2047 पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था 55 ट्रिलियन डॉलरची झाली असेल, असा विश्वास आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे डॉ. के. व्ही. सुब्रमण्यम यांनी व्यक्त केला आहे. येणार्या काळात भारतात गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना फार मोठा परतावा मिळेल, असा दावाही त्यांनी केला आहे. त्यांचे हे उज्ज्वल भारताच्या भवितव्याचे भाकित संधीचे नवे प्रवाह अधोरेखित करणारेच म्हणावे लागेल.
भारत 2047 सालापर्यंत 55 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था होईल, असा विश्वास व्यक्त करताना आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे कार्यकारी संचालक डॉ. के. व्ही. सुब्रमण्यम यांनी म्हटले आहे की, भारतीय अर्थव्यवस्थेचा होत असलेला विकास अमेरिकन गुंतवणूकदारांना अभूतपूर्व संधी देणार आहे. येत्या 20 ते 25 वर्षांत, अशा प्रकारचा परतावा देणारी दुसरी कोणतीही अर्थव्यवस्था नसेल, असेही त्यांनी म्हटले आहे. गुंतवणूकदारांना दुपटीने नव्हे, तर तिपटीने परतावा मिळेल, असा दावाही त्यांनी केला आहे. भारताचे प्रमुख आर्थिक सल्लागार म्हणूनही, सुब्रमण्यम यांनी काम पाहिले आहे, हे महत्त्वाचे. 2014 सालानंतर भारताने ज्या सुधारणा राबवल्या, त्यांच्यामुळेच भारत 2047 मध्ये स्वातंत्र्याचे शतकमहोत्सवी वर्ष साजरे करत असताना, 25 वर्षांहूनही कमी कालावधीत भारतीय अर्थव्यवस्था 55 ट्रिलियन डॉलर्सची झाली असेल, असे त्यांनी विशेषत्वाने म्हटले आहे.
भारताची होत असलेली वाढ अमेरिकी गुंतवणूकदारांनी उत्तम संधी देणारी आहे, हे त्यांचे विधान भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढत्या संभाव्यतेवर भर देणारे आहे. प्रतिकूल परिस्थितीतही, भारताने राखलेला वाढीचा अभूतपूर्व वेग हा भारताच्या आर्थिक विकासाचा महत्त्वाचा चालक आहे. जागतिक आघाडीवर संकटे कायम असूनही, भारताने सातत्याने उच्च जीडीपी दर कायम राखला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या होत असलेल्या शाश्वत वाढीला, अनेक घटक कारणीभूत आहेत. युवा आणि मोठा संख्येने उपलब्ध असलेले मनुष्यबळ, वाढता मध्यमवर्ग आणि या वर्गाची वाढलेली क्रयशक्ती असे त्याचे ढोबळमानाने वर्णन करता येईल. त्यामुळे, ग्राहकोपयोगी वस्तू आणि सेवांसाठी मोठ्या प्रमाणावर बाजारपेठ उपलब्ध होत आहे. जगातील सर्वात मोठी बाजारपेठ असा भारताचा लौकिक यापूर्वीच झाला आहे. म्हणूनच, भारत हे व्यवसायांसाठी एक आकर्षक स्थान म्हणून, जागतिक बाजारपेठेत उदयास आला आहे.
भारताच्या वाढीला परिवहन, ऊर्जा आणि डिजिटल कनेक्टिव्हिटीमधील गुंतवणुकीसह पायाभूत सुविधांच्या विकासावर सरकार करत असलेली विक्रमी गुंतवणूक चालना देत आहेत. पायाभूत सुविधांचा करण्यात येत असलेला विकास हा व्यवसाय करणे सुलभ व्हावे यासाठी सहाय्यकारीच आहे. या सुविधांसाठी करण्यात येत असलेली गुंतवणूक, देशांतर्गत वाढीला बळ देत आहे. व्यवसायाच्या वाढीसाठी करण्यात येत असलेले अनुकूल वातावरणही प्रगतीचे चालक आहे. नियमांचे सुलभीकरण करणे तसेच नोकरशाहीतील अडथळे कमी करणे, यासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्न करत असून, त्यासाठी सुधारणाही लागू केल्या आहेत. करप्रणाली सुलभ करण्याच्या उद्देशाने, वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी देशात आणला गेला. त्याची करण्यात आलेली प्रभावी अंमलबजावणी, पारदर्शक कारभाराला चालना देत आहे. गुंतवणूकदारांसाठी अनुकूल परिसंस्था उभारण्यात येत आहेत. डिजिटल पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी तसेच, विविध क्षेत्रांमध्ये डिजिटलायझेशनला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार काम करत आहे.
जगातील सर्वात मोठी बाजारपेठ आणि त्यातील वैविध्य हे अमेरिकी गुंतवणूकदारांना फायदे देणारे ठरते. 140 कोटींपेक्षा जास्त लोकसंख्येसह, भारत ही विविध स्तरावरील घटकांमधील गरजांची विस्तृत श्रेणी असलेली वैविध्यपूर्ण बाजारपेठ म्हणून उदयास आला आहे. ही विविधता तंत्रज्ञान आणि फार्मास्युटिकल्सपासून कृषी उत्पादनापर्यंत विविध क्षेत्रांमध्ये संधी देणारी ठरते. तांत्रिकदृष्ट्या प्रगत उत्पादने आणि सेवांची वाढती मागणी, विशेषत: नूतनीकरणक्षम ऊर्जा, फिनटेक आणि ई-कॉमर्ससारख्या क्षेत्रांमध्ये, या क्षेत्रातील अमेरिकी दिग्गज कंपन्यांसाठी विशेषतः फायदेशीर संधी सादर करणार्या ठरल्या आहेत.
भारताची धोरणात्मक भू-राजकीय स्थिती अमेरिकी गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची ठरते. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील एक महत्त्वाचा देश म्हणून, भारत ओळखला जातो. विविध धोरणात्मक उपक्रमांमध्ये भारत हा अमेरिकेसाठी महत्त्वपूर्ण भागीदार असून, ही धोरणात्मक भागीदारी द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करणारी ठरते. दोन्ही देश त्यांचे आर्थिक संबंध मजबूत करण्याचा प्रयत्नात आहेत, हेही लक्षात घ्यायला हवे. वाढत्या द्विपक्षीय सहकार्यासह भारतातील गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी, अमेरिकी सरकारचे उपक्रम, भारत हे सुरक्षित आणि विश्वासार्ह गुंतवणुकीचे ठिकाण असल्याचा संदेश देणारे ठरतात. जागतिक आर्थिक वातावरण तसेच भू-राजकीय अनिश्चिततेच्या परिस्थितीतही, भारताने राखलेला विकासाचा दर जगाला थक्क करणारा ठरला आहे.
भारताचा जेव्हा विकास होतो, तेव्हा त्याचा लाभ संपूर्ण जगाला होतो, हे यापूर्वीही स्पष्ट झाले आहे. भारताची वाढ जागतिक अर्थव्यवस्थेत योगदान देणारी ठरते. भारतातील वाढता मध्यमवर्ग आणि त्यांची वाढलेली क्रयशक्ती देशांतर्गत उत्पादन आणि मागणीला चालना देत आहे. हा विस्तारणारा ग्राहक जागतिक कंपन्यांसाठी भारतीय बाजारपेठेची दारे उघडणारा ठरला आहे. देशांतर्गत मजबूत मागणी असल्यामुळे, उत्पादन क्षेत्राला विशेषतः चालना मिळाली आहे. भारतीय ग्राहक वस्तू आणि सेवांवर अधिक खर्च करत असल्याने, ते जागतिक स्तरावर उत्पादनांच्या मागणीला बळ देत आहेत. जगभरातील उत्पादक आणि पुरवठादारांना त्याचा थेट फायदा होतो आहे.
भारताची वाढ थेट विदेशी गुंतवणूक आकर्षित करणारी ठरली आहे. केंद्र सरकार सुधारणांची अंमलबजावणी करत असल्यानेच, तसेच व्यवसायात सुलभता सुधारत असल्याने, आंतरराष्ट्रीय कंपन्या भारतात गुंतवणूक करत आहेत. भांडवलाचा हा ओघ केवळ भारताच्या आर्थिक विकासाला चालना देत नाही, तर गुंतवणूकदारांना नवीन संधीदेखील प्रदान करतो. उत्पादन, माहिती तंत्रत्रान सेवा आणि फार्मास्युटिकल्समधील भारताच्या प्रगतीमुळे, विविध क्षेत्रांमध्ये तो एक महत्त्वाचा देश ठरला आहे. भारताचा फार्मास्युटिकल उद्योग जागतिक स्तरावर जेनेरिक औषधांचा एक महत्त्वपूर्ण पुरवठादार आहे. जागतिक आरोग्यसेवेमध्ये तो मोलाची भूमिका बजावतो. ‘मेक इन इंडिया’, ‘आत्मनिर्भर भारत’ यांसारखे उपक्रम उत्पादन क्षमता तर वाढवतात, त्याशिवाय निर्यातीला चालना देतात. नवकल्पना आणि तंत्रज्ञानाचे केंद्र म्हणूनही, भारत उदयास येत आहे. भारतीय टेक कंपन्या जागतिक ग्राहकांना सेवा देत आहेत. त्यामुळे भारत आणि इतर देशांमधील सहकार्य आणि तंत्रज्ञान हस्तांतरणाला चालना मिळत आहे.
भारताची होत असलेली वाढ भू-राजकीय स्थिरता वाढवणारी आहेच, त्याशिवाय आंतरराष्ट्रीय पातळीवर तो महत्त्वाचा देश म्हणून ओळखला जात आहे. जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांसोबत त्याचे असलेले मजबूत आर्थिक संबंध, जागतिक स्थिरतेला प्रोत्साहन देणारे आहेत. भारत आर्थिकदृष्ट्या विकसित होताना, त्याचा सांस्कृतिक प्रभावही विस्तारतो. भारताची वाढलेली ताकद व्यापार करार आणि आर्थिक भागीदारी सुलभ करणारी ठरत आहे. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला थेट फायदा होतो. भारताच्या विकासाची गाथा ही जागतिक अर्थव्यवस्थेशी घट्टपणे जोडलेली असून, विस्तारणारी बाजारपेठ, वाढत्या गुंतवणुकीच्या संधी, आर्थिक प्रगती जगभरातील राष्ट्रांना थेट लाभ देणारी ठरत आहे. जागतिक पातळीवरील स्थैर्याचा आणि सहकार्याचा चालक म्हणून, तो येणार्या काळात अधिक ठरणार आहे. म्हणूनच, भारत जेव्हा विकसित राष्ट्र म्हणून उदयास येईल, तेव्हा गुंतवणूकदारांसाठी तो प्राधान्याचा देश असेल.