सागरी ध्वनिप्रदूषण रोखण्याचे संभाव्य उपाय

06 Dec 2024 22:43:49

 pollution
 
प्रदूषण हे पर्यावरणाच्या सर्व घटकांवर विपरीएत परिणाम करणारे असतेच. आजावर प्रदूषणाचे विविध प्रकार थांबवण्यासाठी जगभर प्रयत्न सुरु असल्याचे ऐकले आहे. मात्र, आता जलवाहतुकीदरम्यान होणार्‍या पाण्यातील ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या प्रयत्नांची माहिती देणारा हा लेख...
 
नवासाला निघालेल्या राम-लक्ष्मण-सीता यांनी श्रृंगवेरपूर या ठिकाणी गंगा ओलांडली. राजा दशरथाचा मित्र निषादराज गुहक याने, आपल्या सुसज्ज नौकेतून रामप्रभूला गंगेपार नेले. नौका वल्हवता-वल्हवता लाटांच्या आणि वल्ह्यांच्या तालावर, गुहक आणि याचे साथीदार गात होते - ‘श्रीरामांचे नाम गात या श्रीरामांना पार करू, जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी.’
 
महाराष्ट्र वाल्मिकी माडगुळकर अण्णा आणि बाबूजी सुधीर फडके यांनी अजरामर केलेल्या, गीतरामायणामधले हे एक अतिशय मधुर गीत आहे. याशिवाय वल्ह्यांच्या तालावर गायलेले ’गोमू माहेरला जाते हो नाखवा, तिच्या घोवाला कोकण दाखवा’ हे ’वैशाख वणवा’ चित्रपटातले एक सुंदर गाणे आहे.
 
हिंदी चित्रपटात तर अशी नौकागीते भरपूर आहेत. चटकन आठवणारी दोन गाणी म्हणजे, ’आवारा’मधले ’भैय्या तेरी मजधार, होशियार, होशियार’ आणि ’मिलन’मधले ’सावन का महिना, पवन करे शोर, अरे शोर नहीं बाबा सोर!’
 
तर अशाच सगळ्या रम्य फिल्मी कल्पना उराशी बाळगून, आम्ही म्हणजे आमचा ट्रेकिंग ग्रुप तापोळ्याच्या कोयना धरणाच्या धक्क्यावर लॉन्चची वाट पाहात उभे होतो. मुंबई ते सातारा तेे तापोळा एस.टी.ने आणि पुढे तापोळ्याहून लॉन्चने कोयना धरणाच्या विस्तीर्ण जलाशयातून, लॉन्चने किल्ले वासोटा गडाचा पायथा गाठायचा होता. सुमारे तासाभराचा प्रवास होता. आमचा हा ट्रेकिंग ग्रुप गाण्याचा पण मोठा शौकीन होता, आहे. अनेकजण चांगले गातात, तर सगळेजण वेगवेगळी नौकागीते आठवत होतो.
 
पण.... कसले काय! लॉन्चच्या इंजिनचा कानठळ्या बसवणारा आवाज आणि डिझेलचा काळा धूर भसाभसा ओकणारा एक्सॉस्ट यांच्या दुहेरी मार्‍यात, आमची गाणीबिणी मनातच राहिली. मग आमच्या लक्षात आले की, आपण हिंदी चित्रपटात पाहिलेली सर्व नौकागीते ही शिडाच्या होड्यांवर गायलेली होती. तिथे इंजिनचा कर्णकटू आवाज नव्हता.
 
नेमका हाच मुद्दा पकडून (म्हणजे होड्यांवरील फक्कड गाण्यांचा नव्हे) कॅनडातल्या व्हँकूव्हर जवळच्या ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठातले संशोधक, नेदरलॅण्ड्स किंवा हॉलंडच्या ’मरीन’ या समुद्र संशोधन संस्थेतले संशोधक असे प्रयोग करून पाहात आहेत की, ज्यामुळे पाण्यातले ध्वनिप्रदूषण कमी करता येईल.
 
छोट्या मच्छीमार होड्या किंवा प्रवासी वाहतूक करणार्‍या छोट्या लॉन्चेस हा यांचा विषय नाही, तर मालवाहतूक करणार्‍या विशाल बोटी-कंटेनर शिप्स आणि त्यांच्या पंख्यांमुळे-प्रॉपेलर्समुळे होणारे समुद्री ध्वनिप्रदूषण हा त्यांच्या संशोधनाचा विषय आहे.
समुद्रात साधारण एक हजार मीटर्स किंवा सुमारे तीन हजार फूट खोल अंतरापर्यंतच, सूर्याची किरणे पोहोचतात. पण तरीसुद्धा तिथे लखलखीत सूर्यप्रकाश नसून, संधिप्रकाशासारखा मंद उजेड असतो. त्यापेक्षा जास्त खोल अंतरावर काळोखच असतो आणि तो अधिकाधिक गडद होत जातो. अशा स्थितीत जलचर प्राणी हे डोळ्यांनी पहाण्यापेक्षा, ध्वनीने जास्त ’पहातात’. म्हणजेच, त्यांना त्यांच्या परिसरातल्या शत्रू-मित्र-भक्ष्य-खाद्य यांचे ज्ञान डोळ्यांनी पाहून होण्यापेक्षा, त्या त्या वस्तूंपासून येणार्‍या ध्वनींमुळे होते. म्हणजे साध्या भाषेत, अमूक फ्रिक्वेन्सीची ध्वनिलहर आली, की ती मित्राकडून आली आहे. धोका नाही. अमूक फ्रिक्वेन्सीची धनिलहर आली, की ती शत्रूकडून आली आहे. चला, पळा, लपा किंवा लढायला तयार व्हा किंवा अमूक फ्रिक्वेन्सीची ध्वनिलहर आली, की हे जीवंत भक्ष्य आहे किंवा वनस्पतिज खाद्य आहे, हे या जलचरांना कळते. मग त्यानुसार ते पुढची हालचाल करतात.
 
आज जगातली 90 टक्के व्यापारी माल वाहतूक ही समुद्राद्वारेच होते. कारण स्पष्टच आहे. रोड ट्रान्सपोर्ट हा खर्चिकही असतो, नि वेळखाऊ ही असतो. एअर ट्रान्सपोर्ट हा झटपट खरा, पण फारच महाग पडतो. जहाज वाहतूक ही सर्वात स्वस्त. जोपर्यंत शिडाच्या बोटी होत्या, तोपर्यंत ठीक होते. पण एकदा वाफेचे इंजिन आल्यावर, आगबोटी आल्या. प्रथम दगडी कोळसा आणि आता डीझेल किंवा पेट्रोल पीत बोटींची इंजिने, जनरेटर्स धडधडू लागली. अलीकडे राक्षसी आकाराची कंटेनर्स शिप आणि लक्षावधी लीटर्स कच्चे तेल वाहून नेणारे, महाकाय ऑईल रिग्ज यांची प्रचंड वाहतूक जगभरच्या सगळ्या महासागरांमधून सुरू झालेली आहे. दरवर्षाला ती वाढतच आहे.
 
तुम्ही जर एखाद्या प्रवासी बोटीवरून प्रवास केलात, तर तुम्हाला तिच्या प्रॉपेलरचा आवाज आणि मागच्या बाजूला पोटात असलेल्या इंजीनचा आवाज एवढेच ऐकू येतात. ते काही कर्णकटू नसतात. जमिनीवरच्या कोणालाही संयंचलित वाहनाचा जितपत आवाज येईल, तितकेच ते असतात, किंबहुना कमीच असतात. कारण रस्त्यावरच्या, उगीच हॉर्न मारत पुढच्याला ओव्हरटेक करू पाहणार्‍या आगाऊ ड्रायव्हर लोकांसारखे बेछूट गडी समुद्रावर नसतात.
 
पण हे झाले माणसांचे. जलचरांना या ध्वनींचा फार त्रास होतो. शत्रू-मित्र-भक्ष्य-खाद्य यांना ओळखण्याच्या यांच्या ज्या ठराविक फ्रिक्वेन्सीच्या ध्वनिलहरी आहेत, यांत प्रचंड विक्षेप येतो. परिणामी, ते जलचर अतिशय गोंधळून जातात. जहाजाचा पंखा किंवा प्रॉपेलर हा अर्थातच अतिशय वेगाने फिरत असतो. त्याच्या फिरण्यामुळे एकतर पाणी गरम होते आणि दुसरे म्हणजे हवेचे लक्षावधी बुडबुडे निर्माण होतात. अनेक हौशी प्रवासी, मुद्दाम बोटीच्या मागे बसून त्या बुडबुड्यांच्या रस्त्याची गंमत बघतात. खरोखरच ते दृश्य मोठे छान दिसते. पण या लक्षावधी बुडबुड्यांमुळे पाण्यात एक पोकळी निर्माण होते. क्षणार्धात ते बुडबुडे फुटतात. पाण्यात पाणी मिसळते आणि ती पोकळी मिटून जाते.
 
हे असे आपल्या डोळ्यांना दिसते. पण या बुडबुड्यांमुळे नि ती पोकळी निर्माण होणे नि मिटून जाणे, यांचा एक ध्वनी निर्माण होत असतो. तो पाण्यात टिकून राहतो. एवढेच नव्हे, तर तो खोलवर झिरपत जातो. त्याचा जलचर प्राण्यांना फार त्रास होतो. आणि दिवसेंदिवस जागतिक समुद्री व्यापार हा वाढतच जाणार आहे. तो कमी नक्कीच होणार नाही. म्हणजेच, जलचरांच्या ध्वनिलहरींमध्ये माणसांच्या उद्योगांमुळे अधिकाधिक विक्षेप येत राहणार.
 
तर व्हँकुव्हरच्या ब्रिटिश कोलंबिया विद्यापीगतले मूळ भारतीय वंशाचे संशोधक राजीव जयमान आणि नेदरलॅण्ड्सच्या ‘मरीन’ या समुद्र संशोधन संस्थेचे जोहान बॉशर्स यांना असे वाटले की, या प्रश्नावर काही तोडगा काढता आला तर बघूया. दोघांनी जे काही संशोधन केले आहे, ते दोन टोकांचे आहे. यातला किचकट तांत्रिक तपशील टाकून, आपण ते समजून घेऊया.
 
बोटीच्या प्रॉपेलरमुळे लक्षावधी बुडबुडे निर्माण होतात. राजीव जयमान यांनी प्रॉपेलर हा नुसत्या लोखंडाचा न बनवता, त्यात पॉलिमरचा वापर केला. त्यामुळे प्रॉपेलरची पाती नुसतीच गरागरा फिरून पाणी न कापता, झुकतील, वळतील, पाणी कापतील, पुन्हा सरळ होतील. त्यामुळे बुडबुडे कमी निर्माण होतील. यातून पोकळी निर्माण होणे, ती मिटणे आणि या क्रियेचा ध्वनी निर्माण होणे, यात लक्षणीय घट होईल.
 
‘मरीन’ संस्थेचे जोहान वॉशर्स यांनी बुडबुडे कमी करण्याऐवजी ते अतोनात वाढवले. विज्ञानाचा एक गंमतीदार सिद्धांत आहे. समजा, एखादा सुगंध आहे. पण तो सुगंध अति प्रमाणात पसरला गेला, तर तो दुर्गंध होतो. तेच एखादा दुर्गंध अति झाला, तर तो सुगंध भासू लागतो. तसे समजा, प्रॉपेलरमुळे पाण्यात दहा लाख बुडबुडे उत्पन्न होत आहेत, तर ते वाढवा. त्याची संख्या दहा कोटी होऊ द्या. ज्यामुळे त्यांच्यामध्ये पोकळी निर्माणच होणार नाही. त्यामुळे अर्थातच ध्वनी निर्माणच होणार नाही किंवा झालाच, तर अगदी अल्प प्रमाणात होईल.
 
जोहान बॉशर्स यांचे असे म्हणणे आहे की, अशा कृत्रिम बुडबुड्यांचा एक पडदा जर आपण संपूर्ण जहाजाभोवती उभा केला, तर जहाजाच्या इंजिनचा, जनरेटर्सचा जो अखंड धडधड आवाज येत असतो, तोसुद्धा कमीत कमी करता येईल. इतकेच नव्हे, तर त्यांचे असे म्हणणे आहे की, प्रगत देशांची हेरगिरी करण्यासाठी फिरणारी जहाजे, अशा प्रकारचे तंत्रज्ञान वापरत आहेतच. कारण यांना कोणात्याही रडार, सोनार इत्यादि शोधयंत्रणेला आपला माग लागू द्यायचा नसतो. हे प्रगत देश आपले हे अति अद्ययावत तंत्रज्ञान, व्यापारी जहाज वाहतुकीसाठी खुले करणार नाहीत.
 
आता यावर युनिव्हर्सिटी कॉलेज, लंडनच्या नौदल वास्तुशास्त्र विभागाचे संशोधिक टॉम स्मिथ म्हणतात, समुद्री वाहतूक अधिकाधिक ध्वनिविरहित व्हावी, यासाठी आणखीनसुद्धा बरेच उपाय करता येतील. पण आपली मालवाहू जहाजे ध्वनिविरहित व्हावीत, असे किती कंपनीमालकांना वाटते? ते म्हणतील, ना खलाशांची तक्रार आहे, ना ग्राहकांची तक्रार आहे. मग आला मोठा आवाज, तर बिघडले कुठे? जलचर प्राण्यांच्या फ्रिक्वेन्सी बिघडू नये, म्हणून आम्ही आमची जहाजे ’री-फिट’ करून घ्यावीत, हा कुठला कायदा?
 
म्हणजे, प्रश्न पुन्हा पैशाशी आला. आणि पर्यावरण दुषित वगैरे होऊ नये म्हणून, जास्त पैसे खर्च करायला कुणीही तयार नसतो. काही ठराविक वर्षे झाल्यानंतर वाहने रद्दबातल करावीत. कारण वयोमर्यादा संपलेली वाहने, भयंकर वायुप्रदूषण करतात. हा कायदा पारित करताना, किती बोंबाबोंब झाली होती, आठवतेय ना?
 
पण आज नाही उद्या, हे करावेच लागणार आहे, असे जोहान वॉशर्स म्हणतात. कारण, ’इंटरनॅशनल मेरिटाईम ऑर्गनायझेशन’ने जहाज उद्योगातले, कार्बन उत्सर्जन 70 टक्क्यांनी कमी करण्याचा चंग बांधला आहे. त्यामुळे आता नवी बांधली जाणारी जहाजे धनिविरहित यंत्रणेने सुसज्ज (इन-बिल्ट) अशीच येतील. जोहान बॉशर्स पुढे म्हणतात की, अशी जहाजे आत्ताच्या जहाजांपेक्षा अधिक कार्यक्षमतेने वाहतूक करतात असे दिसून आले की, कंपन्या त्यांचा आनंदाने स्वीकार करतील.
 
हुश्श! समुद्रावर हे सगळे जेव्हा होईल तेव्हा होवो. तूर्त आम्ही वाट पाहात आहोत, मशिदींवरचे भोंगे केव्हा बंद होतात याची!
Powered By Sangraha 9.0