कलाकारांना अमरत्वाचे वरदान लाभलेले असते, असे म्हटले जाते. कारण, आपल्यातून निघून गेल्यानंतरही त्यांच्या कलेच्या माध्यमातून ते आपल्या मनात कायम जीवंत राहतात. प्रफुल्ला डहाणूकरसुद्धा अशाच एक कलाकार होय. त्यामुळे आज दहा वर्षांनंतरही त्यांच्या चित्रांमधून त्या प्रेक्षकांशी संवाद साधतात, नवोदित चित्रकारांना प्रेरणा देतात आणि कलाक्षेत्राला बळ देतात. ‘जहांगीर आर्ट गॅलरी’मध्ये लवकरच सुरू होणार्या त्यांच्या चित्रप्रदर्शनाच्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा घेतलेला हा आढावा.
प्रफुल्ला डहाणूकर म्हणजेच लग्नाआधीच्या प्रफुल्ला जोशी. त्यांचा जन्म दि. 1 जानेवारी 1934 रोजी गोव्यात झाला. त्यांचा चित्रक्षेत्रातील प्रवास न्याहाळताना निसर्गचित्रे हा विषय त्यांना अधिक भावल्यासारखा वाटतो, तो बहुदा गोव्यात झालेल्या निसर्गसंस्कारांमुळेच. चित्रकाराला स्वभावतःच असलेल्या निसर्गाच्या उत्कट ओढीला ते संस्कार पूरक ठरले असावे आणि त्यातूनच त्यांना पुढे अमूर्त शैलीची वाट सापडली असावी. प्रफुल्ला यांच्या बालपणीच, त्यांचे कुटुंब मुंबईत स्थलांतरित झाले.
त्यामुळे त्यांचे शालेय शिक्षण मुंबईत झाले. शालेय वयात असल्यापासून, प्रफुल्ला यांची चित्रकला बहरत होती. शाळेतल्या मासिकासाठी प्रफुल्ला यांनी काढलेली चित्र त्यांच्या वडिलांनी पाहिली आणि त्यांच्यातील कलाकाराची ओळख त्यांच्या वडिलांना झाली. पुढे मुंबईच्या प्रसिद्ध ‘सर जे. जे. महाविद्यालया’त त्यांनी प्रवेश घेतला. 1955 मध्ये सुवर्ण पदक पटकावत त्यांनी जे. जे.मधील आपले शिक्षण पूर्ण केले. जे. जे.मधून बाहेर पडल्यानंतर, दुसर्याच वर्षी म्हणजे 1956 साली त्यांच्या चित्रांचे पहिले प्रदर्शन भरले. त्या प्रदर्शनाचे खूप कौतुकसुद्धा झाले. भारतीय संगीतातील रागरागिण्यांवर आधारित त्यांची चित्रे या प्रदर्शनात ठेवण्यात आली होती. भारतीय संगीतातील सुरांना त्यांनी आपल्या चित्रांत चित्रबद्ध केले होते. 1957 साली त्यांनी पॅरिसमधील ‘स्टुडिओ अॅतालिया 17’ या संस्थेत, मुद्राचित्रकलेचे शिक्षण घेतले. सोबतच निसर्गचित्रे, स्थिरचित्रे आणि मानवाकृती चित्रांमध्ये वेगळे प्रयोग करायलाही त्या तिथे शिकल्या. भारतीय चित्रकला आणि युरोपीय चित्रकला या दोन्हींचा प्रभाव प्रफुल्ला यांच्या चित्रांवर होता. 1958 ते 1967 या काळात ‘भुलाबाई देसाई मेमोरियल इन्स्टिट्यूट’ या ठिकाणी, प्रफुल्ला यांचा स्टुडिओ होता. पंडित रवीशंकर, इब्राहीम अल्काझी, व्ही. एस. गायतोंडे अशा नाट्य, संगीत आणि इतर विविध क्षेत्रांतील दिग्गज कलांकारांशी, त्यांचा याच ठिकाणी परिचय झाला. 1960 ते 1970चे दशक हे सगळ्याच क्षेत्रांसाठी बदलाचे दशक ठरले. कलाक्षेत्रसुद्धा त्याला अपवाद राहिले नाही. जुनी कात टाकून कला आधुनिकतेकडे वळत होत्या. अमूर्त चित्र म्हणजेच ‘अॅबस्ट्रॅक्ट पेंटिंग’ हा प्रकार त्यावेळी तग धरत होता. 1965च्या दरम्यान, प्रफुल्ला यांनी काढलेली चित्रेसुद्धा निसर्गचित्रे आणि अमूर्त चित्रांचा संगम होती.
आपल्या या चित्रांना प्रफुल्ला यांनी ‘इंटर्नल स्पेस’ असे नाव दिले होते. या चित्रांबद्दल प्रफुल्ला यांनी एका ठिकाणी लिहिले आहे की, काळ आणि अवकाश एकमेकांत गुंतलेले आहेत. अवकाश अनंत आणि कालातीत आहे. ते नष्ट करता येत नसल्यामुळे अनादि, अनंत आहे. मला ते अध्यात्मिक वाटते आणि एक चित्रकार म्हणून, माझ्या चित्रांच्या माध्यमातून ते टिपण्याचा मी प्रयत्न करते. तेच माझे शाश्वत अवकाश म्हणजे ‘इंटर्नल स्पेस’ आहे. प्रफुल्ला यांची चित्रे बघणार्याच्या दृष्टिकोनानुसार वेगवेगळी भासतात. एकाच कवितेचा प्रत्येकाला वेगळा अर्थ उमगावा , एखाद्याला दरवेळी तीच कविता वाचताना तिचा नवीन अर्थ लागावा अशीच प्रफुल्ला यांची चित्रे आहेत. चित्रकलेसोबतच प्रफुल्ला डहाणूकर यांना इतरही कलांची आवड होती. त्यांनी ‘कलाकार’ म्हणून केलेले काम जितके मोठे, तितकेच त्यांनी कलाकारांसाठी केलेले कामही मोठे होते. अनेक होतकरू कलाकारांना त्यांनी मदत केली. ‘बॉम्बे आर्ट सोसायटी’, ‘आर्ट सोसायटी ऑफ इंडिया’ व ‘आर्टिस्ट सेंटर’ या संस्थांच्या कार्यकारिणीवर काम केले आणि अध्यक्षपदही भूषविले. शिवाय, ‘गोवा हिंदू असोसिएशन’, ‘बडे गुलाम अली यादगार सभा’, ‘आय.एन.टी.’, ‘गोवा कला अकादमी’, ‘बिर्ला कला केंद्र’ अशा अनेक संस्थांसाठी अनेक उपक्रम पार पाडले. ‘बॉम्बे आर्ट सोसायटी’च्या उभारणीत त्यांनी योगदान दिले. अनेक कलाकारांच्या कलेची दखल घेतली जावी आणि त्यांचा सन्मान व्हावा, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. ‘जहांगीर आर्ट गॅलरी’च्या दीर्घ काळ विश्वस्तपदी असताना त्यांनी भारतातील, विशेषतः मुंबईतील समकालीन कलाउपक्रमांना चालना दिली. तसेच, ग्रामीण क्षेत्रातील सर्जनशील कलाकारांना मदतीचा हात देत, अनेक उपक्रमांमध्ये सामावून घेत प्रोत्साहित केले. कलाकारांना आणि कलाक्षेत्रांना समृद्ध आणि सक्षम करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले.
निसर्गचित्र, मानवी आकृतीबंधातून त्यांचा सुरू झालेला चित्रप्रवास नंतरच्या काळात, अमूर्त चित्रांकडे वळला. चित्रकलेतील अनेक स्थित्यंतरे त्यांनी अनुभवली आणि ती त्यांच्यात चित्रांत उतरवली. चित्रकलेत नवनवे प्रयोग त्यांनी केले आणि आधुनिकतावादी चित्रकार म्हणून ,त्या नावरूपाला आल्या. ज्याकाळी चित्रकलेत महिला चित्रकारांना फारशी ओळख नव्हती, चित्रकार म्हटल्यावर पुरुषांची नावे समोर यायची, अशा काळात प्रफुल्ला यांनी या क्षेत्रावर पाडलेली छाप अनेकांना प्रेरणा देणारीच होती. त्यामुळे भारतीय चित्रकारांची आणि चित्रकलेची चर्चा करताना, प्रफुल्ला डहाणूकर यांचे नाव वगळून पुढे जाताच येत नाही.
अशा या जीवनाची शाश्वतता दर्शविणार्या, अथांग, अध्यात्मिक, गूढ आणि आत्मिक समाधान देणार्या जगप्रसिद्ध चित्रकार प्रफुल्ला डहाणूकर यांनी साकारलेल्या चित्रकृतींचे प्रदर्शन बुधवार, दि. 11 डिसेंबर ते सोमवार, दि. 16 डिसेंबर या कालावधीत ‘जहांगीर आर्ट गॅलरी’मध्ये भरणार आहे. ‘प्रफुल्ला अ रेट्रोस्पेक्टिव्ह’ या नावाने हे प्रदर्शन ओळखले जाणार आहे. प्रफुल्ला यांच्या कन्या गौरी डहाणूकर-मेहता आणि गोपिका डहाणूकर-कार्तिकेयन यांनी या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. न्यूयॉर्क येथील ‘एशिया सोसायटी’च्या कला इतिहासकार आणि समीक्षक बेथ सिट्रॉन यांचे या प्रदर्शनाला साहाय्य लाभले आहे.
प्रदर्शनाच्या माध्यमातूनस्मृतींना उजाळा
‘मनाच्या गाभार्यात डोकावणारी खिडकी’ असे स्वतःच्या चित्रांचे वर्णन करणार्या प्रफुल्ला यांच्या निधनाला, दहा वर्षे झाली आहेत. प्रफुल्ला डहाणूकर यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी, त्यांनी रेखाटलेल्या कलाकृती प्रदर्शनाच्या माध्यमातून कलारसिक, अभ्यासकांसमोर आणत आहोत असा या प्रदर्शनाचा हेतू प्रफुल्ला यांच्या कन्या गोपिका यांनी सांगितला.
मंगळवार, दि. 10 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता कलाइतिहासकार, संशोधक डॉ. सरयू दोशी आणि कलाइतिहासकार, लेखिका डॉ. फिरोजा गोदरेज यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. दि. 11 डिसेंबरपासून हे प्रदर्शन प्रेक्षकांसाठी खुले होणार आहे. सोबतच, या प्रदर्शनाच्या निमित्ताने दि. 11 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता ‘इकॉलॉजीज ऑफ अॅब्स्ट्रॅक्शन : कलाकार प्रफुल्ला डहाणूकर’ या चर्चासत्राचे ‘एशिया सोसायटी’चे भारतीय केंद्र यांच्या सहकार्याने आयोजन करण्यात आले आहे. सविता आपटे, बेथ सिट्रॉन आणि गोपिका डहाणूकर या चर्चासत्राच्या माध्यमातून, प्रफुल्ला डहाणूकर यांच्या कलाक्षेत्रातील वाटचालीचा आढावा घेणार आहेत.
‘प्रफुल्ला अ रेट्रोस्पेक्टिव्ह’ या प्रदर्शनासोबतच ‘प्रेरणा’ या प्रदर्शनाचे ‘जहांगीर आर्ट गॅलरी’मध्ये आयोजन करण्यात आले आले आहे. प्रफुल्ला यांनी कलाकारांच्या मदतीसाठी केलेले कार्य सुरू ठेवण्यासाठी, त्यांच्या निधनानंतर पती दिलीप डहाणूकर यांनी प्रफुल्ला यांच्या स्मरणार्थ ‘प्रफुल्ला डहाणूकर आर्ट फाऊंडेशन’ची स्थापना केली. या फाऊंडेशनच्या माध्यमातून संपूर्ण भारतातील निवडक उदयोन्मुख चित्रकारांना, शिष्यवृत्ती दिली जाते, ज्यायोगे युवा कलाकारांना त्यांच्या कलाक्षेत्रातील प्रवासासाठी प्रोत्साहन दिले जाते. तसेच, या कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याकरिता प्रदर्शनाच्या माध्यमातून त्यांच्या कलाकृती जगासमोर आणण्याची संधीही दिली जाते. ‘प्रेरणा’ या प्रदर्शनाच्या निमित्ताने ‘प्रफुल्ला आर्ट फाऊंडेशन’च्या ‘कलानंद शिष्यवृत्ती’ने सन्मानित चित्रकरांच्या चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.
‘प्रफुल्ला अ रेट्रोस्पेक्टिव्ह’ आणि ‘प्रेरणा’ ही दोन्ही प्रदर्शने प्रेक्षकांच्या नजरेत आणि मनात कायमचे घर करून राहतील, यात शंका नाही. आपल्या कलेच्या माध्यमातून चित्रांमध्ये आणि इतरांच्या आयुष्यात रंग भरून, त्यांचे आयुष्य प्रफुल्लित करणार्या कलासक्त व्यक्तिमत्त्व प्रफुल्ला डहाणूकर यांच्या चित्रांचा आस्वाद घेण्यासाठी आणि हा प्रदर्शनाचा ‘प्रफुल्लायोग’ अनुभवण्यासाठी दि. 11 ते दि. 16 डिसेंबर या कालावधीत, ‘जहांगीर आर्ट गॅलरी’मध्ये प्रेक्षकांनी आवर्जून जायलाच हवे.
दिपाली कानसे