पुण्याच्या नेहरू मेमोरियल सभागृहात रंगणार 'मी नथुराम गोडसे बोलतोय' नाटकाचा हिंदी प्रयोग

06 Dec 2024 18:09:42

nathuram godse hindi natak
 
पुणे : मराठी रंगभूमीवर गाजलेले ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक आता हिंदी रंगभूंमीवर नाट्यरसिकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झालं आहे. यासाठी निर्माते परितोष पेंटर, सेजल दिपक पेंटर, लेखक दिग्दर्शक भरत दाभोळकर यांनी पुढाकार घेतला आहे. परितोष पेंटर प्रस्तुत आणि भरत दाभोळकर लिखित दिग्दर्शित ‘नथुराम गोडसे को मरना होगा’ या हिंदी नाटकाचे दोन विशेष प्रयोग रविवार १५ डिसेंबरला दुपारी २.३० वा. आणि सायं.५.३० वा. पुण्याच्या नेहरू मेमोरियल सभागृहात रंगणार आहे.
 
प्रदीप दळवी लिखित ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या मूळ नाटकावर या हिंदी नाटकाचे रूपांतर करण्यात आले आहे. यातील नथुराम गोडसे यांची भूमिका अभिनेता विकास पाटील तर महात्मा गांधी यांची भूमिका अनंत महादेवन यांनी साकारली आहे. या दोघांसोबत भरत दाभोळकर, मोहन आझाद, कौस्तुभ सावरकर, संदीप जंगम, मंगेश देसाई आणि डॉ. दीपा भाजेकर यांनी या नाटकात भूमिका केल्या आहेत. आयडियाज एंटरटेनमेंटच्या ‘नथुराम गोडसे को मरना होगा’ या हिंदी नाटकाच्या निर्मितीची धुरा सेजल दिपक पेंटर यांनी सांभाळली आहे.
 
‘जे अमराठी प्रेक्षक आहेत त्यांनाही महात्मा गांधींच्या मृत्यूमागचं कारण, नथुराम गोडसे व्यक्ती म्हणून नक्की कशी होती? हे या नाटकामुळे जाणून घेता येईल. ‘गांधीजींना मानणारा ते त्यांचा मारेकरी’ असा नथुराम गोडसे यांचा प्रवास या नाटकाच्या निमित्ताने उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे प्रस्तुतकर्ते परितोष पेंटर आणि लेखक, दिग्दर्शक भरत दाभोळकर यांनी सांगितले आहे. 
Powered By Sangraha 9.0