बांगलादेशातील अल्पसंख्याकांची सुरक्षा सुनिश्चित करावी

06 Dec 2024 18:19:45

Grand Mufti of India

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Grand Mufti of India Bangladesh)
ग्रँड मुफ्ती ऑफ इंडियाचे शेख अबुबकर अहमद यांनी बांगलादेशात निर्माण झालेल्या तणावाबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली असून देशाने अल्पसंख्याक समुदायांची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी त्वरित पावले उचलण्याची युनुस सरकारला विनंती केली आहे. ग्रँड मुफ्ती ऑफ इंडिया हे भारतातील सुन्नी मुस्लिम समुदायाचे प्रभावशाली धार्मिक प्राधिकरण आहे. शेख अबुबकर अहमद हे त्याचे सरचिटणीस आहेत. त्यांनी या बांगलादेशातील अल्पसंख्याकांमधील असुरक्षिततेचा मुद्दा चिंताजनक मानून या मुद्द्यांचा निषेध केला आहे.

हे वाचलंत का? : बांगलादेशकडून 'चिकन नेक' परिसरात तुर्की ड्रोन तैनात

अशा अशांततेचे प्रादेशिक परिणाम अधोरेखित करून, त्यांनी नमूद केले की बांगलादेशातील अल्पसंख्याकांना भेडसावणारी असुरक्षितता संपूर्ण दक्षिण आशियामध्ये प्रतिध्वनित झाली आहे. ज्यामुळे भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि नेपाळ या शेजारी देशांवरही परिणाम झाला आहे. त्यामुळे सरकारने सामान्य लोकांमध्ये भावनिक प्रतिक्रिया भडकवणाऱ्या किंवा जातीय फूट वाढवणाऱ्या कृतीपासून दूर राहावे.

शेख अबुबकर अहमद यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारला सांप्रदायिकतेला आळा घालण्यासाठी निर्णायक उपाययोजना करताना शांतता आणि सौहार्दाला प्राधान्य देण्याचे आवाहन केले. त्यांनी भारताला जवळचा शेजारी या नात्याने बांगलादेशला स्थैर्य वाढवण्यासाठी आणि अल्पसंख्याकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी रचनात्मक पाठिंबा देण्याचे आवाहन केले. तसेच अल्पसंख्याक समुदायांचे दुर्लक्ष रोखण्यासाठी आणि या प्रदेशात सहअस्तित्व वाढवण्यासाठी सामूहिक प्रयत्नांच्या गरजेवरही भर दिला.
Powered By Sangraha 9.0