्यातील लटका राग यश यांच्या सहज लक्षात आला. पुढे दहावीच्या परीक्षेत 83 टक्के गुण मिळवून यश उत्तीर्ण झाले. अकरावी-बारावी वाणिज्य शाखेतून करताना, त्यांनी त्यांच्यातील कला जोपासली. दरम्यान अनेक दशावतारी मंडळांकडून यश यांना स्त्रीभूमिकेसाठी विचारणा सुरू झाली होती. मात्र, पदवीच्या अभ्यासासाठी महाविद्यालयात प्रवेश घेतल्याने, ते संभाळूनच यश कला जोपासत राहिले. पदव्युत्तर अभ्यासक्रमानंतर नोकरी करण्यासाठी बँकेचे क्षेत्र यश यांनी निवडले. मात्र, या क्षेत्रातील व्यापारी स्पर्धा पाहून, त्यांना नोकरी करण्याचा विचार सोडून दिला आणि पूर्णवेळ कलाकार म्हणून काम करण्याचे ठरवले.
 
तोवर यश यांचे आईवडीलही गावाला आले होते. यश यांची आईवडील कोकण रेल्वेमध्ये विविध खाद्यपदार्थांची विक्री करत असत. अशा वेळी घरामध्ये वीजही नाही, इतकी गरिबी असताना, मेहनत घेणार्‍या आईवडिलांना यश मदत करत होते. मात्र, स्वतःच्या कलेवर आणि रंगदेवतेवर पूर्ण श्रद्धा असलेल्या यश यांनी पुन्हा एकदा ‘दशावतारी’ नाटकात काम करण्यास सुरुवात केली. अल्पावधीतच यश यांना अनेक कामे मिळाली. आज यश यांचा जम या क्षेत्रामध्ये बसला आहे. नुकतीच त्यांना दशावतारावर आधारित असलेला एक मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे, त्यामध्येही काम करण्याची संधी यश यांना मिळाली आहे. यश यांनी या लोककलेच्या सेवेतूनच रसिकांच्या कृपेमुळे स्वतःचे घर बांधले आहे. आई आणि वडील यांनी खूप कष्ट घेऊन यश यांना संस्कार आणि शिक्षण दिले. त्यामुळे लहानपणापासून पालकांचे कष्ट पाहिलेले यश हे त्यांच्या पालकांचा उत्तम सांभाळ करण्याचे स्वप्न असल्याचे ते सांगतात. बाकी सारे काही बघण्यासाठी माझी कला आणि रंगदेवता समर्थ असल्याने त्याचा विचार मी करत नसल्याचेही यश अधोरेखित करतात. यश यांच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या हार्दिक शुभेच्छा!
Powered By Sangraha 9.0