शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण, सहा शेतकरी जखमी

पोलिसांकडून अश्रुधुरांच्या नळकांड्यांचा वापर

    06-Dec-2024
Total Views |
 
Farmers protest
 
 
चंदीगड : शेतकरी आंदोलनामुळे पंजाब-हरियाणा येथील शंभू सीमेवर ताणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी आणि पोलिसांमध्ये  शुक्रवारी ६ डिसेंबर २०२४ रोजी दिल्ली येथे मोर्चासाठी निघालेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी अडवले असता शेतकरी संतापले आहेत. शेतकऱ्यांनी बॅरिकेड्स तोडून जाण्याचा प्रयत्न केला असून आता त्याला प्रत्युत्तर म्हणून हरियाणा पोलिसांनी अश्रुधुराच्या २१ नळकांड्या सोडल्या आहेत. यावेळी प्लास्टिकच्या गोळ्यांचाही वापर करण्यात आला असून या आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झाले. याप्रकणात सहा शेतकरी जखमी झाले असल्याचे वृत्त आहे.
 
शेतकरी मालच्या किंमतीसाठी आणि इतर मागण्यांसाठी कायदेशीर हमी देण्यासाठी आंदोलन करत आहेत. 'दिल्ली चलो' असा शेतकऱ्यांनी मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. यावेळी १०१ शेतकऱ्यांची पहिली तुकडी ट्रॅक्टर-ट्रॉलीशिवाय दिल्लीकडे जाण्याचा प्रयत्न करत होती. त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी बॅरिकेड्स, तारा आणि लोखंडी खिळ्यांचा वापर करत त्यांना येण्यापासून विरोध केला. 
 
 
 
परिस्थिती अटोक्यात यावी यासाठी आता पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच करडी नजर राहावी यासाठी ड्रोनचा वापर करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी ९ डिसेंबरपर्यंत इंटरनेट सुविधा बंद ठेवण्यात आली आहे. यामुळे अफवांवर नियंत्रण येईल आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी सोपे जाईल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.