स्थानिक स्वराज्य संस्थांचा बिगूल वाजणार!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संकेत

    06-Dec-2024
Total Views |
 
Fadanvis
 
मुंबई : लवकरात लवकर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका व्हाव्यात यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी निवडणूकांचे बिगूल वाजण्याचे संकेत दिले. शुक्रवार, ६ डिसेंबर रोजी झालेल्या दुरदर्शन सह्याद्री वाहिनीवरील मुलाखतीत ते बोलत होते. वरिष्ठ पत्रकार नवनाथ बन यांनी ही मुलाखत घेतली.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "एका दृढ लोकशाहीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका न होणे चुकीचे आहे. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण अडकले आहे. मी कालच आमच्या सरकारी वकिलांसोबत बोललो. यासंदर्भातील स्थगिती हटवण्याची विनंती करा, असे त्यांना सांगितले. लवकरात लवकर या निवडणूका व्हाव्यात यासाठी आमचा प्रयत्न असेल," असे त्यांनी सांगितले.
 
हे वाचलंत का? -  नदीजोड प्रकल्प आणि हरित ऊर्जा निर्मितीवर सर्वाधिक भर
 
राज ठाकरे आणि आमचे विचार मोठ्या प्रमाणात मेळ खातात!
 
"राज ठाकरेंनी लोकसभेत आम्हाला खुल्या दिलाने पाठींबा दिला. विधानसभेत त्यांच्या पक्षाने निवडणूकाच लढल्या नाही तर त्यांचा पक्ष चालणार कसा? आमच्याकडे तीन पक्ष असल्याने त्यांना देण्यासाठी जागा नव्हत्या. ही वस्तूस्थिती समजून त्यांनी विरोधात लढण्याचा निर्णय घेतला. इतक्या मोठ्या प्रवाहाच्या विरोधात लढूनही त्यांच्या अनेक उमेदवारांना चांगली मते मिळाली आहेत. त्यांचे आणि आमचे विचार मोठ्या प्रमाणात मेळ खातात. त्यामुळे त्यांना सरकारसोबत ठेवण्याचा आम्हाला आनंद आहे. महापालिका निवडणूकीत शक्य असेल तिथे आम्ही सोबत येण्याचा प्रयत्न करू," असेही फडणवीस म्हणाले.
 
 
राहुल गांधींनी आत्मचिंतन करावे!
 
"मुर्खतापूर्ण बोलण्यापेक्षा विरोधकांनी आत्मचिंतन करायला हवे. एकाच दिवशी झारखंड आणि महाराष्ट्रात निवडणूक होते. झारखंडमध्ये ते जिंकतात तर ईव्हीएममध्ये प्रॉब्लेम नाही आणि महाराष्ट्रात ते हरले तर ईव्हीएममध्ये प्रॉब्लेम आहे. महाराष्ट्रात एकाच दिवशी लातूर शहरात अमित देशमुख जिंकतात आणि लातूर ग्रामीणमध्ये धीरज देशमुख हरतात. एकाच दिवशी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूकीत विधानसभेत महायूती निवडून येते आणि लोकसभेत काँग्रेस निवडून येते. यात कुठे ईव्हीएम आले? त्यामुळे ईव्हीएमवर दोषारोप करण्याऐवजी राहुल गांधींनी कधीतरी आत्मचिंतन केल्यास त्यांना भविष्यात चांगल्या जागा निवडून आणता येतील," असा सल्लाही त्यांनी दिला.
 
"विरोधकांनी मला सातत्याने टार्गेट केल्याने लोकांच्या मनात माझ्याविषयी सहानुभूती निर्माण झाली, त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो. माशी शिंकली तरी ते मला दोषी ठरवायचे. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी मला लढण्याची ताकद दिली. माझ्या मनात त्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी विश्वास निर्माण केला. त्यांच्या वागण्यामुळे मला मानसिक त्रास झाला पण माझे नुकसान नाही तर फायदा झाला," असेही ते म्हणाले.