दुर्मीळ आजारातही संघकार्य नेटाने पुढे घेऊन जात समाजासाठी प्रेरणास्रोत बनलेल्या ‘राष्ट्र सेविका समिती’च्या साधना गांगल यांच्याविषयी....
सदाशिव पेठेत 22 एप्रिल 1959 साली पुण्याच्या साधना गांगल यांचा जन्म झाला. वयाच्या तिसर्याच वर्षी वडील देवाघरी गेले. आईने प्राथमिक शाळेतील शिक्षिकेची नोकरी करायला सुरुवात केली. या नोकरीवरच उदरनिर्वाह सुरू होता. आई एकटीच कमावणारी असल्याने, त्यांचे बालपण गरिबीचे चटके सोसतच गेले. सर्वच भावंडे अभ्यासात हुशार होती. साधना यांनीही आपली चुणूक दाखवत, साहित्यामध्ये कला शाखेची पदवी प्राप्त केली. यादरम्यान साधना यांचे लग्न होऊन त्या विरार येथे सासरी रहायला आल्या. यावेळी त्या ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगा’ची परीक्षाही उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाल्या. आपल्या शिक्षणाच्या बळावर त्यांना राज्याच्या शिक्षण मंत्रालयाकडून, नोकरीचे शिफारसपत्रही देण्यात आले होते. मात्र, विरार ते मुंबई हा दोन तासांचा प्रवास करणे नको वाटत असल्याने, त्यांनी कामावर रूजू होण्यास नकार दिला.
तसेच, नोकरी करण्यापेक्षा कुटुंबाला प्राधान्य देत, साधना यांनी आपल्या मुलांना समाजात आदर्श निर्माण होईल, असे संस्कार दिले. साधना यांच्या दोन मुलांपैकी मोठा मुलगा भार्गव अगदी लहान वयापासून विरार येथील स्वयंसेवक प्रल्हाद जोशी यांच्यासोबत, रा. स्व. संघाच्या शाखेत जाऊ लागला. अगदी लहान वयातच साधना यांचा मुलगा भार्गव संघ शाखेचा प्रमुख शिक्षक झाला. त्याच्या माध्यमातूनच साधना यांना संघकार्याचा परिचय झाला. मुलानेच रा. स्व. संघामध्ये महिलांसाठीदेखील कार्य केले जात असल्याचे त्यांना सांगितले. संघाची अधिक माहिती घेत असताना, स्वयंसेवक प्रल्हाद जोशी यांच्या पत्नी अलका जोशी यांच्याकडून ‘राष्ट्र सेविका समिती’ची माहिती मिळाली. या समितीच्या माध्यमातून संघ वितरण शाखेची सेविका म्हणून, साधना यांचा समितीच्या प्रवेशाचा श्रीगणेशा झाला. थोरला भार्गव 11, तर धाकला मुलगा प्रथमेश आठ वर्षांचा झाल्यानंतर, साधना यांनी विरार येथे भरणार्या संघाच्या शाखेत 1994 सालापासून जायला सुरुवात केली. साधना यांचे कार्यक्षेत्र विशेषकरून वसई जिल्हा होते. त्यानंतर त्यांच्यावर विभागाचे दायित्व सोपवण्यात आले. यामध्ये रायगड, वसई आणि ठाणे या तीन जिल्ह्यात, त्या ‘राष्ट्र सेविका समिती’च्या माध्यमातून काम करू लागल्या. अनेक आयाम असलेल्या समितीमधील साधना यांच्याकडे, बौद्धिक क्षेत्राचे दायित्व देण्यात आले. त्यांच्याकडे बौद्धिक क्षेत्र असल्यामुळे, बौद्धिक पत्रके काढणे, लेख लिहिणे यासोबतच विविध शाखांमध्ये जाऊन बौद्धिके देण्याचे काम सुरू केले. तसेच, वर्ग-शिबिरांवर बौद्धिक प्रमुख म्हणून जबाबदारी निभावणे, विविध ठिकाणी प्रवास करणे, जिल्ह्यांचे हस्तलिखित काढण्यासाठी पुढाकार घेणे, यांसारख्या जबाबदार्या बौद्धिक प्रमुख म्हणून पार पाडल्या.
त्यासोबतच विरारमध्ये पाच वर्षे आरती वझे यांच्या मदतीने, बाल शाखा लावली. समितीचे कार्य करत असतानाच, साधना गांगल यांना वयाच्या 45व्या वर्षी करोडो लोकांमधून एकाला होणारा दुर्मीळ आजार जडला. त्यामुळे त्यांच्या प्रवासावर मर्यादा आल्या. तरीही समितीचे कार्य त्यांनी सुरूच ठेवले. मधल्या काळात वनवासी क्षेत्रातही साधना यांचे जाणे-येणे होते. वसई जिल्ह्यासोबत संलग्न असलेल्या, वनवासी कल्याण आश्रमाच्या शाळांमध्येही प्रवास होत होता. त्यामुळे साधना यांनी आपल्या लग्नाचा 25वा वाढदिवस, मुलांसोबतच एका पाड्यावर साजरा केला. खूप सार्या उपक्रमांमध्ये सहकार्यांच्या मदतीने साधना यांनी काम करण्याचा प्रयत्न केला. फक्त बौद्धिकच नाही, तर इतरही अनेक उपक्रम साधना यांनी राबवून यशस्वी केले. समितीचे काम करत असताना, वयाची 65 वर्षे कसे पूर्ण झाली, हे साधना यांनाही उमजले नाही. फक्त या काळात आजार डोके वर काढण्याचा प्रयत्न करायचा. तरीही आजारपण सांभाळत त्यांच्याकडून समितीचे कार्य अजूनही सुरूच आहे. 2016 साली दिल्ली येथे प्रेरणा शिबिरामध्ये, बौद्धिकच्या जोडीला तिथे प्रश्नमंजूषा स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये पाच पुस्तके अभ्यासण्याची सक्ती करण्यात आली.
या सर्वांची तयारी करून घेण्याची जबाबदारी साधना यांच्या खांद्यावर टाकण्यात आली. विशेष म्हणजे, तयारी करायला जास्त वेळ हाताशी नसतानाही, प्रश्नमंजुषा स्पर्धेत साधना यांना बक्षीस मिळाले, याचा त्यांना सार्थ अभिमान आहे. दिवसेंदिवस तब्येतीच्या कारणांमुळे, साधना यांना काम करणे जिकिरीचे होत आहे. त्यामुळेच दायित्वातून मुक्त करण्याची विनंती, दोन वर्षांपूर्वी साधना यांच्याकडून करण्यात आली. त्याला यावर्षी मान्यता मिळून, जुलै महिन्यात त्यांना दायित्वातून मुक्त करण्यात आले. मात्र, स्थानिक ठिकाणी समितीकडून टाकलेली कोणतीही जबाबदारी पूर्ण करण्यास साधना गांगल अजूनही, मागेपुढे बघत नाहीत. तसेच प्रबोधनवर्गाबरोबरच सर्वच वर्गांवर त्यांचे जाणे-येणे असते. आपल्या समितीच्या कार्याविषयी आणि एकूणच प्रवासाविषयी साधना गांगल म्हणतात की, माझी दोन्ही मुले संघाच्या शाखांमध्ये जातात. मुलांच्या आणि पतीच्या पाठिंब्यामुळेच मी ‘राष्ट्र सेविका समिती’चे कार्य इतकी वर्षे करू शकले, अजूनही जमेल तसे कार्य करत राहणार आहे. पुढच्या काळात साधना गांगल यांच्याकडून समाजहिताचे कार्य घडावे, यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून मनःपूर्वक शुभेच्छा...
विराम गांगुर्डे