माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचे निधन

06 Dec 2024 19:10:57
Madhukarrao Pichad

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकरराव पिचड ( Madhukar Pichad ) यांचे शुक्रवार, दि. ६ डिसेंबर रोजी निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. आदिवासींच्या हक्कासाठी व्यापक लढा उभा करणारा नेता, अशी त्यांची ओळख होती.

अहमदनगर जिल्ह्यातील राजूर येथील राहत्या घरी पिचड यांना ब्रेन स्ट्रोक आल्याने काही दिवसांपूर्वी त्यांना नाशिकच्या ९ पल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, दीर्घ उपचारादरम्यान त्यांचे प्राणज्योत मालवली. मधुकरराव पिचड यांनी १९८० ते २००४ या काळात नगरमधील अकोले विधानसभा मतदारसंघातून विधानसभेचे आमदार म्हणून सलग सात वेळा विजय मिळवला. मार्च १९९५ ते जुलै १९९९ या काळात ते महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते.

मधुकर पिचड राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीला काँग्रेसमध्ये होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. २०१९ मध्ये त्यांनी मुलगा वैभव पिचड यांच्यासह भाजपमध्ये प्रवेश केला. पिचड यांनी १९६१ मध्ये अमृतसागर दूध सहकारी संघाची स्थापना केली. १९९३ मध्ये स्थापन झालेल्या अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. १९७२ मध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून आणि नंतर पंचायत समिती अकोले तालुका अध्यक्ष म्हणून निवडून आल्यापासून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. १९८० पर्यंत त्यांनी काम केले.

२५ जून १९९१ रोजी आदिवासी विकास मंत्रालयाचे कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी सुधाकरराव नाईक मंत्रालयात नोव्हेंबर १९९२ पर्यंत काम केले. मार्च १९९३ मध्ये आदिवासी विकास मंत्रालय, दुग्धविकास मंत्रालय , प्रवास विकास मंत्रालय आणि पशु, संवर्धन आणि मत्स्यव्यवसाय मंत्रालयासाठी कॅबिनेट मंत्री म्हणून पिचडांनी चौथ्या पवार मंत्रालयात मार्च १९९५ पर्यंत काम केले.

Powered By Sangraha 9.0