लोकशाहीला पायदळी तुडवत यूनुस सरकारचा आणखी एक डाव!

06 Dec 2024 17:18:23
Unus Govt.

ढाका : बांगलादेशातून शेख हसीना यांना हद्दपार करुन मोहम्मद यूनुस ( Unus ) सरकारचा मोर्चा आता राष्ट्रपिता मुजीबुर रहमान यांच्याकडे वळलेला दिसून येतोय. राष्ट्रपिता मुजीबुर रहमान यांच्या सर्व निशाण्या मिटवण्याकडे यूनुस सरकारचा कल आहे. इस्लामी कट्टरपंथी आणि पाकिस्तानच्या विचारधारेवर चालत यूनुस सरकारने आता बांग्लादेश चलनावरुन बंगबंधु मुजीबुर रहमान यांचा फोटो हटवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यांच्या जागी जुलै महिन्यातील सत्तापालटाची छायाचित्रे नोटांवर छापली जातील. याआधीही बंगबंधु यांचा इतिहास मिटवण्याचा प्रयत्न यूनुस सरकारने केलेला आहे.

बांगलादेशाच्या सेंट्रल बँकेने नव्या नोटांची छपाई सुरू केली आहे. सेंट्रल बँक १००, २००, ५०० आणि १००० च्या नोटा छापत आहे. बांगलादेशच्या यूनुस सरकारच्या आदेशानुसार हे छापले जात आहेत. या नोटांवर जुलै महिन्यातील सत्तापालटाची छायाचित्रे, बांगलादेशातील मशिदी आणि इतर धार्मिक स्थळांचे फोटो छापले जातील. येत्या ६ महिन्यांत या नोटा बाजारात येतील. आधी मोठ्या नोटांवरून मुजीबुर रहमानचा फोटो हटवला जात आहे, त्यानंतर सर्व प्रकारच्या चलनावर हेच धोरण लागू केले जाईल. बांगलादेशच्या अंतरिम सरकारने २९ सप्टेंबर २०२४ रोजी सेंट्रल बँकेला या नोटांचे डिझाइन बदलण्यास सांगितले होते, ज्याचे डिझाइन आता अंतिम झाले आहे. मुजीबुर रहमान यांच्या आठवणी मिटवण्याची बांगलादेशच्या सरकारची ही पहिली वेळ नाही आहे. याआधी यूनुस सरकारचे मंत्री महफूज आलम यांनी राष्ट्रपती कार्यालय असलेल्या बांगला भवनच्या दरबार हॉलमधून मुजीबुर रहमान यांचा फोटो हटवला होता.

बांग्लादेशच्या यूनुस सरकारने सत्तेत येताच ८ सुट्ट्या रद्द केल्या. या सुट्ट्या बंगबंधु यांच्या हत्येची तारिख आणि बाकी घटनांशी जोडलेल्या होत्या. एवढंच नव्हे तर बांग्लादेश मुक्ति युद्ध संबंधित असलेले फोटोदेखील हटवण्यात आले होते. यूनुस सरकारच्या सल्लागारांनी मुजीबुर रहमान हे फासिस्ट असलेले सांगितले आहे. पाकिस्तानात मुजीबुर रहमान यांना घृणास्पद ठरवले गेले आहे. आणि आता बांग्लादेशमध्येही अशीच वागणूक मिळताना दिसून येतेय. बांगलादेशात आत्तापर्यंत मुजीबुर रहमान यांना लाखो 'बंगालींना मुक्त करणारा नायक' म्हणून मानले जात होते. इस्लामी कट्टरपंथींच्या सहाय्याने यूनुस सरकार या सर्व गोष्टी मिटवून टाकण्याचा प्रयत्न करीत असलेले दिसून येत आहे.

Powered By Sangraha 9.0